नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं.......

कसला भारी आहे ग तुझा नवरा, रश्मी!
का ग काय झालं? 
काल फेसबुकवर बघितलं ना मी. तुझा वाढदिवस होता तर  आय लव्ह यू जानू असं लिहून किती गोड शुभेच्छा दिलेल्या त्याने तुला!!
लग्नाच्या दहा वर्षानंतर सुद्धा दुसऱ्याला हेवा वाटेल अशा शुभेच्छा मिळणं किती भारी ना??
आम्हाला नाही मिळत बाबा .....खूप लकी आहेस तू!!

रश्मीची मैत्रिण तिच्या नवऱ्याने फेसबुकवर दिलेल्या शुभेच्छा बघून हरखून गेली होती. म्हणूनच दुसऱ्या दिवशी तिनं रश्मीला फोन करून इतका छान जोडीदार मिळाल्याबद्दल तिचं अभिनंदनही केलं.

पण तोच वाढदिवसाचा दिवस आठवून रश्मीचे डोळे मात्र पुन्हा पुन्हा भरून येत होते.
नेहमीप्रमाणेच सकाळची घाई सुरू होती. रुपेश रश्मीमुळेच उशीर झाला म्हणून तिच्या नावाने ओरडत होता. ती कशी हळूबाई आहे, एकही गोष्ट धड करत नाही, ही रोजची वाक्य फेकणंही चालूच होतं. तिने सर्व गोष्टी त्याच्या हातात देऊन सुद्धा तिची काडीची मदत होत नाही म्हणून तुणंतुणं वाजवतच तो कामाला निघून गेला. 

तिचा वाढदिवस आहे, हे रुपेशच्या गावीही नव्हतं. तो स्वतःच्याच तंद्रीत होता. जसा नेहमीच असतो.
ऑफिसमध्ये गेल्यावर सवयीप्रमाणे जेव्हा त्याने फेसबुक उघडलं, आणि फेसबुकवाल्यांनी विश करा म्हणून सांगितलं, तेव्हा त्याच्या लक्षात येऊन त्याने आपलं प्रेम ओसंडून वाहतय जणू अशा थाटात तिला ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.

पण त्याचवेळी तिला एक फोन करून सॉरी बोलावं किंवा तिला खूष करण्यासाठी संध्याकाळचा काही प्लॅन करावा असं त्याला अजिबात वाटलं नाही.

त्या दिवशी घरी देखील रुपेश नेहमीपेक्षा उशीराच आला. आणि तिला म्हणाला, शुभेच्छा दिल्या बरं का मी तुला पाहिल्यास ना?
तिने पहिल्या होत्या, तेव्हा तिला त्याच्यात आणि व्हर्च्युअल कोरड्या शुभेच्छा देणाऱ्या बाकी साऱ्यांत काहीच फरक वाटला नाही.
उलट हा जो त्याने प्रेमाचा गाजावाजा केला होता त्याबद्दल त्याचा रागच आला होता.

त्यापेक्षा तिचे आईवडील, दोन मैत्रिणी ज्यांनी आवर्जून फोन करून तिच्याशी गप्पा मारल्या, त्याचं तिला जास्त कौतुक वाटलं, तेच तिला जवळचेही वाटले. 

लोकांसमोर आय लव्ह यू जानू म्हणणाऱ्या रुपेशने येताना गिफ्ट राहु द्या, एखादं फुलही आणलं नव्हतं तिच्यासाठी.
तेही जाऊ दे, जेवताना भाजीत थोडं मीठ जास्त वाटलं तर जानूवर व्हसकताना जानूचा वाढदिवस आहे, याचं भानही नव्हतं त्याला.

खरंतर रश्मीला त्या फोन करणाऱ्या मैत्रिणीला सांगावसं वाटत होतं, नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं ग कधी.
तू जो पाहिलास तो देखावा होता फक्त. खरं प्रेम करणाऱ्याला अशा देखाव्याची गरज नसते. त्याच्या प्रेमाला कळलं खूप झालं, जगाला कळायलाच पाहिजे अशी त्याची जराही अपेक्षा नसते.

रुपेश सारखी खूप माणसं आहेत या जगात. मधे माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेलं, तिची सासू एरवी तिच्या मुलीकडे ढुंकूनही बघत नाही. म्हणून त्या मुलीला मैत्रीण नोकरीला गेली की पाळणाघरात ठेवतात. पण हिच सासू जेव्हा त्यांच्याकडे पाहुणे येतात तेव्हा माझी राणी, माझी सोनू करत तिच्या मुलीमागे फिरत असते. 

एकदा ओळखीतले एक काका, त्यांच्या आजारी बायकोची कशी सेवा करतात, तिच्यावर त्यांचे किती प्रेम आहे, हे पैशाची भाषा वापरून सांगत होते. किती डॉक्टर झाले आणि किती पैसे गेले, याची त्यांच्याकडे अगदी व्यवस्थित नोंद होती. 

आईवडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाची जंगी पार्टी देणारा मुलगा प्रत्यक्षात मात्र घरी त्यांना धाकात ठेऊन होता, हे सांगून सुद्धा खरं वाटलं नसतं त्या पार्टीत त्याचं कौतुक करणाऱ्या लोकांना..........!!

नात्यांतील दुटप्पीपणाचा ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांनाच यातली खरी गोम ठाऊक असते, हो ना??


©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

शेअर करताना लेखिकेचे नाव बरोबर असू दयात. कॉपीराईट आहे, नावगाळून उचलणाऱ्यास त्रास होऊ शकतो.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel