मराठी कथा
सामाजिक
दुधावरची साय.........!!
शुक्रवार, १२ मार्च, २०२१
नकुलने रुहीचा भाकरी करतानाचा व्हिडीओ तिच्या माहेरच्या ग्रुपवर टाकला आणि लिहिलं, बघा कशा छान भाकरी करायला शिकवलं आम्ही तुमच्या मुलीला!! बघा कशी तरबेज झाली ती!!
आई, मावशी, काका काकू, मामा-मामी, आत्या सर्वजणांनी कौतुकाने छान छान प्रतिक्रिया दिल्या.
कोणी लिहिलं, पोरगी शिकली आमची. कोणी लिहिलं, पोरगी संसारी झाली, कोणी लिहिलं, आता पुरणपोळ्याचाही व्हिडीओ येऊ द्या. कोणी लिहिलं, सुगरण होणार म्हणजे आमची मुलगी आता.........
मुलीच्या आजीची प्रतिक्रिया मात्र सगळ्यात वेगळी होती. तिने लिहलं, जावईबापू आमची मुलगी भाकऱ्या बडवायला लागली हे ठिक आहे. पण आमची मुलगी उत्तम शिकलेली आहे. पुढे जाऊन तिला पी एच डी करण्याची इच्छा आहे. तुमच्या सहकार्याने तिने करिअरमध्ये उंची गाठली तर त्याचं जास्त कौतुक वाटेल आम्हाला. मी स्वतः देखील लग्नानंतर डॉक्टरेट मिळवली होती. त्या काळीसुद्धा मला माझ्या सासरच्या माणसांनी घरकामात बांधून न ठेवता पुढे शिकण्याची मोकळीक दिली. आजही मला फार कौतुक वाटतं त्यांचं. हे असंच माझ्या नातीलाही वाटलं पाहिजे तुमच्याबद्दल. तेव्हा पुढचा व्हिडीओ असा येऊदे ज्यात आम्हाला मुलीपेक्षा जास्त कौतुक तिच्या सासरकडच्याच वाटेल........
त्या प्रतिक्रियेनंतर मात्र सर्व गपगार झाले. ती प्रतिक्रिया सर्वांना पटली खरी, पण त्यावर चर्चा करायला एकही जण पुढे आलं नाही. सगळ्यांना धास्ती वाटली, आता जावईबापू तडकणार याची. रुहीची आई आजीकडे म्हणजे आपल्या सासूबाईंकडे गेली आणि म्हणाली, तुमचं खरं होतं पण एवढ्यात बोलायला नको होतं तुम्ही. काहीही झालं तरी आपली बाजू मुलीची. करायचं थोडं कौतुक.
पण रुहीच्या आजीने त्याला स्पष्ट नकार दिला आणि म्हणाली, नाही बाई. मला नाही आवडलं ते. स्वैपाक करायला काय आपण शिकवू शकलो नसतो? आपण तिला वेळ दिला अभ्यासाला. आणि तो तिनं सार्थकीही लावला. कामापुरतं तिलाही येतं की स्वैपाकपाणी.
आज भाकऱ्यांचा पाठवला, उद्या आणखी कशाचा पाठवतील. आपण कौतुक करत राहिलो की त्यांना तिला आणखी भरीस पाडावं वाटेल.
तिचं दुसरही काही ध्येय आहे हे कळायला हवं त्यांना. म्हणता म्हणता वर्ष होत आलं आता लग्नाला, कधी सुरू करणार ती तिचं काम? मी आपली वाट बघतेय, कधी मला बातमी येतेय तिच्याकडून, आजी मी माझ्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल सुरू केली हं!!
हा व्हिडीओ बघून मला कसा आनंद होईल सांग?
रुहीच्या आईला आजीचं म्हणणं योग्यच वाटलं. खरंतर व्हिडीओ बघून तिच्याही मनात काहीसं तसंच आलेलं. पण तिला सडेतोडपणे व्यक्त होता आलं नाही. तिने आपलं छान म्हणून सोडून दिलं.
पण इतकं वय झाल्यावर अजूनही विचारात तितकीच स्पष्टता असणाऱ्या सासूबाईंचं तिला मनातून फार कौतुक वाटलं.
तिकडे रुहीने तो आजीचा रिप्लाय वाचला, आणि न राहवून तिला रडायलाच आलं. घरात असताना तिला तिचा अभ्यास करू द्या, तो सर्वात महत्वाचा आहे म्हणत स्वैपाककामापासून दूर ठेवणाऱ्या आजीला तो व्हिडीओ बघून काय वाटलं असेल याचा तिला त्यावरून चांगलाच अंदाज आला.
तिने तसं सासूला सांगितलेलंही, मला फारसा स्वैपाक येत नाही. तर सासू म्हणलेली काही हरकत नाही आम्ही शिकवू तुला. तिला ते हसण्याखेळण्यावारी वाटलेलं सगळं. पण नंतर मात्र एकेक गोष्ट येत नाही म्हणून शिकवायलाच घेतली अगदी पद्धतशीरपणे. नवीन नवीन तिलाही कौतुक वाटलं.
लग्न होऊन दुसऱ्या शहरी यावं लागलं म्हणून तिने तिची चांगली नोकरी सोडली. तिला वाटलं तेही मोठं शहर आहे. तिथेही मिळेल चांगली. नोकरीही करू आणि रात्रीचा दिवस करून आणखी अभ्यास करून आजीला आपलं स्वप्न पूर्ण करून दाखवण्याच प्रॉमिस केलंय तेही पूर्ण करू.
पण दहा महिने झाले तरी नोकरीकडेही बघायला मिळालं नाही की अभ्यासाकडे.
मनाशी काहीतरी ठरवून ती उठली, तेवढ्यात नकुलच तिला खोलीत शिरताना दिसला.
दोघांची नजरानजर झाली, आणि नकुल तिच्या जवळ येऊन म्हणाला, मला माफ कर. एक क्षण तुझ्या आजीचा मेसेज वाचून डोक्यात तिडीकच गेली. त्यावर जळजळीत रिप्लाय लिहून पाठवायला घेतला, अन् तो सेंड करणार इतक्यात विचार आला. कुठे चुकल्या त्या? आज माझी आजी त्या जागी असती, आणि मी त्यांच्या नातीच्या. तर तिलाही तेच वाटलं असतं. मी आईला तो मेसेज वाचायला दिला. तिलाही चूक लक्षात आली. तिनेही सर्व नातलगांना कौतुकाने सांगितलं होतं लग्न ठरल्यावर, आमची सून खूप जास्त शिकलेली आहे. आणि पुढेही खूप शिकणार आहे. आम्हीही मुद्दाम नाही ग केलं, पण सगळ्या कौतुकात दुर्लक्ष झालं खरं. पण आज आत्तापासून तुला मुभा आहे, तुला हवं तेवढं शिक आणखी. पी एच डी पूर्ण कर. आणखी काही वाटत असेल तर तेही सांग. आमचा पूर्ण पाठींबा आहे तुला. मी तो व्हिडीओ काढला ग्रुपवरून सर्वांची माफी मागून आणि तुझ्या आजीचे विशेष आभार मानून. त्यांना म्हटलं, आता व्हिडीओ नाही पाठवणार तुमच्या नातीने तिच्या मनासारखी कर्तृत्वाची उंची गाठली, की पेढे घेऊनच येणार तुमचं तोंड गोड करायला.
रुहीला अनपेक्षित होतं सारं. आजीच्या एका स्पष्ट प्रतिक्रियेने सगळं पालटलं. ती प्रतिक्रिया चांगल्या अर्थाने मनावर घेणाऱ्या आपल्या सासरच्या लोकांचही तिला कौतुक वाटलं. आता सर्व तिच्यावर होतं. तिने ते त्या क्षणापासून मनावर घेतलं आणि आपल्या स्वप्नाला पूर्ण करायची तयारी सुरू केली, पण त्याआधी आजीला इमोजीतून गोड पप्पी पाठवून दिली.......
आपल्या दुधावरच्या सायीकडून आलेल्या त्या इमोजीकडे बघून आजीला गोड हसायला आलं. तिने त्वरित तीन लाल रंगाच्या बदामांंबरोबर 'तू उत्तुंग यशाच्या पायऱ्या गाठो', असा आशीर्वाद रुहीकडे धाडून टाकला!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article