पालकत्व
बालक पालक
मराठी कथा
मुलांना धोपटायला हवंच का हो......??
सोमवार, २६ मार्च, २०१८
त्या दिवशी नववीतला सार्थक शाळेतून घरी आला तो एकदम अपसेट मुड घेऊनच. आईशी, छोट्या बहिणीशी काहीच न बोलता, कपडे बदलून झोपायलाच गेला. नेहमीसारखा बहिणीशी खेळायचाही मूड नव्हता त्याचा.
आईने विचारलेही, शाळेत काही झालंय का? कोणी ओरडलं का, त्यावर त्याने काहीच नाही म्हणूनच सांगितलं.
आईला वाटलं, जाऊ दे नंतर सांगेल.
पण तो दिवस तसाच गेला, त्याने सांगितलं नाहीच.
दुसऱ्या दिवशीही तो नेहमीप्रमाणे सकाळी शाळेला जायला उठवल्यावर उठलाच नाही. आज नाही जाणार, बरं वाटत नाही असं त्याने सांगितलं.
त्याच्या आईनेही मग जास्त मागे न लागता सोडून दिलं.
पण त्याचं शाळेतच नक्की काहीतरी बिनसलय हे तिच्या लक्षात आलं. दिवसभर तो सांगेल म्हणून तिने वाट पाहिली, पण त्याने स्वतःहून काहीच सांगितलं नाही.
मात्र संध्याकाळी जेव्हा तो बाहेर मित्रांबरोबर खेळायला गेला, नेमका तेव्हाच त्याच्या वर्गातल्या मित्राचा त्याच्यासाठी फोन आला. आणि आईला काय झालय ते समजलं.
मित्राने त्याची शाळेत न येण्याबद्दल चौकशी केली. मग आईनेही त्याच्याकडून काढण्यासाठी सांगितलं, खूप अपसेट आहे तो. बोलतही नाही आमच्याशी. काही झालयं का शाळेत?
त्यावर तो मित्र म्हणाला, तो काही बोलला नाही का तुम्हाला?
त्याला काल शाळेत खूप मार मिळाला होता. होमवर्क न केल्याबद्दल. तसा आम्हा सर्वांनाच बरेचदा थोडाफार मार मिळत असतो, पण आम्ही फारसं मनाला लावून घेत नाही.
पण काल टिचरने त्याला खूपच जास्त मारलं. पहिल्यांदा तो वर्गात रडला. आम्हालाही खूप वाईट वाटलं.
ते ऐकून सार्थकच्या आईचं हृदय कळवळलं. ती मनात म्हणाली, एवढ्या मोठ्या मुलाला मारायचं कशाला?
आम्हाला नाव सांगायचं ना!! आम्हालाही हात लावावा वाटत नाही मुलाला, त्याच्या मनाचा विचार करून आणि शाळेत असं का केलं बरं!!
मोठेपणी मुलांना इतरांसमोर मार खाण्याची लाज वाटते, त्यांचं वयही त्यातून अवखळ!! काय मनाला लावून घेतील काय सांगता येतं का??
शिक्षा जरूर द्यायची, पण मारायला नको होतं ना, मोठं पोर रडेल इतपत तरी!!
सार्थक खेळून आला तसा तिने त्याला जवळ बोलावलं. तुझ्या मित्राचा फोन आला होता, आणि मला सगळं कळलंय हे देखील सांगितलं. खूप प्रेमाने त्याला समजावलं, आपण चुकलं की त्याची शिक्षा मिळणारच ना? आपलं चांगलं व्हावं याच इच्छेने समोरचा आपल्याला ओरडतो. तू जास्त मनाला लावून घेऊ नको, आणि पुन्हा अशी चूक करूही नको.
हे ऐकून सार्थकच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आई हवं तेवढं ओरडावं, पण भर वर्गात कसंही मारलं की खूप इन्सलटिंग फिल होतं ग. कोणालाच आवडत नाही असं, मग तो मारणारा मनातूनही उतरतो.
आणि मग काहीच ऐकवासं वाटत नाही त्या व्यक्तीचं.
इतर शिक्षक पण शिक्षा करतात, कोणी पूर्ण पिरियड भर उभं राहायला सांगतं, कोणी कान पकडून उभं करतं, कोणी पायाचे अंगठे पकडायला सांगतं, कोणी टिचरच्या टेबलच्या इथे खाली बसायला सांगत, ते सगळं चालतं आम्हाला.
पण हे सर्वांसमोर फाडफाड मारलेलं नाही आवडत ग, खूप लागत मनाला.
आईने त्याला त्यावेळी जास्त काही न बोलता प्रेमाने जवळ घेतलं.
दुसऱ्या दिवशी मात्र शाळेत जाऊन त्याच्या आईने शिक्षकांना विनंती केली की आमच्याच काय कुठल्याही मुलाला मारू नका हो. त्यांचं वय अडनिडं आहे, डोक्यात बराच गुंता ऑलरेडी सुरू असतो. शिक्षा करू नका सांगत नाहीये, ती नक्की करा, चूक कळलीच पाहिजे मुलांना. पण ती दाखवण्याची वाट जरा बदला. तसच काही झाल्यास घरी कळवा, आम्ही येऊ भेटायला.
शिक्षकांनीही पुन्हा तसे होणार नाही याची हमी दिली, पण पालकांचेही मुलांकडे लक्ष असू द्या, हेही आवर्जून सांगितलं.
ही झाली सार्थकची गोष्ट. पण बाकीच्या घरीदारी मार खाणाऱ्या मुलांचं काय??
तुम्ही म्हणाल एवढं काय ते कौतुक मुलांचं. लहानपणी आम्ही कुत्र्यासारखा मार खाल्लेला आहे. हो बरोबर. पण आपण आता लहानपणीच्या सगळ्याच गोष्टी फॉलो करतो का? जुन्याबरोबर नवीन विचारधाराही स्वीकारतोय ना?
केला मुलांच्या मनाचा विचार तर बिघडलं कुठं??
हा किस्सा तर शाळेतला होता. पण बरीच घरही आहेत मुलांना बदडणारी.
अगदी मागच्या महिन्यातच माझ्या मुलीची मैत्रीण सकाळच्या शाळेला घरच्यांचा प्रसाद खाऊन आली होती.
तो प्रसाद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. वर्गात येऊन तिला मैत्रिणींनी काय झालं विचारताच, तिने काही चुकलं की आईबाबा कसेही मारतात असं रडत रडतच सांगितलं.
याहून कळस म्हणजे, एक चार वर्षाचं मुलं हट्ट करत रस्त्यात फदकन् बसलं म्हणून त्याच्या आईने त्याला जोरात पाठीत धपाटा घातलेला, मी स्वतः पाहिला होता. एका क्षणासाठी त्यावेळी मलाच धस्स झालेलं. मी त्यांना म्हटलं पण, लहान आहे हो तो. मारायचं नव्हतं तुम्ही. त्यावर ती बाई म्हणली, त्याशिवाय कळत नाही याला.
मला वाटत त्याशिवाय वेगळी भाषा बोलायला, आपलेच पेशन्स कमी पडत असावेत. म्हणून हात उठतो.
कधी वाटतं मुलं बिचारी उलट हात उगारू शकत नाहीत, एक मान राखतात; म्हणून आपलं फावतं. तेच मोठ्या माणसांनी ऐकलं नाही तर आपण ठेऊन देतो का??
बरं दिली आपण ठेऊन तर तो समोरचा मोठा माणूस त्याच्या बदल्यात दोन देईल आपल्याला, तो ऐकून तर घेणार नाहीच, वरून त्याला जे करायचं तेच करेल, आपल्याला मुद्दाम चिथवण्यासाठी.
खरंच धोपटून, फोडून काढून मुलं सुधारतात का हो??
त्यांच्यात बदल करण्याआधी आपल्यात बदल करायला हवा असं मला वाटतं, तो बदल झाला, आपणच थोडे पेशन्स वाढवले आणि त्यांना समजून घेतलं, तर मुलांना मारण्याची वेळ येणारच नाही, काय वाटतं तुम्हाला??
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Previous article
Next article