मराठी कथा
सामाजिक
तिच्या संसाराची गोष्ट........!!
शनिवार, २१ डिसेंबर, २०१९
मला अनुकडे बघून नेहमी नवल वाटतं. पंधरा वर्ष झाली असतील लग्नाला. ती अजूनही तिच्या सासुसासऱ्यांना धरून राहतीये. दोन खोल्यातला सहा माणसांचा संसार अगदी छान नेटाने करतीये.
नवीन लग्न होऊन आली तेव्हा हाच संसार तिला धरून सात माणसांचा होता, पुढे तिची दोन मूलं धरून तो नऊ माणसांचा झाला.
त्यावेळी अनु दिसायला खूप सुंदर होती. मोठी मोठी स्थळं तिच्यासाठी येत होती. पण हिला आवडला अमोल. अगोदर तिच्याच कॉलेजमध्ये होता. तिला दोन वर्षे सिनिअर. नुकताच नोकरीला लागला होता.
अनुच्या घरी ही सेकंड इयरला असतानाच लग्नासाठी स्थळं शोधणं सुरू झालं होतं.
मग एके दिवशी हिनेच स्वतःहून सांगितलं, माझं अमोलवर प्रेम आहे. मी त्याच्याशीच लग्न करणार म्हणून.
तिच्या घरच्यांना नुकताच नोकरीला लागलेला, सर्वसाधारण परिस्थिती असलेला अमोल अजिबात मान्य नव्हता.
त्यांनी त्यांच्या नात्याला ठाम नकार दिला आणि तिच्यासाठी स्थळं शोधणं सुरूच ठेवलं.
अनु आणि अमोलला पळून जाण्याशिवाय काही पर्याय उरला नाही.
अमोलच्या घरच्यांची परवानगी होती, त्यामुळे एक दिवस दोघांनी त्यांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने लग्न केलं.
अमोलचं घर दोन खोल्यांचं तर होतंच, पण माणसांनी भरलेलंही होतं.
ती लग्न होऊन आली तेव्हा दोन्ही नणंदा कॉलेजला जात होत्या. दिर दहावीत होता.
सासूचं सोवळं- ओवळं एकदम कडक होतं. सगळा कारभार शिस्तीचा होता. सकाळी साडेपाचपर्यंत उठायला लागायचं. सासरे सात वाजता निघायचे, त्यांचा डबा तयार हवा असायचा. साडेआठला अमोल निघायचा. सगळी कामं आटपेपर्यंत अकरा वाजवायचे, थोडंस निवांत होतंय तोपर्यंत दिर शाळेतून आणि नणंदा कॉलेजवरून यायची वेळ व्हायची.
मग पुन्हा जेवणखाण आणि उरलेली काम सुरू व्हायची.
दुपारी थोडं टेकायला मिळतंय न मिळतंय तोच सासूबाईंनी चहाची वेळ व्हायची.
नंतर पुन्हा सगळा रहाटगाडा सुरू व्हायचा.
लग्नानंतर देवाला काय गेले तेवढंच एकटेपणाचं सुख तिला मिळालं असेल. बाकी माणसाच्या गराड्यातच तिचा संसार सुरू होता. आणि तिची त्याबद्दल तक्रारही नव्हती.
सासू वाईट नव्हती, आणि तितकी चांगलीही नव्हती. सगळ्यांच्या सगळ्या वेळा पाळल्या की खूष असायची.
पुढच्या पाच वर्षात हिला दोन मुलं झाली.
पुढे दोन चार वर्षात दोन्ही नणंदांची लग्न झाली.
तोपर्यंत हिची दहा वर्षे सरून गेली. कसं तिनं निभावलं तिचं तिलाच माहीत. कदाचित अमोलच्या प्रेमामुळेही असेल!! कारण कोणाला नाही पण त्याला तिचं खूप कौतुक होतं.
तिने आपल्यासाठी काय सोडलंय, काय काय केलंय याची त्याला पूर्णपणे जाणीव होती.
तो ते तिलाच नाही तर इतरांनाही बोलून दाखवायचा. त्यामुळेच बहुतेक तिने तग धरला असावा. स्वतःची मर्जी बाजूला ठेऊन घरातल्या प्रत्येकाची मर्जी संभाळून त्यांना खूष ठेवलं असावं.
पुढे तर अमोल चांगला सेटलही झाला होता. त्यांनी नवीन जागाही घेतली होती. सर्वाना वाटलं, अनु आता वेगळी होणार. आणि तसं तिने केलं असतं तरी त्यात वावगं नव्हतं, आतापर्यंत ती सर्वांसाठी सर्वकाही करत आली होती.
पण नवीन जागेत ते राहायला गेलेच नाहीत. तिचं म्हणणं होतं, ऐन उमेदीची वर्ष मी इथे काढली, आता सासूसासऱ्यांना सोडून का जायचं? आणि त्यांना घेऊन जायचं तर ते दोघे आपलं एवढ्या वर्षाचं घर सोडायला तयार नव्हते. त्यांचा त्या जागेत जीव अडकला होता.
त्यामुळे नवीन घर तसंच माणसांच्या प्रतीक्षेत पडून होतं.
पुढे काही वर्षांनी दिराचही लग्न झालं. सर्व अनुला म्हणायचे आता तुला आराम मिळणार. जावेकडून कामं करून घे चांगली, तिलाही शिकव तुझ्यासारखं सगळं.
तिलाही वाटलं, आता आपण निवांत होऊ.
पण निवांतपणा तिच्या नशिबीच नव्हता. अनु आल्यावर तिला जशी शिस्त सासूने लावली, तसं काही जावेबरोबर झालंच नाही. तिच्याकडून कोणी काही अपेक्षा केलीच नाही.
तिला कोणी लवकर उठायला सांगितलंच नाही. तिला कोणी कामांची लिस्ट दिलीच नाही. ती आपली मस्त आरामात होती. बरं, अनु काम करतीये, हे पाहून सुद्धा तिला हालावसं वाटत नव्हतं.
अनुला वाटलं, सासूबाई बोलतील. पण त्याही गप्पच. मग वाटलं, नवलाई संपल्यावर ती मदतीला येईल. पण तेही झालं नाही.
जावेची नवलाई संपायची नावच घेत नव्हती.
मग अनुनेचे तिला सगळं समजावलं. पण ते तिला समजलच नाही, आणि अगदी सहा महिन्यातच तिने दुसरं घरही केलं.
अनुला वाटलं, मी इथे सगळ्यांचं करून करून एवढी वर्षं काढली, आणि ही सहा महिन्यातच पळाली. आणि हिच्या नावाने कोणी ओरडतही नाहीये.
मग मीच वेडी होते बहुतेक!! पण तिने ते सगळं मनातून काढून टाकलं आणि पुन्हा नव्याने आपल्या जुन्याच मार्गाला लागली.
ह्या अनुबद्दल मला कोणी तोंडी सांगितलं असतं, तर मला कदाचित विश्वासच बसला नसता. कारण त्या घरगुती सिरियलमध्येही सगळी कामं हसऱ्या चेहऱ्याने करणाऱ्या, आपल्याला कोणी दुखावलं तरी त्यांचं हित चिंतणाऱ्या सूना बघितल्या की मला रागच यायचा त्यांचा.
मला वाटायचं, एवढा सोशिकपणा खरंच असेल का कधी कुणाच्या अंगी?
पण ह्या अनुला मी गेली दहा वर्षे ओळखत आहे. आम्ही बऱ्यापैकी जवळच्या आहोत, तिने खोच नक्कीच सांगितली मला, पण कुणालाही दूषणं न देता.........
सर्वांंना सामावून घेणारी ती, संसारात अगदी लोणच्याप्रमाणे मुरलेली वाटली मला, सहजशक्य नाही कोणाला ते!!
खरंच तिला भेटले नसते, तर समोर येईल ते सर्व न कुरकुरता हसत हसत झेलणारी माणसं असतात, हे कधी कळलंच नसतं मला!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Previous article
Next article