कौटुंबिक
मराठी कथा
सरशी.........!!
गुरुवार, ११ मार्च, २०२१
लग्नमंडपात नेहमीची धामधूम चालली होती. वरमाई वैदेही अगदी थाटात मिरवत होती. एकुलत्या एका मुलाचं लग्न होतं. आनंदाला नुसतं उधाण आलं होतं. लग्न लागलं, मुलाच्या डोक्यावर अक्षता पडल्या. उरलेले विधी सुरू झाले. तशी एकेक जवळची मंडळी वैदेहीला भेटायला येऊ लागली. सगळ्यांची वैदेही हसून विचारपूस करत होती. जेवल्याशिवाय जायचं नाही, निग्रहाने सांगत होती.
पण समिधा समोर आली तशी मात्र वैदेही जागीच थबकली.
हि कशी काय? हिला तर आमंत्रणही देऊ की नको करत राहूनच गेलं होतं द्यायचं.
समिधाने वैदेहीच्या मनातलं बरोब्बर ओळखलं आणि म्हणाली, हो आले आमंत्रणाशिवाय. मला गरज काय आमंत्रणाची? श्रेयसला मी माझा मुलगाच मानलं लहानपणापासून. खेळवलय त्याला या हातांनी.
लग्नाचं कळलं तसं म्हटलं, जाऊ दे सोडून देऊ झालं गेलं, आपल्या पोराला आशीर्वाद द्यायला जाऊ.
ती असं म्हणताच वैदेही पुढे झाली,आणि तिने समिधाला मिठीच मारली एकदम.
ताई माफ कर मला. मी माझ्या अहंकाराला मारुच शकले नाही ग. जाऊदे झालं ते सोडून द्यावं असं माझ्या मनात का नाही आलं त्याचा पश्चात्ताप होतोय आता मला. इथेही तुझीच सरशी झाली.
रक्ताच्या नात्यापेक्षा अहंकार मोठा केला मी.......
लहानपणीसुद्धा भांडण झाले की तूच यायचीस पहिले माझी समजूत घालायला. आणि आताही तूच आलीस.
पण तुला खरं सांगू मला सारखी स्वप्नं पडायची, आपलं सगळं पूर्ववत झालय. मला आतून खूप वाटायचं ग तुझ्याशी बोलावं, पण बाहेर ते यायचंच नाही. अगदी हे लग्न ठरलं तरीसुद्धा तुझी आठवण आलेली, पण राहीलच.
राहीलं नाही वैदेही, तू राहू दिलस. तुला तेवढं आतून वाटलं नाही. पण मी मात्र मनाशी म्हटलं, आता नको थांबायला. आपल्या भाच्याचं लग्न आहे. त्याहून दुसरा चांगला मुहूर्त तो कुठला असणार समेट घडवायला. बोलावलं नाही ही सल टोचत होती, पण मनाला समजावलं. तिचं तिला. माझं मला. मला जावंसं वाटतय ना, मग झालं तर. मागची बारा वर्ष भांडणात, राग रुसव्यात घालवली. आता साठीपार झाल्यावर नको कुणावर रागलोभ धरायला. बोलता बोलता समिधाच्या मनात अनेक भाव दाटून आले होते.
वैदेही तिचा हात हातात घेऊन म्हणाली, ताई खरं सांगू. आपलं भांडण झालं त्याचा राग तर मला वाटतय चार दिवसात पळूनही गेला होता, नेहमीच जायचा तसा. पण अहंकार नाही पळाला ग त्याच्यापाठी. तो चिकटून राहिला तसाच. मग त्यातुन सुरू झालं, तिचं चुकलं तिने यावं. मी का कमीपणा घेऊ? माझं काय अडलय तिच्यावाचून? तब्बल बारा वर्ष मला धरून ठेवलं बघ कसं ते.
आणि आता याक्षणी विचार केला तर वाटतय तशी भांडणात चूक तुझी नव्हतीच. मीच मनात लहानपणापासून तुझ्यावर खार खाऊन बसलेले. तुझं दिसणं, वागणं- बोलणं कसं दुसऱ्यावर छाप पाडणार होतं!! तुझ्यात स्वभावापासून सगळं चांगलं होत. पण त्यातलं मला काही घेता मात्र आलं नाही. म्हणजे घेता आलं असतं, पण मी ते कमीपणाच मानलं.
तू होतीस म्हणूनच निभावून नेलस मला. तुझ्या सात्विक स्वभावाचा मीच फायदा घेतला प्रत्येकवेळी.
बारा वर्षांपूर्वी नवऱ्याच्या भांडणाचा राग डोक्यात घेऊन घर सोडून आलेल्या मला, तू जराही उत्तेजन न देता, घरचा रस्ता दाखवलास. माझी हक्काची बहीण मला रडायला खांदा देत म्हणजे काय? तिथेच डोक्यात गेलीस तू माझ्या, आणि मी तुझं नाव टाकलं.
मग दोन तीन तास बाहेर काढून स्वतःच्या घरी परतले तशीच. दुसरा काही पर्यायही नव्हता मला. आईवडील गेल्यावर माझं माहेर तुझं घरच होतं.
हो, नाही घेतलं मी तुला घरात कारण सवय झाली होती तुला, जरा मनाविरुद्ध घडलं की आकांडतांडाव करत बहिणीचं घर गाठायचं आणि नवऱ्याच्या नावाने बोटं मोडत बसायची. फक्त स्वतःच्या बाजूचा विचार करायचा. मी पण कंटाळले होते तुझ्या सारख्या सारख्या रडकथा ऐकून. म्हटलं जितकं जास्त हिला ऐकून घेऊ तितकं जास्त ही हेकेखोरपणे वागणार. म्हणून एक दिवस निश्चयाने माझ्या घराचा दरवाजा तुझ्यासाठी बंद केला. समिधाच्या आवाजात ते आठवून आताही कणखरपणा आला.
अन् तो बंद केलास म्हणूनच आज मी माझ्या कुटुंबाबरोबर हा दिवस पाहतेय. त्यावेळी राग आला होता तुझा फार. अहंकाराच्या धुंदीत जाणवलही नाही काही. तुला दोषी ठरवून मोकळी झाले.
पण आज मात्र तुझे खूप आभार मानावेसे वाटतायत ताई. तुझं ऑप्शन बंद झालं, म्हणूनच माझ्याकडे संसार टिकवून ठेवण्याचा एकमेव ऑप्शन उरला. तोपर्यंत राग नाकावर घेऊन फिरणारी मी, माझ्या माणसांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करू लागले.
हळूहळू कळलं मला तू दार का बंद केलं, पण मी तुझ्याएवढी मोठी कधी होऊच शकले नाही ग. कमीपणा घेऊन तुझ्याकडे येऊच शकले नाही कधी.
नेहमी तुझीच सरशी झाली सगळीकडे, अगदी आजही. भरलेल्या डोळयातून ओघळलेलं पाणी पुसून वैदेही समिधाच्या हाताला धरून नवीन जोडप्याकडे घेऊन गेली.
समिधाने दोघांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. तशी वैदेहीसुद्धा वाकली आणि म्हणाली, ताई माझ्यातला फुकाचा अहंकार जळून राख होवो, हा आशीर्वाद दे ग मला!! त्यानेच दूर ठेवलं मला तुझ्यापासून.
समिधाने तिला उठवून आपल्या जवळ घेतलं आणि म्हणाली, तो मी आल्यावर मला मिठी मारलीस तेव्हाच पळून गेला होता ग.
सासूबाईचं पद भूषवताना मात्र सांभाळून राहा त्याच्यापासून म्हणजे झालं!!
नाही रे बाबा. आता 'कानाला खडा' असं म्हणत वैदेहीने आपली जीभ चावली.
काहीही म्हणा, त्याने नवीन सुनेला थोडं हायसं वाटलंच........
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article