पालकत्व
मराठी कथा
एक घर घुसमटवणारं .......!!!
मंगळवार, ३० एप्रिल, २०१९
लहान मूल म्हणजे देवाचं फुल!!!
त्यांच्या निरागसपणात देव वसलेला असतो म्हणतात. त्यांच्या नानाविविध बाललीला बघणं, अनुभवणं, त्यात सहभागी होणं म्हणजे जणू आपल्या सर्वांच्या लाडक्या कन्हैयाचं प्रतिरूप अनुभवणं. उगाच का मग दहीहंडी दिवशी बाळ मुलगा असो व मुलगी त्याला नटखट कान्हा बनवलं जातं!!!
घर जिवंत भासतं ते मुलांमुळेच, घरी चैतन्य यांच्यामुळेच.
पण याच अजाण बालकांच्या बाललीलांचा त्रास कोणाला होत असेल तर??? यांच्यातला देव धुडकावून दगडाच्या देवाला आळवणं कुणाला महत्वाचं वाटत असेल तर???
उदाहरण माझ्या डोळ्यासमोरचं होत म्हणूनच पटलं, नाहीतर विश्वासच बसला नसता माझा.
तन्मय साधारण साडे तीन वर्षाचा. माझ्या रोजच्या पाहण्यातला. म्हणाल तर एकदम स्मार्ट, चुळबुळा, दंगेखोर आणि प्रचंड उत्साही. जवळपास सगळी लहान मूलं असतात तसाच अगदी. बरेचदा भेटतो मला त्याच्या आईबरोबर. त्याची आई माझी मैत्रीणच म्हणता येणार नाही पण चांगली ओळखीची. आम्ही बोलताना तन्मयची त्याच्या वयाला साजेशी मस्ती सुरू असते.
जरा काही जास्त झालं त्याच्याकडून की त्याची आई म्हणते, तो ना डोक्याने कमी आहे जरा, होsss खरं आहे.
पाच पाच मिनिटानंतर तेच पुन्हा, हा डोक्याने कमी आहे जरा, कळतच नाही त्याला सांगितलेलं काही.
मी आपली म्हणतेय, ही बाई हे काय बोलतेय सारखं सारखं ?
एवढा स्मार्ट मुलगा, कशाला त्याच्या कानावर सारखे असले शब्द पाडतीये.
शेवटी न राहवून मी एकदा विचारलंच तिला, अगं सारख का असं म्हणतेस? किती छान आहे तो. सगळी मुलं कमी अधिक प्रमाणात दंगा करतातच की!!!
लहान आहे तो त्याला काय कळतंय??
त्यावर तिचं उत्तर मला अनपेक्षित आणि थक्क करणारं होतं......
अगं काय सांगू तुला. हैराण केलयं याने नुसतं.
अगं काय सांगू तुला. हैराण केलयं याने नुसतं.
याच्यामुळे आमच्या घरात नुसती भांडण होतात.
मी म्हटलं, याच्यामुळे??? कसं काय??
त्यावर ती म्हणाली, हा असा दंगेखोर, एका जागी बसत नाही, एक वस्तू धड ठेवत नाही.....
मी म्हटलं, अगं माझी मुलं पण तेच करतात. लहान मूलं असतातच अशी.
हो गं.....खरं आहे. हे तुला कळतंय, मला कळतंय. पण आमच्या घरातल्यांना नाहीना कळत.
ह्याने असा दंग केलेला त्याच्या आजी-आजोबांना नाही चालत. त्यांना याच्या आवाजाचा त्रास होतो.
कटकट वाटते त्यांना खूप.
आम्हाला दोघांना बेडरूम मधेच बसावं लागतं दिवसभर. माझी कोंडी होते ग अगदी.
कितीवेळ मी त्याला थोपवणार सांग, तो तरी किती माझं ऐकणार.
देवाची यथासांग तासभर पूजा करत बसतात, त्यात याचा आवाज सुद्धा नको, लुडबुड तर नाहीच चालत, लगेच तणतण होते त्यांची.
मी म्हटलं, आजारी वगैरे असतात का??
त्यावर ती म्हणाली, काही नाही ग, त्यांचं पहिल्यापासूनच तसंच. तो लहान असताना रडायचा तेव्हाही त्यांना त्रास व्हायचा, म्हणायचे घेऊन जा याला कुठेतरी.
आता जरा मोठा झाला तर खेळण्याचा त्रास होतो त्यांना.
सांग आता ह्या पोराला मी कसं थांबवणार, तो त्याच्या वयाची मुलं वागतात ते सारं करायला बघतो आणि आम्ही सतत त्याला डाफरत राहतो.
खूप चिडचिड होते माझी. घुसमट होते माझी आणि त्याचीही. कोणी समजूनच घेत नाही.
याचे बाबाही सकाळी लवकर जातात ते रात्री नऊला येतात. आणि ते काही लक्षही घालत नाहीत.
बिल्डिंगमध्येही त्याच्या वयाचं कोणी नसल्याने त्याला तिथेही कोणी खेळायला नाही. शाळा असताना शाळेत जातो तेवढा वेळ बाहेर आणि मी संध्याकाळी कुठे नेईन तेवढाच विरंगुळा.
बाकी दिवसभर आम्ही घरात, कोणाला त्रास नको म्हणून आमच्या रूममध्ये. बैठे खेळ तरी किती खेळणार तो???
खूपदा मलाच फ्रस्ट्रेशन येतं आणि त्यालाच नको ते बोलते ग.
सुन्न झाले मी ऐकून. अशीही असतात घरं!!!
ऊर्जाच थोपवली जात होती छोट्या तन्मयची त्या घरात. कोणाला कौतुक नव्हतं, होत होता तो त्रास......आता कळत नाही म्हणून ठिक .....पण नंतर काय विचार करेल त्याचं मन......काय आठवेल तो त्याचं बालपण. भविष्यात कसा होईल तो अशा घरात लहानाचा मोठा झाल्यावर..... आता बागडतोय पण हळूहळू मिटायला लागेल, कोषात जायला लागेल, अशा घरामुळे.
खरंतर बालपणीच्या आठवणींचा केवढा मोठा ठेवा जपत असतो, आपण आपल्यात.
मला माझे आजी-आजोबा आठवले. त्यांच्याकडेच वाढले मी. माझ्याबरोबर दोन मामाची मुलं. आम्हा तीन जणांना माझे आजी-आजोबा सांभाळत होते. मामा मामी नोकरीला. वेळप्रसंगी रागावलेलं मारलेलही आठवतंय; पण भरभरून केलेली माया, लावलेला जीव जास्त आठवतो. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत आम्हाला सहभागी करायचे ते. सगळं शिकलो आम्ही त्यांच्याचकडून. जिथे कुठे जातील तिथे आम्ही बरोबर असायचोच. तेच आमचे पालक होते. त्यांचा आमच्यावर आणि आमचा त्यांच्यावर भरपूर जीव. आमच्या आई वडिलांपेक्षा!!
म्हणूनच अजूनही एकही दिवस जात नाही त्यांच्या आठवणीशिवाय.
तसेच माझे सासरे माझ्या मुलांचा जीव. कितीही वेळ खेळू शकतात त्यांच्याशी न दमता. मुलं तर सर्वात आनंदी त्यांच्याबरोबर असतात.
आणि एक तन्मयचं घर......
तशी बरीचशी अशी घरं ऐकिवात होती, पण हे पहाण्यातलं.
किती त्या पालकत्वाच्या नाना तऱ्हा....... लिहू, वाचू, ऐकू तेवढं कमीच!!!
माझी पोरं घरात त्यांना हवा तसा धिंगाणा घालत असतात तेव्हा मला तन्मयची हमखास आठवण होते, मोठ्यांच्या जाचात कोमेजून जाणारं त्याच बालपण डोळ्यासमोर येतं आणि मन अगदी अस्वस्थ होत राहतं.
देव त्याच्या घरातल्यांना लवकरात लवकर सुबुद्धी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सहनशीलता देवो!!!
थोडंस डोकावून बघा बरं जरा तुमच्याही घरात, असं नाही ना तुमचं घर, नसावचं मुळ्ळी!!!
©स्नेहल अखिला अन्वित
Previous article
Next article
