बैरी पिया......!!

मला तुझ्यावर रागावताच येत नाही आणि तू आपली सतत माझ्यावर छोट्या छोट्या गोष्टीवरून फुरंगटून बसतेस हा अवनी.

छोट्या कसल्या चांगल्या मोठ्या गोष्टी असतात त्या, अनुज.

माझ्यासाठी छोट्या तुझ्यासाठी मोssठ्या. जाऊ दे ना पण आता, सोडून दे ना अवनी. कुठे जाणार तू तरी रागावून??

कुठे जात नाही म्हणूनच फावतं ना तुझं, कसही वागायचं आणि मग मस्का मारत बसायचं.

मुद्दाम कशाला ग वागेन मी? नेमका आपला काही प्लॅन असेल तेव्हाच ऑफिसमध्ये ऐन वेळेला काम निघतं त्याला मी काय करणार आता?

नेहमी बरं निघतं रे काम अनुज, आणि नेमकं मी काही ठरवलं असेन तेव्हाच?

मग तुझं काय म्हणणं आहे?, मला माझ्या बायकोबरोबर फिरायची हौस नाही, तिचा हसरा चेहरा मला बघायला आवडत नाही, असं काही आहे का?

तुलाच माहीत ते आता!!

हे बघ अवनी, तुला चांगलंच माहीत आहे. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. तुझ्याबरोबर आणि पोरांबरोबर फिरणं तुमच्याबरोबर वेळ घालवणं हा माझ्याही जीवनातला आनंद आहे.

हो म्हणून तर बेत फिस्कटवतोस ना आमचे?
मुलं किती हौसेने नाचत होती, फनफेअरला जायचं म्हणून.
मी म्हणाले, पप्पाला उशीर होतोय; आपणच जाऊया तर, आम्हाला पप्पा पण हवाय, सगळे असल्यावरच जास्त मज्जा येते, असं म्हणाली. मग मी तरी काय करणार?

आता रविवार येतोच आहे ना दोन दिवसांनी, जाऊ  नक्की!! प्रॉमिस ...

किती गर्दी असेल तेव्हा, म्हणून तर विकडेचा प्लॅन बनवला होता ना? तुझं काय नवीन आहे का असलं वागणं?

अगं खरंच अवनी, माझीही खूप इच्छा होती ग.

काही सांगू नकोस अनुज. मी ओळखते तुला चांगलंच!!

हो ? काय ओळखते सांग? म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का, मी तुमच्याबरोबर फिरण्याचा प्लॅन कॅन्सल करून कुणा दुसऱ्याबरोबर गेलो होतो. असं बोललं तर तुला शांती मिळेल ना? 

मी नाही म्हटलं असलं काही अनुज.......

तुम्हा बायकांचं हेच तर असतं, जरा नवऱ्याने आपल्या मनासारखं नाही केलं, की त्याचं प्रेमच नाही. त्याला पोराबाळात इंटरेस्टच नाही. त्याचं दुसरीकडे काहीतरी नक्कीच असेल, असंच वाटायला लागतं तुम्हाला.
पण जरा आमच्या बाजूने विचार करून पण बघा की ग.
आम्हाला पण मन आहे. कुठून काही तरी कोणाच्या खबरी कानावर येतात, आणि तुम्ही सगळ्याच पुरुषांना एकाच माळेत बांधता. 
दिवसभर ऑफिसमध्ये जाऊन बसतो ते कोणासाठी? 
जरा काही बिघडलं की बॉस धारेवर धरतो, इन्सल्ट करतो, ते सर्व सोडून देऊन कामात डोकं घालतो कोणासाठी?
बरेचदा वाटतं, अस्सा राजीनामा लिहावा आणि तोंडावर मारावा त्या बॉसच्या. पण तुझा, पोरांचा चेहरा येतो समोर.
फॉलो करावं लागतं त्याला, काय सांगेल ते, जेव्हा सांगेल तेव्हा पूर्ण करून द्यावंच लागतं.

मला नाही ऐकायचय काही अनुज........

पण मला बोलायचंच आहे. आजही असंच झालं, सगळं सेट होतं, मी अगदी टाईमावर निघणारच होतो, की बॉसने अर्जन्ट मिटिंग लावली.
बरेचदा ऑफिस सुटायची वेळ झाली की त्याला नवनवीन इम्प्लिमेंन्टेशन्स सुचतात, आणि मग अर्जन्ट मिटिंग लावल्या जातात.
सांग, आता कोण समजवणार यांना? बायको घरी वाट बघतेय असं तर सांगू शकत नाही ना, अवनी?

आम्ही नवरे असे फसतो आणि तुम्ही बायका इथे घरी बसून
नवरा कुठे तरी मजा मारत फिरत असेल अशी कल्पना करत स्वतःला त्रास करून घेत बसता आणि घरी आल्यावर आमच्या डोक्याला ताप देत राहता. हो की नाही, खरं सांग?

दुष्ट आहेस तू अनुज. गोड गोड बोलून नेहमी भुलवतोस मला. मला नाही बोलायचं तुझ्याशी.

असं म्हणता म्हणता किती वेळ बोललीस माझ्याशी? एवढं प्रेम आहे तर जरा विश्वास पण ठेवायला शिक की नवरा बोलतो त्यावर? नेहमी आपलं त्याला हाणूनच पाडायचं. 
तो तुमच्यासाठीच झटतोय हे का समजून घेत नाही? कधी काही मनासारखं नाही वागू शकला तर फैलावर घ्यायलाच पाहिजे का अगदी? जरा बोलायची पण संधी देत नाही ते. 

दूषणं देऊन, वाईट ठरवून  मोकळं व्हायचं आपलं......
बरोबर ना, अवनी?

होतं रे कधी कधी रागात. तू पण सोड की आता. कुठे एवढं मनावर घेतो. 

मी मनावर घेत नाही म्हणून तर फावतं ग तुझं!! बघावं तेव्हा फुरंगटून बसायला. माझ्यावर कसलेही आरोप प्रत्यारोप लावायला....

आता बास की , कळलं अनुज, पोचली तुझी कळकळ!!

किमान महिनाभर तरी या कळकळीचा असर राहावा एवढी अपेक्षा आहे. जमेल का तुला अवनी?

लबाड अवनी, काही उत्तर न देताच झोप आली सांगून झोपून सुद्धा गेली.

तुम्हाला काय वाटतं, आपल्या नवऱ्यावर कुठल्याही कारणाने न रागावता किमान महिनाभर तरी राहू शकेल का हो कुठलीही अवनी??


©️ स्नेहल अखिला अन्वित


फोटो साभार: गुगल

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel