कौटुंबिक
मराठी कथा
बळीचा बकरा.........!!
रविवार, १४ मार्च, २०२१
जरा ते बटन चालू कर ना, मला बाबा शॉक लागतो तिथे, असं म्हणत गिझर सुरू करायला गेलेली पंचमी झटकन मागे हटली.
आहा ग!! म्हणजे मला लागला तर चालेल शॉक. मी काय लाकडाचा बनलो आहे का?
हे बरय तुझं, सगळया रिस्की कामात नवऱ्याला पुढे ढकलायचं. तो कोरोना नवीन होता तेव्हा पण मलाच पाठवायचीस भाजी अन् सामान आणायला.
जणू मी वरून येताना अमरपट्टाच घेऊन आलोय!! कोरोना माझं काही वाकडं करणारच नव्हता ना!! नेहमी बायकोच्या मदतीसाठी तत्पर असणारा पुष्कर आज मात्र उगाच अंगात आल्यासारखा वागत होता.
ते पाहून पंचमीचीही सटकली, अन् चवताळून त्याच्यासमोर हातवारे करत म्हणाली, सांग ना काय वाकडं केलं तुझं त्या कोरोनाने? घरी बसून किती विविध प्रकारचे आरोग्यवर्धक काढे उतरवले मी तुझ्या नरड्यात. शिवाय सकाळ संध्याकाळ तू नको नको म्हणत असताना सुद्धा तुझ्या नाकातोंडावर गरमागरम वाफारे मारले ते वेगळेच. लग्नाच्या पंधरावर्षात घेतली नाही तेवढी काळजी घेतली मी तुझी कोरोनाकाळात!!
न घेऊन करतेस काय? बकरा टणटणीत राहिला पाहिजे होता ना हवा तेव्हा हलाल करायला!!
मला काय कळत नाही वाटतं तुला?
मला जिथेतिथे फ्रंटफुटवर टाकून तू आपली बिनधास्त!!
कालसुद्धा मध्यरात्री कुणी बेल वाजवली, तेव्हाही मला गाढ झोपेतून उठवलस, म्हणे तू बघ मला भीती वाटते. अरे मी म्हणजे कोण सुपरमॅन आहे की काय? मला पण वाटते भीती!!
पण ती तू दाखवत नाहीस ना? तुला बायकोसमोर मोठं व्हायचं असतं. सशाचं काळीज असलं तरी वाघाचं म्हणून मिरवून घ्यायचं असतं त्याला मी काय करणार? मी आपली जेव्हातेव्हा सांगून मोकळी होते, मलाs बाईs भीतीs वाटते.
गॅस बदलायची वाटते, कुठून डायरेक्ट प्लग ओढून काढायची वाटते, स्टुलावर चढून वरचं काही काढायची वाटते, अंधाराची वाटते, पाली आणि झुरळा़ंची सुद्धा वाटते. पंचमी अगदी प्रामाणिकपणे सत्य परिस्थिती मांडून मोकळी झाली.
त्यावर पुष्कर मात्र खी खी करत म्हणाला, एवढुशे ते निरुपद्रवी प्राणी, तुझ्या कर्णकटु किंचाळण्याने तेच अर्धमेले होतात खरंतर!! तूच त्यांना घाबरवून सोडतेस महिती आहे का? तरीही तुला त्यांना बाहेर काढायला मी लागतो.
काम काय असतं तसंही घरी आल्यावर तुला? तेवढाच तुझाही टाईमपास होतो ना? पंचमीही चांगली शिरजोर होती.
ते पुष्कर ओळखून होता. आठवून आठवून एकेक मुद्दे काढत होता तोही. डोक्याला हलकासा ताण दिल्यावर त्याच्या डोळ्यासमोर बऱ्याच गोष्टी आल्या.
तसा तो म्हणाला, नवीन काही पदार्थ केला की पहिले मी खायचा, शिळा राहिला तरी मी चाखून बघायचा. मी खाऊन जिवंत राहिलो तर तुम्ही तोंड लावणार!!
त्या उंदरासारखी गत करून टाकलीये तू माझी, सतत आपले माझ्यावरच प्रयोग.
आणि इतकं असूनही रात्रंदिवस माझ्या नावानेच ठो ठो करत बसायचं. बरं जमतं ग तुला!!
आज काही स्वारी ऐकण्याच्या मूडमध्ये नाही, हे बघून पंचमीने तिचा पवित्रा बदलला. तेवढी लवचिकता तिच्यात नक्कीच होती. ती लाडाने पुष्करच्या जवळ गेली. त्याचे दोन्ही हात पकडून म्हणाली, तुझ्याशिवाय आहे कोण माझं? एकुलता एक नवरा ना तू माझा.
त्यानेही पुष्करला त्रास झाला, तिला झटकून तो म्हणाला, मग माझ्या काय दहा बायका आहेत का?
एकुलता एक म्हणतेस अन् सगळीकडे पुढं करतेस!! बरं करतेस ते करतेस, आभारचे दोन शब्दही निघत नाहीत कधी तोंडातून. सदा आपली व्हसव्हस!! कुठल्या नवऱ्याला काय करावं वाटेल?
आता आपल्या आपल्यात कसलं आभारप्रदर्शन करत बसायचं? कित्ती गोष्टी आपण एकमेकांसाठी करत असतो दिवसभरात. कसं वाटेल हे झालं थँक्यू बोला, ते झालं थँक्यू बोला. पंचमीला तर इतकसं बोलतानाही हसायला आलं.
मग हे झालं खेकसा, ते झालं खेकसा फार छान वाटतं नाही का? पुष्करचा मामला मात्र अजूनही गंभीरच होता.
अरे तू तर माझा बळीचा....सॉरी प्रेमाचा माणूस आहेस ना रे!! तू कसा ऑफिसमध्ये काही झालं की घरी येऊन चिडचिड करतोस, तसच माझंही होतं.
तू समोर आलास की दिवसभरात मी काय काय झेललं हे आठवून डोकं आणखी तडतड करायला लागतं. मग होते थोडी चिडचिड.
प्रेम पण तुझ्यावर, राग पण तुझ्यावरच ना?....... आतातरी त्या गिझरचं बटन सुरू कर ना रे, पंचमीच्या या लाडिक आर्जवाने मात्र पुष्कर पाघळला. त्याने झट्कन बटन चालू करून दिलं,आणि म्हणाला, काय घाबरतय? कुठे बसला शॉक?
मला बसतो रे. मी आहे बाबा घाबरट, म्हणून तर तुला पुढे करते ना? शूरवीर नवरा ना तू माझा!!
पंचमी हे बोलली तशी पुष्करची छाती अभिमानाने फुलून आली, आणि तो म्हणाला, मी असताना तुला घाबरायची गरज नाही. खुशाल मला सांगत जा काही पण.
ते ऐकून पंचमीला फारच भरून आलं. तिला वाटलं, दोन शब्द काय कौतुकाचे बोलले, माझा बकरा हसत हसत हलाल व्हायला तयार झाला. कितीतरी वेळा रडत असते मी, माझं कोणी कौतुकच नाही करत म्हणून, पण तोही आपल्या शाबासकीची वाट बघतोय, हे लक्षातच नाही आलं माझ्या कधी..........
ती पटकन त्याच्याजवळ गेली, आणि त्याला मिठी मारून म्हणाली, तू आहेस म्हणून मी निर्धास्त!!
अन् तिच मिठी आणखी घट्ट करत तो तिच्या कानात पुटपुटला, सेम हिअर........
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article