स्त्रीधन.........!!

बाळंतपणासाठी तीनचार महिने माहेरी गेलेली पौरवी नुकतीच बाळाला घेऊन सासरी परतली. पहिला आठवडा तर बाळाबरोबर नवीन जागी ऍडजस्ट करण्यातच गेला. शिवाय तिच्या माहेरी आई प्रत्येक गोष्ट हातात देत होती. मुलीला जास्तीत जास्त आराम मिळेल, याची काळजी घेत होती. इथे सासूबाई त्यांच्या परीने करत होत्या, मात्र आई आणि सासुमधला फरक साहजिकच जाणवत होता पौरवीला. पण तिने त्याची मानसिक तयारी ठेवली असल्याने तिला तेवढं काही वाटलं नाही इतकंच.

बाळाचं बारसं माहेरीच झालं होतं, बाळाला कोणी कानातले डुल दिले होते कोणी, पायातले पैंजण, कोणी वाळे, कोणी सोन्याची साखळी. आल्यापासून ते सर्व नीट लॉकरमध्ये ठेवायलाच मिळालं नव्हतं तिला. मग एक दिवस दुपारची सवड काढून तिने ते सर्व आपल्या बॅगमधून काढलं. लॉकर उघडला, त्यात सर्व ठेवलं. त्याबरोबर तिचं एकपदरी मंगळसूत्रही होतं, ते ही तिने आत ठेवायला त्याची डबी काढली. डबी उघडली तर तिला आठवलं यात माझी माळ होती सोन्याची. हो, यातच ठेवलेली मी. ती कशी नाही? मग तिला वाटलं, आपला काहीतरी घोळ होतोय. दुसऱ्या कशात असेल.  म्हणून लॉकरमधून तिने सर्व बॉक्स बाहेर काढले. एकेक उघडायला घेतला, तर प्रत्येक रिकामा दिसत होता. छातीत धस्स झालं एकदम तिच्या. हा काय प्रकार आहे? माझा हार, माझे तोडे, माझी माळ, माझ्या दोन साखळ्या, माझ्या बांगड्या, माझे तीन चार कानातले कुठं गेलं सगळं?
तिला काही कळेना? तिने सासूबाईंना बोलावून सर्व  दाखवलं. रडता रडू थांबत नव्हतं तिचं. हे असं काही होईल याची अपेक्षाच नव्हती तिला. 

सासूबाई म्हणाल्या, मी तर तुला घेऊन जायला सांगत होते सगळं जाताना माहेरी. 

पौरवी म्हणाली, मला वाटलं, त्यात काय एवढं. आपली माणसं तर आहेत इथेही. आपल्याच माणसावर अविश्वास दाखवणं मला योग्य वाटलं नाही हो. 

तिचं ते बोलणं ऐकून सासूबाईंना पण रडू फुटलं, आणि त्या म्हणाल्या, कुलदेवतेची शपथ घेऊन सांगते बाई तुला, मला काहीच माहिती नाही ग यातलं.  

पौरवीला काही कळेचना. कल्पनेपलीकडलं घडलं होत सारं.....
तिने ताबडतोब आपल्या नवऱ्याला, अंकुशला फोन लावला. पण तिचं बोलणं धड ऐकून न घेताच, मी आता कामात आहे, घरी आल्यावर बोलूया म्हणून त्याने फोन बंद करून टाकला. पौरवीला वाटलं, कितीही कामात असला तरी आपली बायको काळजीत आहे, त्रासात आहे म्हटल्यावर दोन शब्द जरी नीट बोलला असता, तरी मन थोडं शांत झालं असतं माझं. आवाजावरूनही दुसऱ्याचं दुःख ताडतो आपण, याला आपल्या बायकोचीच मानसिक स्थिती कळू नये?

पौरवीचं मन अजिबात थाऱ्यावरच नव्हतं. आई काळजीत पडली असती म्हणून तिलाही लगेच सांगणं पौरवीला बरं वाटलं नाही. सासूबाई मात्र तिचं मन सांभाळत वागत होत्या दिवसभर. 
एकेक क्षण सरता सरत नव्हता. कधी एकदा अंकुश येतोय, अन् त्याला सगळं सांगतेय असं पौरवीला वाटत होतं.

रात्री अंकुश आला. फ्रेश झाला तसा, पौरवीने आणि त्याच्या आईने त्याला झालेलं सगळं सांगितलं. पौरवी म्हणाली, मी तुला बारशाला दागिने आणायला लॉकरची चावी दिली होती. पण ती तू कुठे ठेवलीस ते तुला शोधूनही सापडली नाही असं म्हणालास. मी आईचे दागिने घातले माझ्या.
आता पाहते तर लॉकर सगळा रिकामा. गेले कुठे दागिने माझे?  

ते सगळं ऐकून अंकुश अगदी थंडपणे म्हणाला, मला गरज होती मी घेतले ते दागिने!!
कसली एवढी गरज पडली? मला न सांगता माझ्या दागिन्यांना हात कसा लावलास तू? मी आणि माझ्या आईवडिलांनी केले होते ते सगळे. लग्नात तुमची परिस्थिती नाही म्हणून तुम्ही फक्त एक मंगळसूत्र  घातलत. आम्ही म्हटलं, माणसं चांगली आहेत ना, मग दागिन्यांचं काय एवढं? तुझा हक्क नव्हता त्यावर काहीच!!

सासूबाईही तिच्या बाजूने बोलल्या, खरं आहे तिचं. तू हात लावलासच कसा तिच्या दागिन्यांना? स्रीधन होतं ते........ 

अंकुश म्हणाला, नवराबायकोत कसलं तुझं माझं? तिचं ते सगळं माझंच. माझेही होते ते.

तू काय मला तुझं दिलंस सांग ना मग? साधा पगारही दाखवत नाहीस, सांगतही नाहीस घरी. निम्मा तर तूच तुझ्यावर खर्च करून येतोस. मी भरघोस कमावते म्हणून माझ्यावर सगळं टाकतोस. तरी आता कसली एवढी गरज आडवी अली, ते माझे तीस-पस्तीस तोळ्याचे दागिने हडपलेस. पौरवीची बोलताना सुद्धा अंगाची लाही लाही होत होती.

बहिणीच्या लग्नाचं कर्ज होतं माझ्या डोक्यावर. 

अरे पण ऐपत नव्हती तर कशाला केला एवढा बडेजाव. आम्हाला सांगितलंत ना, तसं त्यांनाही सांगायचत ना? पौरवी कडाडलीच एकदम.

त्यांनी मोडलं असतं लग्न. मुलीकडच्याना तेवढं करावंच लागतं. मोठी पार्टी होती समोरची. थोडं तरी त्यांना शोभणार हवं ना? निर्लज्जसारखा अंकुश बोलून गेला.

त्याने आणखी डोक्यात तिडीक गेली पौरवीच्या अन् ती ओरडून म्हणाली, मग माझ्या जीवावर का? आताशी अठ्ठाविसचा तर आहेस. फेडलं असतंस की तोपर्यत.

जन्म काय त्यात घालवू माझा? आणि होते ना तुझे दागिने. कधी घालतेस एवढे? नवऱ्याच्या डोक्यावरचा भार कमी झाला त्याचं काही नाही तुला?

एवढा भार होता तर एकदा बोलायचं की रे......
विचार करून काहीतरी मार्ग काढला असता. घरात आपल्याच माणसांशी चोरटेपणा करायची दुर्बुद्धी कशी सुचली तुला? दुसऱ्याच्या कष्टाचं ओरबाडून कसं घ्यावं वाटलं तुला? बोलता बोलता पौरवीला पुन्हा रडायला आलं.

सुनबाई बोलतेय त्यातला शब्द न शब्द खरा आहे अंकुश. तू विश्वास तोडलास तिचा. आणि आमचीही लाज काढलीस. तुझ्या बहिणीला कळलं तर तीही छि:तू: करेल तुझी. हाती पायी धड होतंस ना? आम्ही सुनेचं लुबाडायचं म्हणून नाही दिमाखात लग्न लावलं पोरीचं. वाटलं पोराला चांगलं शिक्षण दिलंय, त्याला जड नाही होणार. आमचंच चुकलं, असं म्हणत सासूबाईंनी डोळ्याला पदर लावला.

पौरवी त्या रात्री टक्क जागीच राहिली. तीन वर्षात अंकुशने तिला कधी साधी साडी किंवा ड्रेसही आणला नव्हता. दागिन्याची तर बातच सोडा. प्रत्येकवेळी वेगवेगळे खर्च सांगत तिलाच घर चालवायला लावायचा तो. तिला उत्तम पगाराची नोकरी होती, लग्नाअगोदर साठवलेला पैसाही होता. प्रेमविवाह..... मुलीला पसंत तर आपण काय बोलणार, आणि माणसंही बरी वाटली म्हणून तिच्या घरच्यांनाही संमती देऊन टाकली होती. त्याच प्रेमाच्या धुंदीत ती खूप साऱ्या गोष्टी दुर्लक्षित करत होती. पण दागिन्यांवर मारलेला डल्ला तिला आरपार हलवून गेला. सासूबाई बरोबर होत्या तरी आपला माणूसच खोटा निघाल्यावर तिला त्याच्याबरोबर राहण्यात रसच उरला नाही. विश्वासाचा पायाच डळमळीत झाला सगळा. 
सकाळी सासूबाईंना मनातलं सांगितल्यावर त्याही म्हणाल्या, कुठल्या तोंडाने तुला थांब बोलू. घाव माझ्याही जिव्हारी लागलाय. पण मीही तुझ्या जागी असते तर हेच केलं असतं. मीच त्याला हाकलून देणार आहे घरातून. माझ्या नावावर आहे हे घर. 
तुला केस करायची असेल तर खुशाल कर. मी तर म्हणते करच. त्याशिवाय असली माणसं सुधारणार नाहीत. त्याच्या डोक्यावर बसून तुझं गेलेलं सगळं परत मिळव. जिरव चांगली त्याची. मी आहे तुझ्याबरोबर. पुन्हा स्रीधनावर डल्ला मारायचा विचारही करता कामा नये कोणी........

खुद्द सासूबाईंच एवढं बोलल्यावर पौरवीला धैर्य आलं. आपल्या मुलीला घेऊन ती वेगळी झाली. आईवडिलांकडे नाही गेली ती. तिने छोटंसं स्वतःचं घर घेतलं. नोकरी उत्तम होती तिची. अगोदरची सेव्हिंजही होती. तिच्या घरचे आणि सासूबाई पाठीशी होत्याच. मुलीला सांभाळायची दोघांनी तयारी दाखवली. सासूबाईंनी अंकुशशी सबंध तोडला होता. पण सुनेशी मात्र नातं मुलींसारखं ठेवलं होतं, म्हणजे ते या कालावधीत आपोआप जुडलं गेलं होतं. 

पौरवीने अंकुशला असं तसं सोडलं अजिबात नाही. त्याच्यावर दावा ठोकला. कोर्टकचेरीत काही वर्षे गेली, पण तिच्या बाजूने निकाल लागला. अंकुश सर्व बाजूने हरला. दागिन्यांच्या किंमतीहून जास्त रक्कम त्याला फेडावी लागली. त्यासाठी अनेक ठिकाणाहून आणखी कर्ज करावी लागली. आईकडेही गेला होता तोंड घेऊन, पण तिने त्याला शिव्या घालून बाहेरचा रस्ता दाखवला. 

इतकं सगळं झालं, तरी अंकुश एकदाही आला नाही पौरवीकडे माफी मागायला. त्याला आपल्याच बायकोचं घेतलं तर काय चुकलं हे काही केल्या समजतच नव्हतं..........

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel