आपटीबार.........!!


त्यावेळी मी बारावीत होते. मस्त नवीन ड्रेस घातला होता. खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट मिळाल्या होत्या. त्यामुळे कॉलेजमधून जणू उडत उडतच घरी पोचले होते. बिल्डिंगच्या जवळ आले, तसा एक चिकनी सुरतवाला नुकताच आमच्या बिल्डिंगच्या गेटमधून बाहेर पडताना मला दिसला. माझ्या मनात "तुझे देखा तो ये जाना सनम"ची ट्यून वाजली. 
हा हा म्हणता आम्ही समोर आलो, आणि मला काही कळायच्या आत मी बद्कsन त्याच्या समोर आपटले. तो वर आणि मी लोटांगण घालण्याच्या अवस्थेत त्याच्या पायाशी!! 
त्याला काय रिऍक्शन द्यावी सुचेना. मी त्याच्या जागी असते तर नक्कीच दात काढून हसले असते, कोणी समोर पडलं की कन्ट्रोल होतच नाही बाबा आपल्याला!!
ओके ना? असं विचारून तो गेला,आणि तो गेल्यावर मला माझ्याच पचक्याकडे बघून जोरजोरात हसायला आलं. 
माझ्या नवीन ड्रेसने मला दगा दिला होता. मी घातलेला डिवायडर अगदी पायघोळ होता,आणि त्याच्यात चालता चालता दुसरा पाय अडकून नको तिथं घोळ झाला होता. चिकन्याचोपड्या पोरासमोर इज्जतीचा फज्जा उडाला होता. नवीन ड्रेसही उदघाटनाच्या दिवशीच फाटून गेला, ते वेगळंच!!

असे अनेक फज्जे आजवर उडालेत अजूनही उडतात.

आता माझ्याबरोबर स्पर्धेला माझी दोन मुलं आहेत. ती बाहेर पडून येतात, मी घरातल्या घरात पडत असते. कधी स्टुलावरून, कधी बेडवरून, कधी असच वर तोंड करून एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता जाता.........

तशी मी हलकी फुलकी आहे, तरी आमच्या घरातल्या एका प्लास्टिकच्या खुर्चीला मी एके दिवशी विनाकारण भारी जड वाटले, स्वतःचं अंग ताडताड मोडून तिने मला धपाsकन् खाली आपटवलं. नवऱ्याने संधीचा फायदा घेऊन स्वतःबद्दल चार शब्द चांगले बोलायला लावले, मगच मला त्या साच्यातून बाहेर काढलं. पुढचे अनेक दिवस आठवून आठवून खिदळत होतो आम्ही सर्व.........

माझ्या मुलाला तर मी आपटीबारच नाव ठेवलंय लहानपणापासून!! उठता बसता चालता फिरता समोर टपटपा पडायचा तो चालायला लागल्यापासून.......
अजूनही बाहेर खेळायला गेला की रोजच गुडघे फोडून येतोच येतो. सवय झाली त्यालाही सारखी पडण्याची. पडला तर नाही, पण एखाद दिवशी 'पडला नाही' तर मात्र नवल वाटतं आम्हाला!!

दोन आठवड्यापूर्वी माझ्या मुलीची मैत्रीण खेळता खेळता टपsकन् पडली. तिथे हजर असलेलं त्यांचं सगळं मित्रमैत्रिणींचं मंडळ पोट धरून हसायला लागलं. आणि त्या सर्वांना हसताना बघून तिला मात्र जोरजोरात रडायला आलं. तिच्या गुडघ्याला आणि हाताच्या कोपऱ्याला थोडंस खरचटलं होतं.  
माझी मुलगी तिला घरी सोडायला गेली, घरी तिची आजी होती. आपली नात अशी पडलेली पाहून आजीचा जीव कळवळला. तिने पडलेल्या जागी मलम लावला, तिची अगदी मीठ मोहरी घेऊन दृष्ट काढली, आणि आता अजिबात हलायचं नाही, पडून रहायचं एकदम म्हणून तिला बजावलं.
ते सगळं कौतुक पाहून माझ्या मुलीला तिचा हेवा वाटला. घरी येऊन मला ती म्हणाली, मी एवढ्या वेळा पडते, कित्येकदा मी माझे गुडघे फोडून रक्ताळून घेतलेत, अंगाचा एक न एक भाग सोलवटून काढलाय, तू माझी एकदाही दृष्ट काढली नाहीस की पडून रहा आराम कर म्हटली नाहीस. त्या माझ्या मैत्रिणीचं किती कौतुक झालं आज घरात माहितीये?
मी म्हटलं, तुझी मैत्रीण रोज पडते का? 
त्यावर माझी मुलगी म्हणाली, नाही ती खेळायला येतच नाही कधी. आज आली अन् पडली. 
मग? 
तुम्ही रोज आपटून येता, रोज कोण मीठ मोहऱ्या ओवाळत बसणार तुमच्यापुढे? 
आमच्यावेळी तर माहीत पण नसायचं आम्ही पडलोय की झडलोय ते, आणि सांगितलं तरी म्हणायचे, पडशील तर वाढशील!!  फार काही असेल तर गोडतेलाचं बोट फिरवायचे. झालं काम!!

अगदी आठ दिवसापूर्वीच मी घरात घसरून पडले, फरशी ओली होती, ते लक्षात न येता मला भलतंच काहीतरी लक्षात आलं आणि मी स्वैपाकघरात जायचं म्हणून तडातडा चालायला लागले, आणि फसsकन् आपटले. समोर आमच्या कामवाल्या बाई होत्या, त्यांना एकदम धस्स् झालं. माझी पोर दात विचकून हसत होती, त्यांना त्या ओरडल्या, आणि म्हणाल्या हसायचं नाही असं!!
मुलांनी माझ्याकडे बोट दाखवून म्हटलं, आमची मम्मीच हसतीये तर आम्ही कसे गप्प बसणार?
त्यांनी माझ्याकडेही गंभीरतेनं पाहिलं आणि म्हणाल्या, संभाळ ग बाई असं पडणं चांगलं नाही. 
मला एकदम कधी नव्हे ते टेंशन आलं, अगदी दक्षतेने पुढचे चार दिवस स्वतःला खूप सांभाळलं. 
आणि पाचव्या दिवशी मात्र काही कारण नसताना अगदी बेडच्या कॉर्नरवर बसता बसता आमचं धुड खाली धडाम् sकन आपटलं.
एखाद्याच्या पडणं पाचवीला पुजलेलंच असतं  ते असं........

काजोल माझी आवडती हिरोईन आहे, ती पण अशी धपाधपा पडत असते म्हणे जिथे तिथे, तिच्या बिचारीचे तर व्हिडिओही व्हायरल झालेत पडण्याचे!! 
काय ना हल्ली काहीही बघून माणसांना बरं वाटतं, आणि दुसऱ्याला पडताना बघून तर फारच नाही का? 
मलाही आवडेल बरं का, तुमच्या पडण्याची गंमत- जंमत वाचायला, सांगण्यासारखी असेल तर नक्की सांगाच😆
आता म्हणू नका आम्ही कधी पडतच नाही, मी पैजेवर सांगते, कुणी पडत नाही असं कधी घडतच नाही, अगदी साठ वर्षाची बाई पण माझ्यासमोर बुदुsकन् पडलीये, आणि जणू काही झालंच नाही अशा अविर्भावात चालू पडलीये.......

कोणी यातून सुटत नाही, काय म्हणता?😜

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel