कंटाळायन.........!!


रात्रीची जेवणं झाली. सर्व आवरून दिप्ती पलंगावर आडवी झाली.  बाजूला तिची मुलगी येऊन लवंडली. तसं तिला आठवलं, स्वैपाकघरातला दिवा बंद करायला विसरलोच आपण. तिने नवऱ्याकडे पाहिलं, तो पडल्यापडल्या डाराडूर झाला होता. 
मुलीला म्हणाली, जा ना तेवढा दिवा बंद करून ये आतला. मी विसरले ग.

तशी मुलगी एकदम म्हणाली, ए मी नाही हं. तूच जा. मी आता पडले. मला येतो कंटाळा एकदा पडलं की उठायचा.

ते ऐकून दिप्तीला तर आता हिला काय बोलावं तेच कळेना झालं. उत्तर ऐकूनच एक ठेवून द्यावी वाटली तिला, पण तो तिचा स्वभाव नव्हता. 
ती आपली शांतपणे म्हणाली, अगं तू केवढी मी केवढी. आताशी नाही बारा वर्षाची तर एकदा पडलं की उठायचा कसला कंटाळा येतो ग तुला?
तू माझी बरोबरी करू नकोस हं जिथे तिथे. चांगलं काही उचलणार नाही तुम्ही आयाचं, नको ते बरोबर उचलता ग!!

आई आता झोपताना लेक्चर नको तुझं, म्हणत तिच्या मुलगी दुसरीकडे तोंड वळवून घेतलं.

पण दिप्तीला लेक्चर द्यायचच होतं. तिने आपलं तोंड सुरूच ठेवलं. खूप दिवस बोलायचं होतच तिला या विषयावर. 
तिने मुलीला हलवलं, आणि म्हणाली, झोपेचं ढोंग करू नकोस. एवढा कसला ग आळस भरलाय तुझ्या अंगात? आम्ही तुझ्याएवढ्या होतो ना, तेव्हा आम्हाला तर एकदा उठलं की रात्रीपर्यंत आडवं पडायला द्यायचच नाही कोणी. तुम्ही बघावं तेव्हा गाढवासारखं लोळत असता. जरा आई थकून आडवी झाली की मागोमाग येताच तुम्ही लोळायला. काय करून दमता कोणास ठाऊक?

आई मी बंद करून येते लाईट पण तू शांत झोप असं म्हणत तिची मुलगी उठली आणि काम करून आली. 

दिप्ती, ती जाऊन येईपर्यंत एक मिनिट चुपचाप बसली तेवढीच, पोरगी आल्यावर परत सुरू झाली.
तुझ्यासारख्या मुलीने दिवसभर कसं उत्साही असलं पाहिजे. आम्ही बाई सदैव उत्साहाने सळसळतच असायचो. कंटाळा शब्द लहानपणी आम्हा पोरींना माहीत नव्हता, ना आमच्या घरातल्या बायांना.

ती हे बोलताच तिची मुलगी एकदम म्हणाली, मग आता कसा माहीत झाला तुला? आणि तुला माहीत झाला म्हणून मलाही. आई कंटाळा तुझ्यातूनच माझ्यात आला. तुझ्या तोंडून ऐकलं नसतं, तर मीही कधी बोलले नसते. आणि मलाही तो कधी आला नसता.

आता मात्र दिप्ती तोंडात मारल्यासारखी गप्प झाली. तिने बोलणं थांबवलं. अन् डोक्यात विचार सुरू झाले. खरंच हा कंटाळा आता माझ्यात कुठुन आला? लहानपणी आईला,आजीला चार साडेचार वाजता उठून काम करताना बघितलं. अगदी सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं साग्रसंगीत असायचं. धुणी भांडी, केरवारे काढण्यापासून ते पापड लोणची करताना सगळं बघितलं आपण. बघितला नाही तो कंटाळा. छे बाई मला कंटाळा आला बोलल्याचं आठवतच नाही कधी. दुपारी टेकल्या तर अर्धा तास पाठ टेकायच्या. तेवढाच काय तो आराम. 
आई तर नोकरीही करायची. साध्या एस टी चा प्रवास होता दिड दोन तासाचा, तरी येऊन आंबलेली शिणलेली, दमले म्हणून आल्या आल्या आडवी पडणारी अशी कधी दिसलीच नाही ती आपल्याला.
तिच्याकडे नव्हता कंटाळा म्हणून आपल्याला तेव्हा तो माहीतच झाला नाही.

आता त्यांच्यापेक्षा जास्त सुखसोयी आहेत दिमतीला. तरी बघावं तेव्हा कंटाळा का आलेला असतो आपल्याला? 
आणि आपलं बघून मुलीलाही!!  
चोरपावलांनी कधी शिरला हा कंटाळा कळलंही नाही आपल्याला. आज मुलगी बोलली नसती तर कदाचित अजूनही जाणीव नसतीच. 
जाऊदे कंटाळा आला म्हणून किती गोष्टी पुढे ढकलतो दिवसभरात आपण!! 
विचार करता करता बरंचकाही समोर आलं तिच्या. रोज अगदी न चुकता सकाळ सकाळी फिरायला येते का म्हणून फोन करणारी मैत्रीण, अन् त्यावर आज कंटाळा आला, उद्या नक्की म्हणून तिचं महिनाभरापासून टोलवणं. सकाळचा अर्धा तास  स्वतःसाठी काढण्यासाठीची टंगळमंगळ. पोटभरीचा नाष्टा करायचा आणि केला तर खायचाही कंटाळा. कपाट शेवटचं कधी लावलेलं हेही आठवत नव्हतं तिला. घराचा कोपरा अन् कोपरा नीटनेटका होण्यासाठी वाट बघताना समोर आला तिच्या. 
तिला वाटलं, आपला हा कंटाळा छोट्या मोठ्या सगळ्या कामांना एकेक दिवस पुढे ढकलतोय फक्त. इतर दिवशी ऑफिसचं काम म्हणून अन् सुट्टीच्या दिवशी आराम हवा म्हणून काहीच करु न देणारा कंटाळा सवयीचाच झालाय आता.
दिवसातून कितीतरी वेळा अजाणतेपणी मुलीसमोर बोलत असेन मी, म्हणूनच तर तिने घेतला असेल ना माझा कंटाळा.  
विचार करत करतच दिप्तीला गाढ झोप लागली. सकाळी नेहमीप्रमाणे मैत्रिणीचा फोन आला, तर ती म्हणाली, मी तयार आहे कुठे येऊ बोल?
मैत्रीण तर ऐकून चाटच पडली. आणि फिरून आल्यावर मुलगीही!! 
आठवडाभर बघितलं तिनेही, आईमधला बदल तिलाही खूपच रुचला. अन् रात्री झोपताना एक दिवस ती म्हणाली, आई उद्या मला लवकर उठव हं तुझ्याबरोबर. तू नेहमी म्हणायचीस ना, सकाळी लवकर उठून केलेला अभ्यास सर्वात चांगला. मी उद्यापासून सुरू करणार आहे आता. खूप झोप काढल्या इतके दिवस. 

दिप्तीने तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला प्रेमाने जवळ घेतलं. मनात म्हणाली, सुधारण्याची गरज तर मला होती, आणि मी मात्र उगाच तुझ्या मागे लागले होते..........

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel