सुनबाई मोठी शिस्तीची........!!

तो काय मागतोय ते देऊन टाक की त्याला एकदाचं, केवढं भोकाड पसरलंय त्याने, मी देऊ का नाहीतर, रमाच्या सासुबाई आतल्या खोलीतून ओरडल्या.
त्यांचं ऐकून तिच्या सहा वर्षाच्या मुलाला आणखी चेव चढला आणि तो आणखी जोरात रडायला लागला.
रमा सासूबाईंकडे गेली, आणि म्हणाली, रडू द्या ओ जरा त्याला. रडलं, धिंगाणा घातला की सगळं मिळतं, म्हणून फावतं पोरांचं. पेशन्स ठेऊ दे त्याला जरा. थांबायला ही शिकलं पाहिजे त्याने.

लहान आहे ग बाई तो, एवढ्यात कशाला त्याला काय शिकवायचं. शिकेल हळूहळू मोठा होईल तसा.
ये रे बाळा मी देते तुला काय हवं ते.......जास्त आवाज केला तर तेही येतील ओरडत, एवढ्याशा पोराला का रडवता म्हणून!!
पण यानेच तो शेफारतोय ना हो सासूबाई, किती हट्टी व्हायला लागलाय. प्रत्येक गोष्ट त्याला तोंडातून शब्द काढला रे काढला की हवी असते. हातातलं काम संपेपर्यंत देखील थांबता येत नाही त्याला.

सगळी लहान मुलं अशीच असतात हो रमा, आमचा चिन्मय पण अगदी असाच होता. बोलेल ते सगळं ताबडतोब लागायचं त्याला. किती धावपळ व्हायची माझी,आमच्या ह्यांना तर त्याने रडलेलं अजिबात चालायचं नाही, पहिले त्याला शांत करायला सांगायचे मग बाकीची कामं!!
पण मोठा होत गेला, तसा शहाणा झाला तो.
कुठे? लग्न झालं तेव्हा तर मुळीच शहाणा नव्हता. मला सुद्धा ऑर्डरी सोडत बसायचा.

मग काय बायको नाही नवऱ्याचं करणार तर कोण करणार?
सासूबाई, कुणी कुणाचं कशाला करावं, ज्याचं त्याने आपआपलं करावं की!! असिस्टंट का हवा कोणाला?
आपलं असिस्टंट कोण आहे मग, आपण आपलंच करतो ना? कोण येतं आपल्याला हाता- तोंडात काही दयायला?

ते सोड तुझं ज्ञान, तुझ्या सासऱ्यांना बघतेस ना अजूनही प्रत्येक गोष्ट हातात देते मी? किती कौतुक आहे त्यांना माझं!!
असणारच ना सासूबाई.. ....
पण असलं सोयीचं कौतुक माझ्या नवऱ्याला नसेल तरी चालेल मला. मी काही कुणाची असिस्टंट होणार नाही, ना नवऱ्याची ना पोराची.
प्रेम वाट्टेल तेवढं करीन, पण डिपेंडेबल मुळीच बनवणार नाही.
तो बघा तुमचा नातू, रडून रडून दमला आता बसलाय ना,  त्याच खेळण्यांशी खेळत मुकाट्याने. आपण जेवढं इंटरटेन करणार तेवढं त्यांचं जास्त फावणार!!
आणि तुमचा चिन्मय पण ना तुम्ही हातात देत होता तेव्हा तुम्हाला नाचवत होता, आता बघा कसं स्वतःच करतो सर्व. त्याला ही वाटायचं पहिले, हिने माझं करावं सगळं, पण मी त्याला ठणकावून सांगितलं, मला काही तुझ्या पुढे मागे करायला जमणार नाही. माझंही ऑफिस आहे, मलाही माझी इतर कामं आहेत, मला स्वतःला सेल्फ सर्विसची सवय आहे, तुही अंगवळणी पाडून घे. आणि मी करत नाही म्हणून आईकडे जाऊ नकोस लगेच, वय झालंय त्यांचं, आता त्या तुझं करणार की तू त्यांचं??
कठीण पडलं त्याला, पण हळूहळू जमलं. स्वतःहून शहाणा नाही झाला तो, त्याला शहाणं बनवावं लागलं. 
काय होतं पण आपण कुणाचं काही केलं तर? आपल्याच माणसाचं करतो ना, रमा?
करावं की, गरज असेल तर नक्की करावं, मानसिक, शारीरिक त्रास असेल तर नक्की आधार बनावं, बरं वाटेपर्यंत त्यांचं सगळं करावं, पण सर्व धडधाकट असताना उगाच पंगू कशाला बनवावं बरं?
आता मला सांगा, तुम्ही आहात म्हणून हातात देताय सासरेबुवांना सर्व, कधी एकटे पडले तर काय करतील?
सगळं व्यवस्थित आहे तसं त्यांचं, तुम्हीही मोकळ्या व्हा की जरा. 
छे, आता कसली मोकळी होतीये, जन्मभर त्यांच्याशी बांधून राहिले, त्यांचं सर्व हवं नको ते पाहत राहिले, मला मानवणारच नाही मोकळं झालेलं. तुझा शहाणपणा तुझ्याकडेच ठेव बाई, मला नको शिकवू काही!!

बरं तुमचं काय असेल ते असेल.....चालु द्या, तुम्हाला पटतंय म्हटल्यावर मी काय बोलणार?
पण एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही माझ्यात आणि पोरात पडू नका.
वा ग वा, असं कसं?  नातू आहे तो आमचाही!!
होs मग नातवाला बाकी सगळं शिकवा, त्याला खूप साऱ्या गोष्टी, गाणी ऐकवा, त्याचा अभ्यास घ्या, त्याला काय पाहिजे ते करून घाला, सगळे संस्कार करा. पण शिस्तीचं तेवढं माझ्यावर सोडा. मी ओरडले त्याला तर त्याची बाजू घेऊन मध्ये नका येऊ. तुम्ही दोघं त्याची कड घेऊन मला बोलायला लागता नेहमी, मग तो आणखी धारेवर धरतो मला. आज सर्वात महत्वाचे पेशन्स आहेत, ते मला शिकवायचेच आहेत त्याला. हल्ली मुलं अधीर बनत चाललीयेत, कुठेच कशासाठीही नाही थांबायचंय कुणाला.
त्याचं बीज घरातच रोवतो आपण. रडू दे रडतो तर, पण तोंडातून बाहेर पडलेला शब्द प्रत्येकवळी झेलला जाणार नाही, हे कळू दे त्याला. त्रास मलाही होतो, पण हे गरजेचं आहे त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी........
त्याची कामही करू देत त्याला, चार मधली दोन का होईना, तुम्ही नका हात पूढे करू. आता सवय लावली तर पुढे त्यालाच बरं पडेल. माझा भाऊ बाहेरगावी होता नोकरीनिमित्त, आईने स्वतःचं काम स्वतः करायची सवय लावलेली लहानपणासूनच आम्हा दोघांनाही, त्याचं कुठे काहीच अडलं नाही इतरांच्या तुलनेत. 
तुम्ही नातवाचे हवे तेवढे लाड करा, पण माझ्या शिस्तीच्या आड फक्त येऊ नका. नाहीतर त्याच्यावर उलटा परिणाम होऊन तुम्ही सपोर्ट करणारे तेवढे चांगले आणि  मी वाईट होऊन जायची त्याच्या नजरेत.

लाव बाई लाव काय शिस्त लावायची ती, तुम्ही आजकालच्या अतिशहाण्या मुली, आमच्यावर टेपरण नको उगाच, पोराला बिघडवायचं. काही येणार नाही आम्ही तुझ्या मध्ये, यांनाही सांगेन मी, आपली सुनबाई मोsठी शिस्तीची आहे; बघून घेईल तिचं ती..........

रागवू नका हो सासूबाई, त्या आसावरीच्या बबड्याच्या नावाने कित्ती बोटं मोडता तुम्ही, घरात एक बबडा स्वतःच तयार केला असताना सुद्धा! काय भरोसा, उद्या तुमच्याच सपोर्टने माझा पोरगा पण बबड्या बनला तर माझ्यासुद्धा नावाने अशीच बोटं मोडाल हो.........
म्हणून म्हणते, त्याच्या शिस्तीचं तेवढं तुम्ही माझ्यावरच सोडा........

फोटो साभार: गुगल

©️स्नेहल अखिला अन्वित

कथा आवडल्यास माझ्या 'हल्ला गुल्ला' या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा........


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel