मराठी कथा
सामाजिक
यांची कुरकुर थांबणार तरी कधी ???
शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९
कुठलीही नवीन सिरीयल आली आणि प्रोमो इंटरेस्टिंग वाटला तर पहिले दोन चार भाग मी अगदी उत्साहाने बघते. तशी मला सिरीयल बघायची अजिबात आवड नाही, नव्याची नवलाई जेमतेम आठवड्याभरात संपते आणि मी तिला कायमसाठी बाय बाय करते.
तर अशीच एक नवीन सिरीयल, झी मराठीची अग्गबाई सासूबाई...... तुम्हाला माहीत असेलच!!!
बघू बरं काय मसाला आहे, म्हणून बघायला घेतली.
आता मसाला म्हणाल तर बघा; पिचलेली, अतिसोशिक सून आहे , तिला पिचवणारे सासरे आहेत, आणखी भर घालायला मुलगा आहे.
आता मसाला म्हणाल तर बघा; पिचलेली, अतिसोशिक सून आहे , तिला पिचवणारे सासरे आहेत, आणखी भर घालायला मुलगा आहे.
आणि तिला या सगळ्यातून लिलया बाहेर काढण्यासाठी नियोजलेली चतुर चाणाक्ष सुनबाई आहे.
मात्र यातल्या खाष्ट सासरेबुवांनी माझं लक्ष एकदम वेधून घेतलं. स्वभावाने एकदम हेकट. स्त्री ही कामासाठीच असते, बाकी तिला काही डोकं वगैरे प्रकार नाही, अशी पक्की समजूत असणारे आहेत हे.
सुनेला दणादण ऑर्डर सोडण्यात पटाईत!!!
सगळं काही त्यांना आपल्या हातात लागतं. अगदी जवळ असलेली गोष्ट सुद्धा कुणीतरी उचलून आपल्या हातात द्यावी ही इच्छा.
इतकंच काय तर बाहेर निघताना देखील अतिसोशिक सुनबाई त्यांच्या चपला तर आणून देतेच, पण त्यांच्या पायात घालूनही देते!!
अस्सा राग आला मला हे बघून, म्हटलं किती हे अतिरंजीत!! छे, असं कुटं असतं व्हय???
पण त्यानंतर काही क्षणातच माझ्या डोळ्यासमोर अगदी अशाच काही वय झालेल्या व्यक्ती आल्या, ज्या सुनांना नाही तर आपल्याएवढ्या असणाऱ्या बायकोलाच अगदी अस्सच नाचवत होत्या.
ज्यांना आपण म्हातारे आहोत, आपल्याला व्याधी चिकटल्यात, याची क्षणोक्षणी जाणीव असते, पण आपली बायको अजून पंचविशीत असल्यासारखीच वाटते. किंबहुना आपलं सर्व करायला ती तेव्हडीच राहावी असे वाटत असते.
अगदी परवाचीच गोष्ट ; मी थालपीठं केली आणि म्हटलं शेजारी राहणाऱ्या काका काकूंना पण नेऊन दयावीत, म्हणून मग ती दयायला त्यांच्या घरी गेले.
तर साधारण सत्तरीचे असलेले काका मला ऐकवतायत, मी हिला कित्ती सांगतो, जरा थालपीठं किंवा परोठे वगैरे करत जा. हिला कसली आवडच नाही. नवनवीन काही सुचतच नाही. काही करण्याचा उत्साहच नाही.
काकू पण साधारण त्यांच्याच वयाच्या. पण दिसायला जास्त थकलेल्या. एकुलता एक मुलगा परदेशी. इथे हे दोघेच.
काकांचा अगोदरच असलेला चिडचिडेपणा वयोमानामुळे जास्तच फोफावत चाललेला.
काकांचा अगोदरच असलेला चिडचिडेपणा वयोमानामुळे जास्तच फोफावत चाललेला.
कोणी घरी आलं की उगाच काकूंबद्दल एक एक विषय काढून कुरकुरून दाखवणार.
त्यांना वाटतं, काकूंनी अजूनही त्यांच्यापुढे पूर्वीसारखच नाचावं. त्यांचे सर्व चोचले पुरवावेत.
माझ्यापुढे स्वैंपाकाच्या नावाने कुरकुरायला लागल्यावर मी त्यांना म्हटलं; काका, अहो परवाच काकूंच्या कंबरेचा एक्स रे काढला ना हो?? कंबरदुखीचा किती त्रास आहे त्यांना. काही दुखत खुपत असलं तर माणसाला नाही इच्छा होत काही करायची. तरी त्या एवढं करतात तेच खूप आहे.
काकांना कळत होतं पण वळायला तयार नव्हतं.
त्यातून काकू अगदी साध्या स्वभावाच्या. काका म्हणतील ते सगळं ऐकायचं एवढंच माहीत.
वर तोंड करून बोलणं स्वभावातच नाही. आतासुद्धा शरीर नीट साथ देत नाही तरी काकांचा प्रत्येक शब्द झेलणारच.
पूर्वी काका कामाला जायचे तेव्हा सुद्धा असेच एका ठिकाणी खांबासारखे उभे राहून, माझा रुमाल दे, मोजे दे, डबा दे, पाकीट दे करत बसायचे. आणि जरा कुठे दिरंगाई झाली की काकूंवर धुसफूसणं सुरू.
बरं काकू सुद्धा कामाला जाणाऱ्याच होत्या हा. काकांच्या हाता-तोंडात गोष्टी देऊन, घरचं आवरून त्यांनाही वेळ गाठायला लागायचीच. हे सगळं अगदी काका रिटायर होईपर्यंत असच सुरू होतं. त्यात काही फरक पडला नाही.
आणि अजूनही काकांची काकूंच्या मागची कुरकुर थांबली नाहीच, अजूनही टॉवेल दे, पाणी दे, जेवण वाढ, ही भाजी कर, ती भाजी कर, चिकन ग्रेव्ही कर, मटन कर, फिश फ्राय कर सुरू असतचं. बाहेरून आणणं वगैरे ऑप्शन नाहीच, प्रत्येक गोष्ट साग्रसंगीत असावी आणि ती काकुनींच या ही वयात कष्ट घेऊन करावी हिच त्यांची इच्छा असते.
खूप वाईट वाटतं काकूंसाठी. मीच काय त्यांचे नातेवाईक पण सांगतात, आता सवय मोडा काकांची.
तुम्हीही थकल्यात, नाही म्हणायला शिका जरा.
होत होतं तेव्हा सारं केलंत, आता स्वतःलाही जपा.
पण ना काकू बदलत ना काका.
बघणारे मात्र उसासे सोडत राहतात. जमेल तसं दोघांना समजावत राहतात.
अशी अजूनही बरीच घरं आहेत, जिथे अगदी हाच प्रकार थोड्या बहुत फरकाने चालतो.
बायकोला म्हातारं व्हायची मुभा नाही, थकून आडवी पडायची परवानगी नाही. ती आपल्या हक्काची, अगदी मरेपर्यंत तिचा विचार न करता हक्क गाजवत राहायचं बस्स!!!
अशा माणसांचं अगदी कितीही करा, काहीही करा यांची कुरकुर काही थांबण्याचं नाव घेतच नाही!!!
तसं सगळंच काही अतिरंजीत नसतं बरं मालिकांमधलं, अनुभव नसणाऱ्यांना मात्र उगाच तसं वाटतं. आणि ते भोगलेेल्यांंच्या मात्र बघताक्षणीच डोळ्यांच्या कडा ओलावून जातं........
उगाच का मालिकांमधली पात्रं लोकप्रिय होतात, कारण रस घेऊन बघणाऱ्या प्रत्येकाला त्यातल्या कुठल्या ना कुठल्या पात्रात आपलं सोसलेलं पात्र दिसतं.......!!!
हो ना???
©️स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार : गुगल
लेख आवडल्यास लाईक करा, कमेन्ट करा, फॉलो करा. पण शेअर करताना मात्र नावसकटच करा. कॉपीराईट आहे, तेव्हा जरा काळजी घ्याच.😊
Previous article
Next article
