आम्ही दोघं राजा राणी........!!!

राजा: अगं बाई, काहीतरी नवीन प्रकार कर की जरा. तुला भेंडीच खायला घालायची आहे तर भरली भेंडी, भेंडी मसाला, भेंडी फ्राय वगैरे करुन घाल की.
गवारची भाजी पण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो आपण!!
तू काही नवनवीन चविष्ट प्रकार केलेस भाज्यांमध्ये, तर कुठलीही भाजी खाऊ आम्ही.....  

राणी: हो का? खरंच??
मग तूच कर ना, प्लिज कर ना, करच......
तुही घरी मीही घरी......आपला रोल फ्लिप करूया चल!!
I need a change. पकलीये मी तेच तेच, तेच तेच आणि तेच तेच करून. 
वरची कामं मी बघते तू तेवढं स्वैपाकाच बघ. तुला पाहिजे त्या भाज्यांचे, पाहिजे ते प्रकार कर, भात कर, पुलाव कर, खिचडी कर काय करशील ते खाईन पण तू कर. नाश्त्याच्या पण डिमांड नसतील माझ्या, तुझ्या हाताने काय करून देशील ते खाईन
बस मी कंटाळले, I desperately need a change
मला दुसऱ्या कुणाच्या हातचं खायचय, कर ना तू, प्लिssज कर ना तू.......

राजा: मी नाही केलं ग असं कधी, मला कसलं जमतंय?

राणी: ऑर्डर सोडायला जमतं ना? मग हेही जमवून बघ की
यू ट्यूब वर बघून कित्तीतरी पुरुष घरी जेवण बनवायला लागलेत माहितीये? सगळं काय सारखं नवनवीन बायकांनीच करायचं का? तुम्ही शिकून आम्हाला पण खाऊ घाला की!!
माणसाला फक्त इच्छा पाहिजे बायकोला खुश करायची.

राजा: असं म्हणतेस बघतो मग जमवून, तू खुश होशीलना पण!! तुम्हा बायकांचा काही भरोसा नाही.

राणी: आयतं जेवायला दिलंस तर नक्कीच होईन!!

राजा: चल मग, जरा चार्जिंगला लावलाय तो माझा मोबाईल आणून दे, फ्रिजमधली भाजी काढून दे, जरा सूरी कुठाय बघ, कढई दे जरा आणि हो ते तिखट, हळद, मसाला कुठे आहे तो पण दे जरा. ते तांदूळ आणि डाळसुद्धा दे काढून.

राणी: ए हॅलो, सगळं समोर आहे, एवढं सारं तुला हातात द्यायला नाचण्यापेक्षा मी केलेलं बरं नाही का?
मी स्वैंपाक करते तेव्हा तू मला हे सगळं आणून देतोस की काय??
मी घरात नाही असं समज, काही अडचण आलीच तर तुझी तूच तिला निस्तर.......तुझ्यासाठी पण काहीतरी नवीन आहे ना? एन्जॉय कर.......तेच तेच, तेच तेच आणि तेच तेच किती दिवस तू तरी करणार ना?

राजा: अगं या पण मी नवशिक्या आहे ना? तू नाही मला मदत करणार तर माझं कसं होणार?

राणी: पण याच घरात तर गेली बारा वर्ष रहातोस ना?
किंचितसे कष्ट घे, सगळं सापडेल. माझ्याकडून तर आता काहीही एक्सपेक्ट करू नकोस. 
हुश्यs किती बरं वाटलं असा डायलॉग मारून........

राजा: हे सगळं माझ्या अंगावर टाकून तू महाराणीसारखी बसणार की काय?

राणी: हो, रोज तू नाही का बसत? एक दिवस मी बसले तर डोळ्यात सलणार की काय आता तुझ्या?

राजा: बस बाई बस. मी बघतो ट्राय करून.......तसं न जमण्यासारखं काही नसतं.

राणी: हं, मलाही तसच वाटतं, न जमण्यासारखं काssहीच नसतं.

राजा: जा आता तू आराम कर, मी बघतो काय ते.....
चला पहिला श्री गणेशा कुकर लावून करूया.
अगं ए, तांदुळ किती घेऊ ग?

राणी: एक वाटी

राजा: आणि डाळ?

राणी: त्यात माप आहे तेवढी घे.....
 
राजा: आणि पाणी किती घालायचं?

राणी: घाल तुझ्या अंदाजाने........हवं तेवढं. 
म्हणे आराम कर 🤦‍♀️

राजा: चला कुकर तर लावला......
आता भाजीचा सल्ला यू ट्यूब वरून!!

दहा मिनिटानंतर.........
राणी: अरे कुकर बंद कर, पाचवी शिट्टी आहे ही. तिथेच आहेस ना, लक्ष कुठाय?

राजा: मी भाजी चिरत होतो. पण तू तिकडे बसून शिट्या का मोजत बसलीयेस?

राणी: मी तिसऱ्या शिट्टीपासून वाट पाहतीये, म्हटलं बघू तुझी ट्यूब कधी पेटतीये? भाजी करता करता कुकरकडे कोण लक्ष देणार?

राजा: केला बंद, तू ही थंड घे आता.

आणखी दहा मिनिटानंतर.........
राणी: अरे ए, भाजी जळतीये वाटतं खालून, काय करतोयस?
सगळी घाणेद्रियं बंद झालीका रे तुझी?

राजा: हो हो बघतो बघतो, मी जरा डाळीला फोडणी देत होतो.

राणी: मग बाजूला भाजी करपतेय ते कळलं नाही का?
आम्ही बायका एकावेळी दहा दहा गोष्टी हँडल करतो.
पोरं आजीकडे गेलीयेत म्हणून बरं, नाहीतर त्यांनाही तुझ्या अंगावर सोडलं असतं. मग कळलं असतं तुला.

राजा : तू ऐश कर ग बाई, दिलाय ना एवढा मौका नवऱ्याने. इकडे कशाला लक्ष देत बसलीयेस?

राणी: मी इकडून का होईना लक्ष देतीये म्हणून तिकडे बरं चाललंय तुझं.......
नाहीतर शिट्या मारून मारून कंटाळल्यावर तो कुकर उडाला असता, ब्लास्ट झाला असता ब्लास्ट.......
ती भाजी करपून तोंडी लावायला तरी उरली असती का?

राजा: घे बाई सगळं क्रेडिट तुलाच घे!! 

राणी: नको तुझ्या स्वैंंपाकाचं क्रेडिट तुलाच राहू दे. कधी मिळणार आहे जेवायला? किती तो वेळ?

राजा: ये बाई ये. नाहीतरी तिकडे बसून तुझा जीव इकडेच आहे. दिली होती ना संधी, इतरवेळी म्हणतेस मला माझं काही करायला मिळत नाही. मोबाईलही बघायला मिळत नाही. कोणाशी बोलायला मिळत नाही. मग आता काय झालं? 

राणी: आता ना माझं सासूबाईंंसारखं झालं. करायला तर सगळं सांगायचं सुनेला, पण जीव मात्र ती आपल्या स्वैंंपाकघरात काय गोंधळ घालत असेल, यात अडकवून ठेवायचा. आत्ता कळलं मला, आपल्या जागेवर कोणी नवीन नाचायला आलं की कसं फिल होतं ते..…...

राजा: बघ, तरी मी सांगत होतो. उगीच खटकायची माझी आई तुला. 

राणी: तुझ्या आईलाही मी खटकायची रे. तुला सांगू का......

राजा: बास!! काही सांगू नको मला, पुढचं सर्व तोंडपाठ आहे माझ्या. ये आयत्या जेवणाचा आनंद घे. परत म्हणू नको नवरा माझ्यासाठी काही नाही करत.

राणी: भातात जss रा पाणी जास्त नाही वाटत? भाजी लागलीच बघ शेवटी? डाळ जरा खारट नाही का वाटत?

राजा: मी एवढं केलं त्याचं कौतुक नाही? नावं ठेवत बसलीये.

राणी: कळलं ना कसं वाटतं? कोणी आपल्यासाठी कष्टाने काही बनवलं आणि समोरच्याने तोंड वाकडं केलं तर?
मला तुम्ही दर दिवसाआड नावं ठेवत असता. तुझ्यामुळे पोरं पण.

राजा: कळलं ग राणी सगळं कळलं. पुन्हा कधी नाही बोलणार मी काही. आता तरी खाशील की मीच भरवू प्रेमाचा घास?

राणी: ते ही चालेल. तू भरवल्यावर दोन घास जरा जास्तच जातील मला😍

झालं आता. पुढे बघतील त्याचं ते. तुम्ही मात्र एक करा. या राजा-राणीची स्टोरी आवडली असेल तर तेवढा लाईक जरूर ठोकून द्या😀 


©️ स्नेहल अखिला अन्वित


फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel