ऑनलाईन सेलिब्रेशन........!!

पासष्टीचे मोरे काका कोरोनाला हरवून आले तसा सगळ्या घरादाराचा आनंद गगनात मावेना झाला. जाताना खरंतर एवढे सिरीयस होते, कोणाला गॅरेटी नव्हती, परत येतील याची. पण आले, बायकोने तर दारातच ओवाळून आत घेतलं त्यांना!!
छोटी दोन नातवंडं आनंदाने नाचायला, उड्या मारायला  लागली. 
पंधरा वीस दिवसानंतर आज घरात उत्साह भरला होता. प्रत्येकजण खूष होता. 
फ्रेश होऊन आल्यावर सुनेने पटकन त्यांना आवडतो तसाच चहा आणून दिला, आणि बरोबर गरमागरम उपमाही.

चहाच्या पहिल्या घोटाला त्यांच्या तोंडून वा!! असं निघालं. किती दिवसानंतर सुनबाईच्या हातचा त्यांच्या आवडीचा चहा मिळाला होता त्यांना!! उपमाही गरम गरमच खाऊन घेतला त्यांनी. कट्ट्यावर प्लेट नेऊन ठेवताना सुनबाईला आठवणीने म्हणाले, अंगात त्राण आल्यासारखा वाटतोय बघ आता. घरचं ते घरचच शेवटी!!

नंतर मात्र एकदम फ्रेश झालं मन त्याचं!! लगेच आपल्या दोन्ही नातवंडांना बोलावलं आणि दोघांनाही मांडीवर बसवून त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं. किती दिवस त्यांच्या स्पर्शासाठी आसुसलं होतं मन त्यांचं!! थोडे लवकरही आले असते घरी ते, पण लहान मुलं घरी म्हणूनच थोडे दिवस आणखी बाहेर काढले त्यांनी.
मुलांनाही तसंच झालेलं अगदी, आपल्याबरोबर आपण म्हणेल तसं न कंटाळता खेळणारे लाडके आजोबा एवढ्या दिवसानंतर भेटलेले त्यांना. सोडावसच वाटत नव्हतं कुणालाही एकमेकांना.
बायकोलाही बोलावून घेतलं त्यांनी गप्पा मारायला आणि म्हणाले, घरी आल्यावर किती मस्त वाटतय काय सांगू तुला? हा गोतावळा आहे ते किती भाग्य आपलं!! 

तेवढयात तिथे त्यांची सून आली आणि म्हणाली, खरंतर तुम्ही आहात तेच आमचं भाग्य. तुमच्यामुळे घर भरलेलं आहे, नाहीतर कोण खेळलं असतं पोरांशी एवढं? कोण लाड करणारं होतं? ह्या लॉकडाऊन मध्ये घरी तुम्ही होता, म्हणून गुंतून राहिली पोरं तुमच्याबरोबर. 
मी या घरात आल्या दिवसापासून तुम्ही दोघे माझे आईवडील झालात म्हणून एवढं लांब माहेर आहे, तरी उणीव नाही भासली कधी आईवडिलांची!! आमच्या भांडणात तुमच्या मुलाची बाजू घेताना मी पहिलच नाही तुम्हाला कधी, नेहमी तुम्ही मलाच सावरून घेतलंत. म्हणूनच तो म्हणतो ना, कधी कधी मला प्रश्न पडतो, आई वडील नक्की आहेत कुणाचे?
बाबा खरंच सांगते, तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात तर अजिबात चैन नव्हती हो आम्हाला. तुमच्या नातवंडानी तर जेवणच टाकून दिलेलं. किती काय काय करून त्यांना मनवावं लागलं, काय सांगू तुम्हाला!!
किती तो लळा हो तुम्हा दोघांचा पोरांना!! आमच्यापेक्षा तुम्हीच जास्त लागता त्यांना!!

तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळेच वाचलो मी सुनबाई, तुम्ही सर्वांनीच बाहेर खेचलं मला, कृतज्ञ मी तुमच्या प्रेमाचा!! काकाचं बोलणं ऐकून त्यांचा मुलगा पटकन म्हणाला, बाबा म्हणूनच सेलिब्रेशन करायचंय आपल्याला उद्या. सगळे तुमचे जवळचे उत्सुक आहेत तुम्हाला पाहायला.
काका म्हणाले, अरे या कोरोनात कसलं रे सेलिब्रेशन? कशाला कोण येतंय मला बघायला?
बाबा, ऑनलाईन सेलिब्रेशन हो!! सर्वांना तुमचं कौतुक वाटतय. या वयातही लढा देऊन परतलात. सेलिब्रेशन तो बनता है......

उद्या चार वाजता तुमची लाडकी लेक आणि जावई, काका काकू, तुमचे व्याही आणि तुमचा लाडका पुतण्या, एवढे सगळे ऍड होणारेत तुमच्यासाठी.
आणि सहा वाजता तुमचं मित्रमंडळ. मस्त जाईल वेळ सगळ्यांचा. एवढ्या दिवसानंतर असं काहीतरी रिफ्रेशमेंटला हवंच, मुलाचा उत्साह त्याच्या बोलण्यातून पाझरत होता. 

दुसरा दिवस नेहमीसारखाच उजाडला असला तरी नेहमीसारखी मरगळ नव्हती मनात कुणाच्या. प्रत्येकाला संध्याकाळची उत्सुकता होती. सेलिब्रेशन ऑनलाईन होतं, पण तरी धांदल होतीच. वेळेत सर्व आवरून बसायचं होतं. सगळ्यांनी छान सुंदर, प्रसन्न दिसायचं, हा आग्रहच होता सुनबाईचा.
त्यानिमित्ताने का होईना, इतके दिवस कपाटात पडून राहिलेल्या ठेवणीतल्या कपड्याला प्रत्येकाचा हात लागणार होता. दिवसभराचं सर्व आवरताना देखील अंगात नवीन जोम शिरल्यासारखा वाटत होता. दोन्ही मुलं तर सारखी वाजले का चार वाजले का चार म्हणून विचारत फिरत होती. त्यांना वाटत होतं, सेलिब्रेशन करणार म्हणजे केक नक्की कापणार, त्यांना त्याची आतुरता होती. ते ओळखून त्यांच्या आजीने मुलाला गुपचूप केक आणून ठेवायला सांगितलाच होता.

चार वाजले तसं काकांच्या मुलाने एकेकाला ऍड करायला सुरुवात केली. ते सर्व आल्यावर काकांना बोलावलं, काका समोर आले तसे सर्वांनी टाळया वाजवून त्याचं अभिनंदन केलं. 

विहीणबाई बोलल्या, वाटत नाही हो तुम्ही काल हॉस्पिटलमधून आल्यासारखे, फ्रेश वाटताय एकदम. साक्षात विहीणबाई हे बोलल्यावर काकांना अगोदरपेक्षाही जास्तच फ्रेश फिल झालं. दिसतही होते टवटवीत ते,  ठेवणीतला कुडता जो घातला होता.
मुलगी, जावई आणि नातवंडं तिथूनच थ्री चिअर्स फॉर बाबा करून एवढ्या जोरात ओरडले की खुद्द बाबांनाच दचकायला झालं. 
त्यांच्या भावाने आणि वहिनीने कोरोना संपल्यावर पहिले गावाला येऊन त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडून प्रॉमिस घेतलं. लाडक्या पुतण्याने बोलता बोलता डोळ्यातून पाणी काढलच.
बघितलं तर होते सगळे मोबाईलमध्ये, पण काही वेळाकरता जणू खरंच आपल्या घरात आपल्या समोर असल्यासारखे वाटत होते.
सर्वाना लांबून भेटूनही अगदी जवळून भेटल्यासारखं वाटलं काकांना.

बोलाचाली झाल्यावर मुलांसाठी म्हणून आणलेला केकही सर्वांदेखत कापला, आणि सर्वाना ऑनलाईन भरवला देखील. मुलांना तर भारीच मज्जा आली ते पाहून!!
हे सर्व करताना सहा कसे वाजले हे कुणाला कळलंही नाही. वेळेकडे लक्षच नव्हतं कुणाचं गप्पांत. नंतर वाटलं,अरे एवढे बोललो आपण एवढं लांब असुनही!!

काकांना चहाची तलप आली होती, पण मित्रांना भेटायची उत्सुकताही होती. म्हणून त्यांनी मुलाला चहा राहू दे, मित्रांना ऍड कर पहिले म्हणून सांगितलं.

एकेक मित्र आले तेच ओरडत, एक म्हणाला, काय मोऱ्या, भारी गड्या तू, हरवलंस लेका कोरोनाला. दुसरा म्हणाला, मोऱ्या टक्कल वाढलं रे, तिसरा म्हणाला, मोऱ्या टकल्या आज चिकणा दिसतोयस एकदम!!
काकांना एकेकाला बघूनच आता उठावं आणि त्यांना मिठ्या माराव्या असं वाटत होतं. 
मित्रांशी बोलता बोलताच सुनेने चहा दिला त्यांना, तसे नजरेनेच सुनेला थँक्स बोललेच ते. परत मित्रांची टवाळकी सुरू झाली. ढोस एकटाच चहा, काही वाटत नाही तुला!! 

थट्टा मस्करी संपल्यावर मात्र एका मित्राने विचारलंच, असं काय होतं रे ज्याने तू एवढ्या संकटात तग धरलास?
ऐकूनच मोरेकाकांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, मी माझ्या माणसांंसाठी आलो परत. तुम्ही सगळे सारखे समोर यायचात माझ्या. माझं घर, माझी नातवंड या साऱ्यात जीव माझा. तुम्ही साऱ्यांनी ऊर्जा दिली मला. मला माझ्या घरात परतायची आस लागलेली, माझ्या घरातली प्रत्येक व्यक्ती मला दिवसातून दहा वेळा फोन करून सांगायची, बाबा तुम्ही आम्हाला हवे आहात. लवकर घरी या. 
लकी आहेस रे बाबा तू, असं म्हणत सगळ्या मित्रांनी दर आठवड्याला असंच ऑनलाईन  यायचं म्हणत निरोप घेतला.

मोरेकाकांना मनातून खूप झक्कास वाटत होतं. आज किती जणांना भेटले होते एकाच दिवसात ते!! आणि सर्वच्या सर्व काकांसाठी आनंदात होते.
त्यांना वाटलं, या वयातही आपण कोणाला हवे वाटतो, ही मनाला किती सुख देणारी गोष्ट आहे!!
दूर असूनही हे "ऑनलाइन सेलिब्रेशन" किती जवळ घेऊन आलं आपल्या माणसांना आज........
जुन्याचा अट्टाहास न धरता नवीन सर्व जो सहज स्विकारेल तो खरा सुखी, अगदी माझ्यासारखा!!

काय, मोरेकाका म्हणतायत ते पटतय का तुम्हा सर्वांना......??



©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल


कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel