अटेन्शन सिकर.........!!


मागच्या आठवड्यातलीच गोष्ट, मी बाजारात भाजी घेतली, आणि पुढे येतेच तेवढ्यात एक साधारण पासष्ट  वर्षाच्या आजी पायात काहीतरी अडकलं, म्हणून चालता चालता माझ्यासमोर दणकन पडल्या. मला स्वतःलाच एकदम काय झालं कळलं नाही. मी पटकन त्यांना पकडायला गेले, पण त्याहून झटकन त्या उभ्या राहिल्या, आणि काही नाही झालं मला करत मला धन्यवाद देऊन निघूनही गेल्या.
मला खूप आश्चर्य वाटलं, त्यांनी पडल्याचं काही अवडंबर माजवलं नाही. वास्तविक त्यांच्या वयानुसार त्यांनी ते माजवलं असतं तरी चाललं असतं, पडल्या म्हणून कुणी त्यांना खुर्चीवर बसवलं असतं, कुणी पाणी आणून दिलं असतं, कुणी ज्युसही मागवला असता. कुणी त्यांना घरीही सोडायला आलं असतं, पण यातलं एकही न होता, कुणाची इतकीशीही सहानभूती न घेता त्यांच्या त्या उठून गेल्याही!!

खूप कौतुक वाटलं मला त्यांचं!!!
नाहीतर कित्येक लोकं मी अशी पाहिलीयेत जे आपल्या  वयाचं, दुखण्याखुपण्याचं, अगदी कुठल्याही गोष्टीचं भांडवल करत बसतात. 
लोकांचं लक्ष वेधण्यासाठी सतत तरफडत असतात.

माझ्या ओळखीतली स्वरा ही त्यातलीच!! साधी सर्दी जरी झाली तरी आss ऊss करत बसणार. पहिल्या प्रेग्नन्सीसाठी माहेरी आली तर भेटायला येणाऱ्या प्रत्येकापुढे इवळत बसायची.
सतत हे होतंय ते होतंय करून आईला तर नुसतं सळो की पळो करून सोडलेलं तिने. आईच्या वयाचंही भान नव्हतं तिला, माझे नखरे झेलावेत बस्स!! आई बिचारी प्रत्येक गोष्ट हातात द्यायची, तरी तिचं आईsग ऊईsग चालूच असायचं.

दुसरे एक आजोबा, माझ्या नेहमीच्या पाहण्यातले.
कट्ट्यावर बसलेले असतात त्यांच्या समवयस्क मित्रांसोबत.
एकदा सुरू झाले की थांबताच नाहीत. मित्रांना फक्त ऐकायचं काम. त्यातून मधेच उगीचच दुसऱ्याची थट्टा करत असतात, किंवा असाच काहीतरी पंच टाकत असतात, आणि दुसऱ्यांनी त्यावर रिऍक्शन दिलीच पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो, नाहीतर त्यांना लगेच राग येतो. दुसऱ्यांना वाव देतच नाहीत.
या वयातही सेंटर ऑफ ऍक्ट्रक्शन बनण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात. 

तशाच माझ्या एका मैत्रिणीच्या सासूबाई!! माझ्या मैत्रिणीने जरा कुठे तिच्या नवऱ्याबरोबर,पोरांबरोबर आऊटिंगला जायचा प्लॅन बनवला की या स्वतःचं काहीतरी दुखणं काढून त्यांच्यात मोडता घालणारच. कशातूनही वगळलेलं त्यांना चालत नाही. बरं आणि बरोबर नेलं की या दुसऱ्याला  कशाचा आनंद घेऊनच देत नाहीत. बाहेरही यांची चोख सबराई झाली पाहिजे, असाच त्यांचा हट्ट असतो. 
कितीही समजावलं तरी या आपलं तेच खरं करतात अगदी कुठेही!!

तसं तर प्रत्येकाचीच आपल्याला थोडंफार अटेन्शन मिळावं ही इच्छा असतेच. नैसर्गिकही आहे ते थोडंसं. अगदी लहान मुलं पण नाही का जरा त्यांचं कौतुक केलं की तिच गोष्ट पुन्हा पुन्हा करून दाखवतात. त्यांना ते शोभतंही!!
पण मोठ्यांची लक्ष वेधून घेण्याची धडपड मात्र बरेचदा हास्यास्पदच ठरते.

सोशल मिडियावर तर अटेन्शन सिकरवाल्यांचा काय सुकाळच आहे म्हणा, छोट्या छोट्या गोष्टीचं मोठं मोठं कौतुक करून घेणाऱ्यांचा तर हाss मोठ्ठा भरणा भरलाय.
त्याविषयी काय बोलणार ते तर तुम्हा आम्हा साऱ्यांना चांगलंच माहिती आहे.

थोडं सगळंच चांगलं नाही का, पण अट्टाहास कशाचाही वाईटच, काय म्हणता??


©️ स्नेहल अखिला अन्वित


फोटो साभार: गुगल

 
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel