मराठी कथा
सामाजिक
परतफेड प्रेमाची......!!
मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०
बकुळ, तुला आठवतंय ना, आपल्या टिंकुच्या बाळंतपणाच्या वेळी आईची किती मदत झाली ना आपल्याला?
हो खरंच रे गौतम, सासूबाई आल्या नसत्या तर काय झालं असतं माझं? आपण इतके लांब दूर परदेशात, माझी आई नेमकी त्याचवेळी पोटाच्या आजाराने बेजार झालेली. सासूबाई खरंतर डिलिव्हरी नंतर येणार होत्या, पण माझ्या आईच्या आजारामुळे त्यांना अगोदर आणि नंतर दोन्ही गरजा भागवाव्या लागल्या. मला आईच हवी होती, वाटायचं सासू काय आईसारखं थोडंच करेल? पण मी चुकीची होते रे, सासूबाईंनी मला आईची कमी जाणवू दिलीच नाही. सगळं अगदी लेकीसारखं केलं.
हो, माझ्या आईला मुलींची खूप हौस होती बकुळ. तिला मुलगीच हवी होती. मी झाल्यावर रडली होती ती माहिती आहे, मुलगी हवी होती म्हणून!! आजीने सांगितलं हे मला. अगदी चार वर्षापर्यंत मला फ्रॉक घालायची ती बऱ्याचदा आणि दोन बो सुद्धा बांधायची. माझे फोटो आहेत तसे, मी दाखवेन तुला तिकडे गेलो की.
तरीच......मला प्रश्न पडायचा, नक्की या माझ्या कोण? आई की सासू?
टिंकुला तर मालिश करायच्या रे पण मलाही करायच्या. मी नको म्हणत असताना सुद्धा!! मला अगदी कसतरीच वाटत होतं, अशी अपेक्षाच नव्हती केली ना कधी सासूकडून. आणि मैत्रिणींकडून ऐकलेलं ही चांगलं नव्हतं. पण खूपच केलं रे त्यांनी माझं.
हो ना. मग आता तुझी वेळ आहे. माझी आई कंबरदुखीने बेजार झालीये. ऑपरेशनही करावं लागणार आहे बहुतेक. आपल्याला जायला हवं. त्यांना आपली गरज आहे.
अरे पण, असं कसं लगेच उठून जाणार आपण?
आपल्या नोकऱ्या आहेत, टिंकु कसा ऍडजस्ट होणार?
आई आली होती ना माझी धावत, आपली गरज काढायला??
हो पण त्या रिकाम्या होत्या गौतम. आपण काय रिकामे आहोत? शिवाय परदेशातून असं लगोलग जाता येतं का कुठं?
आई रिकामी नव्हती बकुळ. ती सुद्धा मुलांचे क्लास घेत होती. तिचंही एक रुटीन होतं. शिवाय बाबा होतेच, कधी राहिली नाही ती बाबांना सोडून, पण त्यांना यायचं नव्हतं म्हणून त्यांना काकांकडे ठेऊन आली. आपल्यासाठी किती ऍडजस्ट करावं लागलं त्यांना.
तिने जराही विचार न करता तुझ्या आईची जागा भरली, आणि आपण विचार करत बसायचं?
आपली कामं अशी त्यांच्यासारखी फट्कन बाजूला सारणारी नाहीत गौतम. तिघांचं एवढं सगळं मॅनेज करून तिकडे जायचं म्हणजे.......
प्रश्न कामाचा नाहीच मुळी, इच्छेचा आहे. आता असा विचार कर, तुझ्या आईला तुझी गरज आहे. माझी आई तोच विचार करून सर्व सोडून आली. मुलीसाठी गेले असते ना धावत, मग सुनेचा का नाही. हेच मनात ठेवलं तिने.
तू ही कल्पना कर ना, तुझ्या आईला असा त्रास होत असता, तिचं ऑपरेशन ठरलं असतं आणि तिने तुला बोलावलं असतं तर तू काय केलं असंतस?
आपल्याविना काही अडणार नाही त्यांचं, बाकीचे नातेवाईक आहेत. निभावून नेतील सर्व. पण आपण स्वतःहून गेलो, तर त्या आनंदात तिचं दुःख हलकं होईल. तू मुलीप्रमाणे तिच्याकडे बघितलस, तिला मानसिक आधार दिलास तर वेळेपेक्षा लवकर बरी होईल ती!!
तू ये नाहीतर नको येऊ मी तर जाणार आहे माझ्या आईसाठी बकुळ.......
मला माफ कर, गौतम. माझी दृष्टी संकुचित होती. आपल्या वेळेला आईवडील विचार न करता आपण असू तिथे आपली गरज भागवायला येतात, आणि माझ्यासारखे मात्र परतफेड करायची वेळ आली की विचार करत बसतात. खरं आहे तुझं, प्रश्न इच्छेचाच असतो नेहमी. मनापासून इच्छा असेल तर सर्व काही मॅनेज होऊ शकतं. आणि ती नसेल तर न जमणाऱ्या कारणांचा डोंगर समोर दिसू लागतो.
तू तयारी सुरू कर पुढची, आपण सर्व नक्की जाऊ.
त्यांनी एवढं केलं माझं, ही माझ्यासाठी संधी आहे, त्याची किंचितशी तरी परतफेड करायची.
ती घालवली तर पुन्हा कुठलीही सासू, आपल्या सुनेची आई बनायचा विचार करणार नाही........
मला ह्या नात्यावरचा डाग पुसून काढायचाय. माझ्या सासूबाईंनी माझी आई बनून स्वतःला सिद्ध केलं, आता मला त्यांची मुलगी बनून त्यांच्या ओंजळीत मुलीच्या निर्व्याज प्रेमाचं दान टाकायचय........
माझं तिथे असणं गरजेचं आहे त्यांच्याबरोबर, माझ्यासाठीही. त्यांच्या प्रेमाची परतफेड होता होईल तेवढी करायला मिळाली, तर त्याहून मोठं काही नसायला हवं माझ्यासाठी........!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article