पालकत्व
मराठी कथा
सामाजिक
अन् ती अवेळीच मोठी झाली......!!
रविवार, १५ डिसेंबर, २०१९
लतिका कमालीची अवखळ. खूप बडबड आणि दंगामस्ती करणारी होती. पटकन कोणाशीही तिची मैत्री व्हायची. एकदम स्मार्ट दिसायलाही आणि वागायलाही!!
पण तिच्या मनासारखं तिला वागायला मिळालं, ते फक्त वयाच्या बाराव्या वर्षापर्यंतच.......
ती दहा वर्षाची झाली तेव्हापासूनच तिच्या घरी थोडी थोडी भुणभुण चालू झाली. स्पष्ट कोणी काही बोलत नव्हतं, पण आता तू असं नको वागू. जास्त खेळायला जात जाऊ नकोस, उगाच फिदीफिदी हसत जाऊ नकोस, ह्याच्या त्याच्याबरोबर बोलू नकोस, आता तू मोठ्ठी होणार. लोकं नाव ठेवतील मग!! वगैरे बोलणं सुरू झालं.
लतिकाला वाटायचं, मोठी होणार तर काय झालं, मोठ्याने हसलं तर काय होतं? कोणा बरोबर बोललं तर काय होतं?
ती आपली मनाला येईल ते करायचीच. आणि बरेचदा मग घरच्यांचा भरपूर मार खायची.
हळूहळू मात्र घरच्यांच्या सारख्या सारख्या त्याच गोष्टीवरून बोलण्याचा तिच्या मनावर सुप्त रितीने परिणाम होऊ लागला.
तिच्या वयाच्या मुलींपेक्षा तिला जरा लवकरच पिरियड्स आले. सहावीतून सातवीत जाताना.
ते आले काय आणि हिचं सगळं वागणच बदललं. तिच्या आईने आणि आजीने तिला आता तुला कसं वागलं पाहिजे, कसं राहील पाहिजे, या दिवसात खेळायला जायचं नाही. संध्याकाळी घराबाहेर पडायचंच नाही. आता उगाच हसाखिदळायचं तर नाहीच. हे सारं सारखं बोलून बोलून तिच्या अंगातच भिनवलं.
या सगळ्यामुळे एवढी अवखळ मुलगी अगदी गंभीर बनून गेली. अचानकच प्रौढत्व आल्यासारखं वागायला लागली.
तिच्या बरोबरीच्या मैत्रिणींना पण हळूहळू पिरियड्स सुरू झाले. पण घरातून जास्त काही बंधनं नसल्यामुळे त्या त्यांच्या मूळ स्वरूपातच राहिल्या. त्या तिला म्हणायच्याही अचानक एवढी मोठी कशी झाली तू? किती सिरीयस राहतेस?
ती म्हणायची, मुलींनी पिरियड्स यायला लागल्यावर असंच वागलं पाहिजे. मला नाही आवडत आता लहान मुलांसारखं खेळायला, नाचायला, बागडायला.
तिच्या सर्व मैत्रिणी पूर्वीसारखंच खेळायच्या आणि ही मात्र बाल्कनीतून मोठ्या माणसांसारखं त्यांना बघत बसायची.
एवढंच नाही, तर तिही तिच्या घरच्यांप्रमाणेच तिच्या मैत्रिणींना शिकवू पहायची.
असं बोलू नका, असे कपडे घालू नका, मुलांबरोबर खेळू नका, असं बरच काही.
खरंतर त्या मैत्रिणींनाच कसतरी वाटायचं, तिला बघून.
छान हसत खेळत राहणारी लतिका, पिरियड काय आले आणि बदलूनच गेली. ती सर्वांनाच अकाली मोठी झाल्यासारखी वाटायची.
तिच्या जवळच्या मैत्रिणीला मनालीला, पण तिने तोडून टाकलेलं, ती मोठी झाली आणि लहान मुलांसारखं वागते म्हणून. शेवटी मनालीने एक दिवस आपल्या आईला सांगितलं, सांग ना ग समजावून तिच्या घरच्यांना, बघ ना कशी एकदम मोठी झाल्यासारखं वागते ती. खेळत पण नाही आमच्याशी आता.
मनालीच्या आईला पण लतिकामधला फरक दिसतच होता.
एक दिवस तिने लतिकाच्या आईला काही काम काढून घरी बोलावले.
आणि बोलता बोलता लतिकाचा विषय काढला. पिरियडसवरून जेव्हा विषय सुरू झाला तेव्हा, लतिकाची आईच सुरू झाली, अगं मी तुला बोलणारच होते. तू मनालीला किती मोकळं सोडलयस. आता त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पिरियडस् मध्ये रात्रीचं बाहेर पण सोडायचं नाही. चांगलं नसतं ते. बाहेरची बाधा होते. आणि तिला समजाव जरा मोठ्यांसारखं उठलं बसलं पाहिजे म्हणून.
त्यावर मनालीची आई म्हणाली, काही नाही होत बाहेरची बाधा वगैरे. कधी बाहेर पडणार जुन्या विचारातून आपण? मला उलट तुलाच सांगायचं होतं , लतिका आपलं बालपणच हरवून बसलीये.
आताशी सातवीत आहे ती. चेहऱ्यावर भाव लग्नाला आल्यासारखे आहेत तिच्या. का तिला एवढ्या लवकर मोठं करताय? पिरियड येणं एक शरीराची नैसर्गिक अवस्था आहे.
अन् त्याचं भांडवल करून तिची नैसर्गिक वाढ का खुंटवताय? का नसती बंधन लादताय तिच्यावर?
वाढत्या वयाचा आनंद घेत हळूहळू मोठं होऊ दे ना तिला!!
पण हे सगळं लतिकाच्या आईला अजिबात पटतच नाही. ती तोंड वाकडं करून निघून जाते. त्यांना वर्षांनुवर्षे चालू असलेली सिस्टिम फॉलो करण्यातच आनंद वाटतो. मग मुलीचं मन का मारलं जाईना.
लतिका तशीच अकाली मोठी झालेलीच राहीली, तिच्या मैत्रिणींनी जो टप्प्याटप्प्याने मोठं होताना आनंद घेतला, तो तिला मिळाला नाहीच.
अवेळी मोठी झालेल्या तिच्या, मनातली दंद्व वाढायला लागली. तिचं मन स्वतःला मोठी झाली असे समजून नको तिथं आकर्षित व्हायला लागलं. लहान वयातच तिची प्रकरणं गाजू लागली. घरात तिला समजून घेणारं कोणीच नव्हतं, फक्त मोठी झाली म्हणून पन्नास सूचना करणारेच होते आणि काही चुकलं तर धोपटून काढणारे होते. हवं तसं धोपटताना मात्र ती मोठी झालीये, हे त्यांना आठवत नव्हतं.
ह्या लतिकेची ही गोष्ट तीस वर्षांपूर्वीची आहे. पण अगदी आताही बऱ्याच ठिकाणी मला तिच्या घरच्यांसारखी पिरियड्सच अवडंबर माजवणारी, त्याला वेगळं महत्व देणारी माणसं अगदी अजूनही भेटतात, तेव्हा मला ही लतिका हमखास आठवते. माझ्या परीने मी त्यांना समजवायला तिची गोष्ट सांगते.
आज म्हटलं तुम्हालाही सांगावी, बघा पटतेय का......!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार : गुगल
Previous article
Next article