कौटुंबिक
प्रेरणादायी
मराठी कथा
जीवनगाणे गातच रहावे......!!
बुधवार, २५ डिसेंबर, २०१९
काय रडत असते ग सारखी, बघावं तेव्हा पिरपिर चालूच असते तुझी, हे नाही झालं, ते नाही मिळालं, कधीतरी काहीतरी चांगलं पण सांग की??, शंतनू वैतागून म्हणाला.
आता होतच नाही काही चांगलं तर काय सांगणार!!
आणि तुझं काय रे, हे रोजचंच आहे ना आपलं, तू ऑफिसवरून आलास की चहा पिता पिता आपण दिवसभराचा आढावा घेत असतो ना? त्यात तूही किरकिरतच असतोस की नेहमी!! ऑफिसमध्ये तुझा कसा छळ मांडलाय, कोण सांगत असतं सारखं सारखं?
मलाच काय नाव ठेवतोयस उगाच??, त्याचा रोजच्यापेक्षा वेगळा अविर्भाव बघून शामल रागातच म्हणाली.
त्यावर शंतनू शांतपणे म्हणाला, बरोबर आहे तुझं. आपण नेहमी काय बिघडलं याचीच चर्चा करायचो सारखी. त्या चर्चेची इतकी सवय लागली, की त्यासाठी बिघडलेल्या गोष्टीच डोक्यात ठाण मांडून बसायला लागल्या. आणि नकळत चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ लागलं.
पण आज आमच्या कंपनीत एका प्रसिद्ध लाईफकोचचे सेशन झाले ग. त्याने जीवनाकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोनच बदलून टाकला.
कसं काय बरं?, श्यामलने कुतूहलाने विचारले.
श्यामल एवढी लक्ष देऊन ऐकतेय म्हटल्यावर शंतनू सुद्धा पुढे उत्साहाने सांगू लागला.
त्या लाईफकोचने सर्वांना पहिले एका कागदावर आमच्या जीवनातील सध्या घडणाऱ्या दहा वाईट गोष्टी लिहायला सांगितल्या. वेळ होता दहा मिनिटे......
आम्ही सगळ्यांनी अगदी पाच मिनिटाच्या आत त्या लिहून काढल्या. बऱ्याचजणांचे म्हणणे होते की दहा म्हणजे खूप कमी झाल्या हो......काहींनी दहा सांगितल्या तरी आठवतील तेवढ्या सगळ्या लिहिल्या.
त्यानंतर आम्हाला त्या लाईफकोचने कागदावर फक्त पाचच चांगल्या गोष्टी लिहायला सांगितल्या, वेळ तेवढाच दिला, दहा मिनिटे.....
आम्ही सुरू झालो. पण माझ्याबरोबर सर्वांनाच पाच चांगल्या गोष्टी पण धड आठवेनात. सारख्या वाईट गोष्टीच मध्ये मध्ये उडया मारून डिस्ट्रॅक्ट करत होत्या. मनाला सारखं चांगलं शोधायला ताळ्यावर आणावं लागत होतं.
दहा मिनिटं वेळ अपुरा पडायला लागला. आणखी पाच मिनिटं वाढवून मागितली आम्ही.
मग लिहिता आलं की नाही शेवटी??, शामल मधेच म्हणाली.
बघ ना, चांगलं काही आठवतच नव्हतं पटकन. मेंदूला खूप ताण देऊन पाच गोष्टी बाहेर काढाव्या लागल्या.
आमची गडबड पाहून ते लाईफकोच म्हणाले, बघा तुमच्या मनाला चांगला विचार करायची सवयच नाहीये. नेगेटिव्ह गोष्टी पटकन आठवल्या तुम्हाला, पॉझिटिव्ह गोष्टी आठवायला किती वेळ गेला?
कारण आपण सतत बिनसलेलंच उगाळत बसतो, आणि त्यामुळे जमलेलं सार नजरेआड होऊन जातं.
वाईट विचार करतो म्हणून सारखं वाईटच झाल्यासारखं वाटतं आपल्याला. तेच ठळकपणे लक्षातही राहतं.
आता तो चांगल्या गोष्टी लिहिलेला पेपर हातात घ्या. तो पुन्हा पुन्हा वाचा, तुम्हाला नक्कीच आणखी काही चांगले आठवेल. आणि मग तुम्हालाच वाटेल, श्याs एवढं सगळं चांगलं असताना आपण कुठे वाईटालाच कवटाळून बसलेलो.
आणि खरंच तसंच झालं अगं, वाचता वाचता कितीतरी चांगल्या घडलेल्या गोष्टी आम्हाला आठवल्या.
ज्याबद्दल खर तर आम्ही थँकफुल असायला पाहिजे होतं, त्याकडे चक्क दुर्लक्ष करत आम्ही आतापर्यंत सतत रडत बसलो होतो.
म्हणूनच आता मी ठरवलंय, चांगल्या गोष्टी आठवून आठवून बाहेर काढायच्या, त्यावर चर्चा करायची.
बघ ना, आता मी कामावरनं आल्या आल्या तू माझ्या हातात चहाचा गरम गरम कप ठेवतेस, तुझ्या हातचा चहा म्हणजे खरं तर स्वर्गसुख, आणि ते सुख घेताना आपण नकारघंटा वाजवत बसायचो.
हो रे, मलाही पटतंय आता......
लोकं कुठे कुठे जातात कामाला. यायला बरेचदा किती वेळ होतो, त्यांच्या बायकांना पण वाटत असेल ना, असा निवांत गप्पा मारत चहा प्यायला मिळावा नवऱ्याबरोबर, मला ते सुख मिळत होतं, आणि माझ्या ते गावीही नव्हतं.
आणि नेमक्या याचवेळी बाहेर खेळायला जाऊन ते सुख मिळून देणारी दोन सोन्यासारखी पोरं ही आहेत आपल्याला- शंतनू
डोक्यावर छोटंसं का असेना घर आहे स्वतःचं- श्यामल
अजूनपर्यंत निरोगी आहोत आपण- शंतनू
किती प्रेम आहे, आपलं एकमेकांवर- श्यामल
गावी असले तरी घरच्यांचा किती मानसिक आधार आहे आपल्याला- शंतनू
इकडे अडीअडचणीला एका हाकेसरशी धावणारं मित्रमंडळही आहे आपल्याजवळ- श्यामल
हाताशी पुरेसा पैसाही आहे, तो योग्य ठिकाणी वापरायची बुद्धीही आहे- शंतनू
बघ ना आता विचार केला तर किती चांगल्या गोष्टी बाहेर निघाल्या ना?, श्यामल अगदी आनंदाने म्हणाली.
मग आता ठरलं, दुःख उगाळत बसायचं नाही. उगाच सतत किरकिरत बसायचं नाही. वाईटातून चांगलंच शोधायचं.
वाईटाला सोडायचं अन् चांगल्यालाच घट्ट पकडून ठेवायचं.
ते गाणं आहे ना, ते गुणगुणत रहायचं🎶🎶
झाले गेले विसरूनी जावे पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच राहावे, जीवनगाणे........
दोघांनी एकमेकांना नजरेनेच ग्वाही दिली आणि गप्पांचं सेशन उरकून आपापल्या कामाला लागले.
शामल आणि शंतनूचं तर ऑल सेट झालं, तुमचं काय??
चला बरं, कमेंटमध्ये तुमच्या जीवनातल्या किमान तीन तरी गोष्टी; ज्यासाठी तुम्ही थँकफुल आहात, त्या लिहा पटापट!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार : गुगल
शेअर करायचं झाल्यास नावाला तेवढं लक्षात ठेवा😊
Previous article
Next article