आता तू म्हणशील तस्सच.......!!


त्याने शोकेसचा ड्रॉवर जरा जोरात बंद केला, तर वरती मांडून ठेवलेल्या शोपीसमधून छोटासा टेडी धपकन् त्याच्या डोक्यात पडला. एका सेकंदासाठी त्याला इरिटेट झालं, पण पडलेल्या त्याला उचलताना मात्र त्याच्या मनात प्रेम दाटून आलं. त्याने त्या छोटुश्या टेडीच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याला हृदयाशी कवटाळलं. 
तो टेडी त्यांच्या प्रेमाच्या पहिल्या वाढदिवसाला तिने त्याला दिलेला. कित्ती किती जपायचा तो त्याला. घरी गुपचुप आपल्या कप्यात लपवून ठेवलेला त्याने. कप्पा उघडला की रोज त्या इवल्याश्या टेडीला जवळ घेऊन एक पप्पी द्यायचा. त्याच्यासाठी तो टेडी म्हणजेच ती असायची.एकदा असंच काही करताना नेमके त्याचे बाबा मागून आले,  शेवटच्या वर्षालाच होता तो. अभ्यास सोडून नसते उद्योग, म्हणून रागाने त्यांनी तो टेडी बाल्कनीतून खाली भिरकावून दिला.पुढे मोठ्ठं मैदान होतं, क्षणाचाही विचार न करता तो सुसाट धावत गेला, आणि त्या मोठ्ठ्या मैदानातून तो टेडी शोधून  घेऊन आलाच.
आता त्या टेडीला स्पर्श करताच पटकन सगळं त्याच्या नजरेसमोर आलं........
आणि त्यामागोमाग सर्रकन् एक विचार डोक्यातून गेला.  त्यावेळी तो टेडी आणायला आपण किती वेड्यासारखे धावलो. पण काल तर तो टेडी देणारी, ती आपल्या डोळ्यासमोर निघून गेली. तिला नाही थांबवलं आपण??
वस्तूत जीव अडकतो तितका माणसात अडकत नाही की काय??
छे, असं कसं अडकलाय ना आपलाही जीव तिच्यात, म्हणून तर तिचा विचार सतावतोय इतका.
पण मग काल तिला तर असंच सोडून दिलं आपण.......वाट बघत होती ती, आपण काही बोलावं, डोळ्यात स्पष्ट दिसत होतं तिच्या.
आपण नुसतं उभं राहिलो सुंभासारखं!!
काय मागत होती ती?? तिचं स्वातंत्र्य, तिची मुभा. 
घुसमटत होती, आपल्या घरातल्या शिस्तीच्या वातावरणात. नव्हतं ऍडजस्ट होता येत तिला. तरी काढली की दहा वर्ष.
जन्मभर कशी राहील कोणत्या बंधनात?
एकेकाळी आपल्याला तर दोन वर्ष देखील काढता आली नाहीत, स्वतःच्या घराशिवाय दुसरीकडे. मार शिकायचं म्हणून गेलो, दोन वर्ष आत्याकडे, कसलं जड जात होतं आपल्याला घर सोडून राहणं. तरी बरं सर्व हातात मिळत होतं, पण स्वतःच्या घरासारखं मोकळं काय ते वाटत नव्हतंच. एकप्रकारचं दडपणच असायचंच. एका वर्षातच घरचा रस्ता धरला आपण.
आणि तिच्याकडून मात्र वर्षोनुवर्षे ऍडजेस्ट करायची अपेक्षा ठेवतोय. किती चुकीचं आहे ना??
हे सगळं आता सुचतंय आपल्याला, ती होती तेव्हा तिच्या बाजूने विचार करायची फुरसत काढलीच नाही आपण कधी.
एवढा विश्वास ठेवून आली माझ्याबरोबर, प्रेम प्रेम करून भुलवलं तिला, आता तर विश्वासच उडाला असेल नाही तिचा प्रेमावरचा?
आई बाबा आहेतच महत्वाचे, पण तीही महत्वाची होतीच ना?
फ्रिडम कोणाला नको असतो. आणि जिथे जाच असेल तिथे तर तो पहिल्यांदा हवासा वाटतो. दिसत होत सगळं, जाणवून मात्र घेतलं नाही.
आपल्याला कुठे काय टोचत होतं. दुसऱ्याला टोचलं की थोडच टुभतं.
ती गेली वाट बघून बघून आपल्याला सोडून, काही केलंच नाही आपण.
काय उपयोग आता या डोळ्यातल्या पाण्याचा, तिला कुठे दाखवता आलं काल काही??
छे, पण आता एक दिवसही काढता येईना झालाय तिच्यावाचून. जीव जणू काढून नेलाय कोणी.
ए टेडया, तू प्रेमाचा साक्षीदार ना आमच्या. दे ना मला बळ, जाऊन बोलतोच आईबाबांशी. सांगतो त्यांना तुम्ही तर  आहात प्रिय, पण तीही तितकीच आहे हो. तिला तिचं नवीन घरटं सजवायचय, मलाही आवडेल तिला साथ दयायला. दोघं मिळून छोटसं घरटं सजवू ,या आपल्या मोठ्या घरट्याचाच एक भाग असेल ते. दोन्ही घरट्यांकडे पुरेपूर लक्ष देईन मी. तुम्हाला नाही एकटं पाडणार. प्रत्येक सुखदुःखात बरोबरच असू आपण.
राहायला दूर गेलो तरी मनातून दूर नाही जाऊ देणार तुमच्या, नक्की काळजी घेईन मी.
पण आता मला तिच्याकडे जायचंय; खूप वर्ष मन मारलंय हो तिने, आता ती म्हणेल तसं होऊ द्यायचय. 
तिच्या स्वतःच्या हक्काच्या घरात जस्सं ती म्हणेल तस्सच होऊ द्यायचय..........!!
चल रे टेड्या आता बोलूच आपण ..........
【 कधी रे करणार तू काहीतरी माझ्यासाठी?? या कथेचा हा उलट भाग त्याच्या नजरेतून】
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार : गुगल
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel