मराठी कथा
विनोदी
हे काय सुधारायचे नाहीत.........!!
बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०
हे जे आणलयस ना ते जाऊन त्या दुकानदाराच्या टाळक्यावर मारून ये पाहिले, मितालीने त्रासिक सुरातच हेमंतवर ऑर्डर सोडली.
अगं आता काय फोडल्यावर घेणार आहे का तो?, हेमंत असं बोलायचा अवकाश की मितालीची तणतण सुरू झालीच.......
मी फोडायच्या अगोदरच तुला म्हटलं होतं, मला हा ब्रँड नको, परत कर. तर तुला कंटाळा आला ना जायचा?
काय म्हटलास, तो दुकानदार म्हणाला, तुम्ही घेता त्यापेक्षा हा ब्रँड जास्त चांगला आहे. वापरून बघा.
हो तेच म्हणाला तो.....
तो म्हणाला, आणि तू लगेच ऐकलस. बायकोपेक्षा जास्त दुकादांरावर विश्वास ना तुझा?, मिताली डोळे वटारून म्हणाली, तसा हेमंत नाराजीने म्हणाला, काही पण बोलते हा तू.........
मग काय? मी तुला बजावून सांगितलेलं, दुसरा कुठलाही ब्रँड नको. नसेल एखाद्या दुकानात तर चार दुकान फिर, तेवढं चालत केलं तर, आपल्या बायकोसाठी. पण नाही. तू भुलला त्या दुकानदाराला. किती वेळा समजावलं तुला, त्यांच्याकडे आपल्याला हवी ती वस्तू नसल्यावर, जे आहे ते गळ्यात मारण्यासाठी ते तारीफ करणारच!! गिऱ्हाईक कोण असं तसं सोडणार का?
मी म्हणते, तुला ठाम रहायला काय होतं?, मितालीचं एवढं फाडफाड सुटलेलं तोंड बघून थोडं बाचकूनच हळू आवाजात हेमंत म्हणाला, मला आपलं वाटलं, एवढा तोंड भरून स्तुती करतोय तर नक्कीच छान असणार. तू नेहमीच माझ्या गोष्टींना नावं ठेवतेस.
मुद्दाम नावं ठेवेन का मी? पण तू तरी बायकोने सांगितलेलं असतं तिकडं दुर्लक्ष करून दुकानदारांच्या मोहजालात का फसतोस? किती वेळा ईशारा देते की नाही मी तुला? तरी तेच करतो आणि तोंडघाशी पडल्यावर एवढसं तोंड करून बसतो. मितालीचा पारा चढतच होता, ती थांबत नाही बघून हेमंत म्हणाला, पुढच्या वेळेला तूच जा आणि आण बाई सगळं. कुठले हवे ते ब्रँड घेऊन ये, मी काही तक्रार करणार नाही तुझ्यासारखी.
तक्रार करायला डोकं घातलं पाहिजे ना त्यात? आम्ही बायका डोकंही घालतो आणि मनही, म्हणून सगळं ठराविकच लागतं आम्हाला, मिताली कसली गप्प बसतेय, तिने बायकांचे गुण उधळलेच हेमंतवर........
काय अगदी, एखादी चूक झाली तर लगेच धारेवर धरता ग तुम्ही? शोधतच असता की काय चान्स?, हेमंत मधे मधे थोडाफार बोलून समाधान मिळवत होता.
पण मितालीच्या तोंडाची गाडी स्टॉप घ्यायचं नाव काही काढतच नव्हती, हेमंतला ती पुन्हा धडकायला आलीच. एखादी चूक एकदाच करावी ना, फारतर दोनदा. सारखी सारखी तीच चूक करत एखाद्या दुकानदाराचं मन राखण्यासाठी, बायकोच्या विरोधात जाण्याचा आत्मविश्वास येतो कुठून तुमच्यात?
पण मी म्हणतो, तुला नवीन गोष्टी ट्राय करायला होत काय?, हेमंत अजूनही आपली बाजू सारवली जाण्याचा केविलवाणा प्रयत्न करतच होता.
किती करायच्या? आपल्याकडे तुला जे सांगेन ते तू आणतच नाहीस, नेहमी भलतंच काहीतरी आणतोस. तुझ्या नवनवीन गोष्टी ट्राय करून करूनच मी काही ब्रँड कायमसाठी पक्के केलेत.
आता बघ ना, तुला कुठलं तूप आणायला सांगितलं, तू आणलं कुठलं? काडीची चव नाही याला. तूप नावालाच, आहे तेलासारखंच. कोण खाणार हे?
त्या दिवशी तुला नेहमीची चहा पावडर आणायला सांगितली, तर तू आणली दुकानदाराने छान छान म्हणून शिफारस केलेली. काय झालं, तुझ्याच्यानेही ढोसवला गेला नाही तो चहा!!
होतं असं कधी कधी.......
तुझ्याकडून सारखं होतं. मला तर वाटतं मुद्दाम करत असावास तू. दुकानदारांच्या जागी तुला आणखी कोण दिसतं की काय? मोहिनी अस्त्राचा वापर करतात की काय तुमच्यासारख्या पुरूषांवर? बायकोने अगदी काटेकोरपणे अमुकच आण, असं सांगितलेलं सोडून, ते जे काय देतील ते घेऊन येता खुशाल माना डोलवत?, मितालीचा अविर्भाव बघून हेमंत तिला विनवणीच्या सुरात म्हणाला, ते तूप मीच खाईन, तो चहा जसा देशील तसा आनंदाने ढोसीन, आणखी काही माझे फ्लॉप आयटम असतील ते घे आणि मार माझ्या टकुरऱ्यावर. पण आता तुझं ते तोंड तेवढं बंद कर. मला माहिती आहे तुम्हा बायकांच्या अंगी दैवी शक्ती असते, कित्येक तास तोंड चालवत रहायची, पण माझे कान ठणकायला लागले आता. बस कर बये बस कर.......
तेवढं बोललं की झालं, मितालीने हेमंतकडे बघून होता होईल तेवढं तोंड वाकडं केलं.
साधारण आणखी तासभर तरी हेमंतच्या नावाने शंख करणं चालू ठेवलं होतच तिनं........
एवढं बोलूनही तो काही सुधारणार नाही याची गॅरेंंटी तिलाही होती आणि हेमंतलाही!!
तो तेच करत राहणार आणि तीही अशीच ठो ठो करत राहणार, अन् अशा खूप साऱ्या लुटुपुटुच्या भांडणामुळे त्यांचा संसार असाच दिवसेंदिवस अधिकाधिक रंगतदार होत जाणार........
हो क्की नाही ???
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article