मराठी कथा
सामाजिक
लग्नगुंता.........!!
शनिवार, १७ एप्रिल, २०२१
उर्जिताला छत्तीसावं लागलं, अन् अचानकच सगळं अगदी योग्य जुळून येऊन तिचं लग्न ठरलं.
तशी स्थळं बघायला सुरुवात तर बाविसाव्या वर्षांपासून झालेली, पण ती आईवडील आणि इतर नातेवाईकांकडून!!
आत्ता सुरू केलं तर कुठे चार पाच वर्षात होईल या हेतूनं. पण त्यावेळी उर्जिताचीच मानसिक तयारी नव्हती, तिनं ना आईवडिलांना सिरियसली घेतलं, ना नातेवाईकांना ना पाहिल्या जाणाऱ्या मुलांना. धडाधड एवढ्या तेवढ्या कारणावरून नकार देत बसली ती सगळ्यांना.
अन् जेव्हा तिच्या मनाची तयारी झाली, जेव्हा तिला अगदी आतून वाटू लागलं, तेव्हा वय झालेलं अठ्ठावीस, आणि बघता बघता मनाजोगता मुलगा मिळेपर्यंत ती घोडनवरी झाली.
घरच्यांना तर वाटलेलं आता ही दुसरेपणावरच जाईल. पण सुव्रतचं स्थळ आलं,आणि सगळं सगळ्या बाजूंनी अगदी मस्त जुळलं. तोही असाच ही नको ती नको करत वय वाढवून बसलेला होता. दोघांचीही शिक्षणं उत्तम त्यामुळे नोकऱ्याही अगदी वारेमाप पगाराच्या होत्या.
आणि दोघही एकुलते एक होते. लग्न ठरलं तसं दोन्ही घरी आनंदाचं उधाण आलं.
पैसे पाणी कशालाच कमी नव्हतं, हे करू का ते करू असं झालं सर्वांना. इकडे तिकडे गावोगावी पसरलेल्या नातेवाईकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सगळ्यांना लग्नाला धम्माल करायची होती. केव्हापासून ठरवून ठेवलंलं सगळ्यांनी.
कशाचा नाही पण एकाच गोष्टीचा अडसर होता फक्त..........
लग्न ठरलं ते ऐन कोरोनात. एकतर इतक्या वर्षांनी ठरलं, आता कुठलं विघ्न नको यायला, म्हणून दोन्ही घरच्यांनी अगदी महिनाभरातलीच तारीख निश्चित केली. ठरलंय तर होऊन जाऊदे एकदा, हाच विचार होता तेवढा!!
मात्र लग्न ठरायला आणि लॉकडाऊनची घोषणा व्हायला एकच गाठ पडली. पंधरा दिवसाचं लॉकडाऊन त्यानंतर लगेच पंधरा दिवसांनी लग्न. त्यातून ते पंधरा दिवसात संपलं तर बरं, वाढलं तर काही सांगता येत नव्हतं. सगळाच गुुंंता समोर होता.
लॉकडाऊनची तुतारी वाजली तसं उर्जिताच्या आईने डोळ्यातून पाणीच काढलं, "कधी नव्हे ते काही चागलं घडत होतं घरात, किती हौस करायची ठरवलेली मी पोरीच्या लग्नात! कशा करायच्या खरेदया अन् कशी करायची सगळी तयारी?
इथं घरातून बाहेर पडायचीच बंदी झाली."
जवळच्या नातेवाईकांचे पण फोन यायला लागले, "लग्न पुढं ढकलणार का मग? आम्हाला यायची फार इच्छा आहे पण येणार कसं? लॉकडाऊन वाढलं तर काही खरं नाही. तुमचं तुम्ही उरकून घ्या मग, आम्ही देतो आशीर्वाद इथूनच!!"
प्रत्येक नातेवाईकांचा फोन ठेवताना उर्जिताच्या आईच्या डोळ्यातून टिप गळायचीच. "काय बाई, एकुलती एक पोर माझी, तिच्या नशिबाला का असं यावं. धडाक्यात लग्न करायचं सुख नसावं नशिबी पोरीच्या, दोन वर्ष आधी ठरलं असतं लग्न तर किती बरं झालं असतं, डोळे पुसत तिचं मुसमुसणं सगळ्यांना पाठ झालं होतं."
उर्जिताला सुद्धा लग्न ठरलं तसं शाही लग्नाची स्वप्न दिसू लागली होती. काही कमी नव्हतंच अन् मग काय!!
पण लवकरच ती भानावर आली आणि तिने सत्याचा स्वीकार केला. आपल्याला लाख वाटत असेल, असं व्हावं नी तसं व्हावं, पण या परिस्थितीत मनाजोगं काही होणं शक्य नाही.
तिने तटस्थपणे सगळ्याचा विचार केला, आणि मनाशी काही पक्कं केलं.
पहिला फोन सुव्रतला केला, त्याला सर्व ठरवलेलं सांगितलं. "मलाही अगदी हेच म्हणायचं होतं, मी तर माझ्या घरी बोललोही," तो उस्फूर्तपणे म्हणाला.
उर्जिताची कळी खुलली. उशिरा का होईना मनाचं कनेक्शन जुळणारा माणूस मिळाला, तिचं मन आनंदाने फुललं.
मग तिने आपला मोर्चा आईकडे वळवला. उर्जिता आईजवळ गेली तशी आई सुरूच झाली लगेच, "काय ग कशी करू मी हौस तुझी? पैसा रग्गड असूनही काही करता येत नाही बघ."
उर्जिता आईच्या कुशीत शिरली, तिला घट्ट पकडून म्हणाली, "आई माझं लग्न होतंय, हीच किती मोठी गोष्ट आहे. मला अगदी माझ्या मनाजोगता वर मिळालाय हे काय कमी आहे? माझ्या लग्नाची हौस मलाही होती ग. पण आता सगळं स्पष्ट समोर दिसतंय. पन्नास माणसं जी बोलवायचीयेत ती देखील लांब लांब परगावी राहतात आपली. या सगळ्या परिस्थितीत त्यांना बोलावणं आणि त्यांनीही फक्त लग्नासाठी म्हणून जीवावर उदार होऊन येणं, अजिबात योग्य नाही अगं."
"मग काय आपण चार डोकी मिळूनच करायचं का लग्न? पन्नास म्हणजे पण किती कमी? एरवी पाचशे आली असती पाचशे!! घरातलं पहिलं आणि शेवटचं लग्न होतं हे. किती काय काय ठरवलेलं मी," आईच्या डोळ्याला पुन्हा धार लागली.
"आई मी बोललीये सुव्रतशी. त्याचंही हेच म्हणणं आहे. हो, चारच डोकी मिळूनच करायचं लग्न. ते सुद्धा आपल्या घरात. सुदैवाने तसं मोठं आहे आपलं घर. अन् अगदी गरजेच्या माणसात करायचं. लग्न होतंय हे काय कमी आहे का? नको ती रिस्क घेण्यापेक्षा चार डोकी परवडली. आणि परिस्थिती अशीच काही जन्मभर राहणार नाहीये. पाच सहा महिन्यात हळूहळू मावळेल सगळं. फार तर वर्ष पकडू चल.
सगळं सुरळीत झालं की आपण स्वागत समारंभ करू आपल्या माणसांसाठी. तेही आता जीव मुठीत घेऊन येण्यापेक्षा नंतर अगदी आनंदाने येतील."
"मुलगी अगदी बरोबर बोलतेय, शंभर टक्के पटलं मला," इतका वेळ मागे उभं राहून त्यांचं बोलणं ऐकणाऱ्या बाबांनी तिच्या खांद्यावर थोपटुन तिच्या बोलण्याला दुजोरा दिला.
तरी आईचा मनापासुन होकार जरुरी होता, बापलेकीनं आशेने आईच्या तोंडाकडे पाहिलं, आईचे डोळे पुन्हा भरले, आणि ती म्हणाली, "पर्यायच नाही दुसरा आता. नंतरचा समारंभ मात्र दणक्यात करायचा हं. झाडून सगळ्या नातेवाईकांना बोलावणार मी, एकुलती एक पोर माझी तिला अगदी लक्ष्मीसारखी सजवणार मी!! पोरीच्या लग्नच्या नाहीतर नाही पण त्या समारंभात मात्र मिरव मिरव मिरवणार मी!!"
सगळं ठरलं त्याला आईने मान्यता दिल्यावर मात्र मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं बापलेकीला. सगळा गुंता सुटला, काळजी मिटली.
ना खरेदीचं, ना मानपानाचं, ना हॉलचं, ना पन्नास माणसांचं त्यांना टेन्शन उरलं, कोरोनाकाळातलं जाणीवपूर्वक भपकेबाजी टाळून, अगदी मोजक्या माणसांत करायचं ठरवलेलं हे साधंसुधं लग्न; ते तसंच झाल्यावर, सर्वांच्या कौतुकाचा विषय मात्र नक्कीच ठरलं..........!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article