भोचक भवानी..........!!

शुभश्री गावातल्या नव्या घरात राहायला येऊन आता पंधरा दिवस झाले होते. सरकारी नोकरीत असलेल्या नवऱ्याची बदली पहिल्यांदाच तालुक्याच्या गावात झाली होती. गावात राहायला मिळणार म्हणून तिला खरं तर खूप आनंद झाला होता. कारण तिला गावच नव्हतं. पहिल्यापासून मोठ्या शहरात वाढली होती ती. गावाचं आकर्षण मनात फार होतं. 
लग्न झालं ते गाव होतं खरं पण नावाला. टिपिकल गावासारखं काही नव्हतं तिथे. शहरासारखच वाढलं होतं जिथून तिथून आणि शहरमय झालं होतं सगळं!!
नवऱ्याची बदली छोट्या गावात झाली म्हटल्यावर शुभश्री मनापासुन खूष होती.
छानसं बैठ घर भाड्याने मिळालं होतं त्यांना. पुढं मागं अंगण, अंगणात छोटी मोठी झाडं, असं भारी होतं सगळं!!
पंधरा दिवसात घर बऱ्यापैकी लावून झालं होतं. 
शेजारी पाजाऱ्यांची तेवढी तोंड दिसलेली, ओळख लांब होती अजून.
घोरपड्यांच्या सुनेचा, कुंदीचा मात्र जीव चाललेला तिच्याशी ओळख करून घ्यायला. 
शुभश्री आल्याच्या दिवसापासून रोज दुपारी ती तिच्या दारापर्यंत जाऊन यायची. अन् आवडल का हिला काय म्हैत, झोपली बिपली असल तर पंचाईत, म्हणून माघारी फिरायची. 
सासू वैतागली होती तिची, तिलाही उत्सुकता होती सगळ्याची. एक दिवस शेवटी ती म्हणालीच तिला, "आता तू जाती का मी जाऊ? घाबरायचं काय काम त्येच्यात येवडं!! ओळखच कराय जातीस ना? का गोळ्या घालायच्यात व्हय जावून तिला?"

सासूच्या बोलण्याने कुंदीला जोर चढला, अन् तिनं ठरवलं, आज जाऊन काय ती डिट्टल काढून यायचीच सगळी!!

इकडं सगळं आवरून शुभश्री मोबाईल घेऊन लोळायच्या बेतातच होती, तेवढ्यात कुंदीनं तिच्या दाराची कडी बडवली.

यावेळी कोण आलं बाई नव्या ठिकाणी, स्वतःशीच बडबडत शुभश्रीने उठून दार उघडलं.

कुंदीनं पदराखाली लपवलेली वाटी तिच्यापुढे धरली आणि म्हणाली, "लिबाचं लोन्चं दिलतं सासूनं माज्या तुमच्यासाठी. चार पेरू पन हायेत  दारातल्या झाडाचं. चवीला झक्कास बगा!! एकदम अमृतावानी.... सारकं मागाल अन् काय.
नवीन आला ना तुमी, मी इतच तुमच्या डाव्या अंगाला राहती बरं का!! कुंदा नाव हाय तसं पन कुंदी केलय समद्यांनी.
हसती की मी रोज तुमच्याकडं बघून, तुमी बाई सादं हसाय पन ईचार करता फार........"
यु का आत, असं नुसतं तोंडदेखलं विचारलं तिने, शिरलीच ती अगदी सहज. खुर्चीवर पण जाऊन बसली. शुभश्रीच्या लक्षात सारा मामला येईपर्यंत क्षण गेला, पण नंतर गालातच हसून कुंदीला तिनं पाणी आणून दिलं. 

"पानी कशाला मी बाजूस्नं तर आली की. पन  सरबत करणार असाल तर कोकमचं करा बरं का!! दारात लिंबाच झाड हाय ना, आमची सासू सारकं तेच करती बाई रोज रोज. कट्टाळा आला बगा त्या लिंबाचा."

शुभश्रीने तिच्यासाठी कोकम सरबत करून आणलं, तिच्या हातात ग्लास देऊन समोर बसली आपली शांत तिच्या. तिला काही विषय सुचत नव्हता. अन् कुंदीकडं तर बारा गावच्या चौकश्या होत्या.

सरबताचे चार घोट रिचवून ती म्हणाली, "मालक काय करतात वो वैनी?"

"नाही बाई माहीत नाही मला"

"नवलच की!! तुमचे मालक काय करतात तुमाला ठाऊक न्हाई? न सांगण्यासारकं करत नाईत ना वो वैनी काई.........??"
शेवटचं वाक्य बोलताना कुंदीनं मुद्दाम बारीक आवाज काढला.

"मालक म्हणाला ना तुम्ही, मला घरमालक वाटले," शुभश्रीने स्वतःला क्लिअर केलं.

"अवं मालक म्हंजी, तुमचे मिष्टर, मिष्टर वो वैनी," कुंदीने बोलता बोलता ग्लासातलं सरबत उगाच फुर्s आवाज करून ओठात ओढलं.

"अच्छा, ते होय सरकारी बँकेत आहेत." नवऱ्याला 'मालक' म्हणायची शुभश्रीला गंमतच वाटली.

"किती पगार हाय वो, कमीतल्या कमी पंदरा हज्जार तरी पायजेच बगा," त्याबिग्गर काय जमतच न्हाई.

शुभश्रीला आता इरिटेट व्हायला लागलं होतं, पगार बिगार काय विचारतं का असं कोणी कोणाला? मॅनर्स नाहीच काही. ती काही बोललीच नाही.

ते बघून कुंदी म्हणाली, "सांगन्यासारखा नसल तर ऱ्हाहू द्या. आमच्या ह्यांना पन कमी हाये तसा. पंधराला चांगले चार हजार कमी पडतात बगा. पन शेतीवाडी हाय, घर बी सोताच हाय, भागतं आपलं. भाजीपाला बी घरचाच हाय ना आनी."

शुभश्रीला आता फार म्हणजे फारच राग येत होता कुंदीचा. सांगण्यासारखा नसल तरी राहू द्या म्हणजे काय? विषय मिटला होता तरी पुन्हा उखरून ती म्हणाली, "पस्तीस हजार पगार आहे आमच्या ह्यांना."

"अय्यो, मग चैनच की तुमची. उस्ने मागाय हरकत नाही काई कदी. नडीला वो वैनी. नड काय सांगून येती वय कदी?
पोरं बाळ कुनी दिसना घरात. सासू संबाळती का आई? खेडेगावात आनून करायचं काय म्हना पोरांना उगाच. न्हाई का?" प्रश्नांच्या फैरीवर फैरी झाडत होती कुंदी नुसती.

"किती बाई हिला चांभारचौकश्या त्या? मुलाखतच घ्यायला आली जणू ही? एवढं सगळं काय करायचंय जाणून घेऊन?" शुभश्रीच्या मनात कुंदीचा उद्धार सुरू झाला होता. 

"बरं तुमाला सोडून राहतात पोरं." कुंदीला बाई पोरबाळंवाली आहे की नाही ते कळणं खूप गरजेचं होतं. तिला माहिती होतं, घरी गेलं की सासू पहिले तेच विचारणार.

शुभश्री म्हटली, "दोघेच आहोत अजून."

"किती वर्स झाली म्हनायची लग्नाला?"

शुभश्रीला वाटलं, आता पहिले हिला हाताला धरून बाहेर काढावं. शहरात बरं बाई. कोणी एवढा अगोचरपणा नाही करत तिथं. ती चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दाखवत म्हणाली, "प्लॅनिंग आहे आमचं. पाच वर्षांचं. लग्नाला चारच वर्ष झालीत अजून."

"बरं बाई सासूला चाल़तं तुमच्या. माज्या सासूनं कंबरड्यात लाथच घातली असती. गायवानी दिसती सासू तुमची." बोलता बोलता उगीच चेहऱ्यावर करुणभाव आणला कुंदीनं.
पण लगेच सावरून पुढचा प्रश्न टाकला, 
"भाडं किती वो दिलं या जागंला. वर्षभर कोन बी नवतं बरं का. मागच्या बिराडातल्या बाईनं फास लावून घेतला होता म्हनं!! मी नवती त्या टायमाला नेमकी. आईकडं गेलती. सासूनं सागितलं बाई सगळं. काय आवाज बिवाज येतो का हो पैंजनाचा?"

शुभश्री बसल्या जागी ताडकन् उठली, आणि म्हणाली, "पाच वाजले. सामान आणायला जायचं होतं उशीर झाला आता. निघायला हवं मला. तयारी व्हायचीये अजून."

"होय काय. मी यु का तुमच्यासंगती? मला सगळी ओळखत्यात हितं. कोन पैश्यामदी कापनार न्हाई तुमाला. तेवडं माज्या सासूला सांगा. ती कजाग हाय बाई. काई कूटं सोडत न्हाई."

"नको. हे भेटणारेत," असं म्हणून शुभश्रीने कपाटातून साडी काढली.

"भाsरी साडी दिसती वैनी. मुंबैस्नं आणली काय वो? सगळं गाव माना मोडून बगतय बगा आज तुमच्याकडं."  

ही बया कधी एकदा घरी जातीये असं झालेलं शुभश्रीला. कुंदीची काही चिंन्हच दिसत नव्हती पण हलायची.

शेवटी शुभश्रीचं सगळं आवरून झालं, तेव्हा तिने चपला घातल्या, तशी कुंदीनही खुर्ची सोडली. तिच्याबरोबरच बाहेर पडली.
शुभश्रीला धाकधूक लागलेली नुसती, आता ही येते की काय आपल्याबरोबर. कुंदी घर आलं तसं वळली तेव्हा कुठे जिवात जीव आला तिच्या.
ती काय काय बोलतच घरात शिरली. पण 
ते सगळं शुभश्रीच्या तेव्हा कानावरून उडून गेलं. तिनं तोंड बंद करावं अन् स्वतःच्या घरात घुसावं एवढंच तिला वाटत होतं.
कुंदी बडबडत होती, हिने पाऊलं भराभर उचलली आणि तिथून सटकली.
नवरा भेटला तसा ती पटकन् म्हणाली, "बदली बघा बाबा मिळतेय का शहरात ती. फारच आगाव आहेत इथली माणसं."

"अगं गाव गाव करून नाचत होतीस पंधरा दिवसातच हौस फिटली होय तुझी?", नवरा तर हसायलाच लागला तिच्यावर.

"नंतर सांगते सगळं," म्हणत तिने तेवढ्यापुरता विषय मिटवून टाकला.

मात्र फिरून घरी आल्यावर घडलेलं सगळं इत्थंबूत नवऱ्याला सांगितलं. तसा तो म्हणाला, "तेवढा फरक असणारच की ग. शहराची हवा वेगळी, गावची वेगळी. अन् माणसंही वेगळी वेगळी. पण सगळं शुद्ध असतं बघ. आतबाहेर नसतं काही गावाकडं. मनात आलेलं घपकन् बोलून मोकळी होतात इथली माणसं!!
सवय झाल्यावर काही वाटणार नाही.
रुळशील हळू हळू. लगेच एका दमात मत नको बनवू कोणाबद्दल."

शुभश्रीला नवऱ्याशी बोलून हलकं वाटलं. पण कुंदी काही केलं तरी तिच्या मनातून जातच नव्हती. फार काही शिकलेली असावी असं वाटलं नाही तिच्या बोलण्यावरून शुभश्रीला. 
एखाद्या भोचक-भवानीसारखं तिचं बोलणं शुभश्रीला जरी अजिबात आवडलं नव्हतं. तरी नवऱ्याने आता एवढ्यात कुणाबद्दल मत बनवू नको म्हटल्यावर, शांत मनात कुंदी वेगळ्या नजरेने फिरू लागली. तिच्या घरात शिरताना जे काही ती बडबडत होती ते सगळं आता कुठे कानात वाजलं शुभश्रीच्या.
"काई म्हणजे काई लागलं तरी आवाज द्याचा वैनी. आपलं घर समजून कदीबी घुसायचं. काय खावं  वाटलं कदी तर बिंदास्त सांगायचं. माजी सासू सुगरण हाय. प्रेमानं करून घालती बोल्लेलं. लय आवडतं तिला कुणालाबी खायला- प्यायला घालाय!!
एकटं समजायचं नाsई. माहेरची मानसं मानलं तरी चालल बरं का वैनी आमाला........!!"
शुभश्रीच्या डोळ्यात एकदम पाणी तरारलं, कारण शहरात असं काही म्हणायला कुणी फारसं डोकावलंच नव्हतं. 
त्यातून लहानपणापासून अनाथ शुभश्रीला माहेर असं नव्हतंच. शहरात कुणीतरी आश्रमाच्या पायऱ्यांवर सोडलेलं, मन शरीर सगळं तिकडचं वाढलेलं!!
इथं कुंदीनं स्वतःहून माहेरची साद घातली होती. कितीही नाही म्हटलं तरी पोरक्या शुभश्रीच्या मनात कुंदीच्या मायेचा इवलासा अंकुर फुटलाच शेवटी...........

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel