पालकत्व
बालक पालक
मराठी कथा
विनोदी
बडा नटखट है रे......
सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९
हल्ली आमचा बाब्या मधेच एक हात वरती करून स्टॅण्डssssप म्हणून ओरडत मध्यरात्री कधीही डायरेक्ट उभा राहतो.
हा असा केकाटला की मी दचकून जागी होते, एक तर अर्धवट झोपेत काय झालं हेच सेकंदभर कळत नाही.
काय रे बाबा, कोण अंगात आलं?, विचारलं तर त्यालाही आठवत नसतं, एक्झाक्टली कुठल्या कारणाने आपण हा अवतार धारण केलाय ते.😲
मग मीही जास्त डोक्याचा भुसा न करता त्याला एका दमात उचलून आडवं पाडते.
नवीनच लागलेलं खुळ आहे हे, तिकडे त्याची टिचर वर्गात ओरडत असेल, आणि हा माथेफिरू घरी, कधीही वेळी-अवेळी. 🤦
तर असा हा आमच्या घरातला लल्ला, बघितलं तर एक नंबरचा घनचक्कर.......🙄
आमच्या लल्लाची मोठी शत्रू कोण असेल तर ती शाळा. अजिबात आवडत नाही त्याला शाळेत जायला.....
अनेकदा त्याला जवळ घेऊन विचारलं, काय रे बाबा, कोण चावतं का तुला शाळेत? तोंड का वाकडं होतं तुझं, शाळेचं नाव काढलं की?
पाहिल्यांदी लल्ल्याने दिलेलं उत्तर होतं, शाळेत टिचर सारखी तोंडावर बोट ठेऊन शु sss शु ss करते, कोणाशी काही बोलूच देत नाही, मग मला पेंग येते.
हल्ली नवीन कारण शोधलयं, तुला मोबाईलवर वेळ नको मिळावा म्हणून.
काय आहे, मी फोनवर सांगत असते ना ज्याला त्याला, पोरगा शाळेत गेला की दोन तास मिळतात कसे बसे मोबाईलकडे बघायला.
तेच लल्ल्याने नेमकं हेरलं, आणि शाळा बुडली तरी बेहत्तर पण मम्मीला ते सुख मी मिळू देणारच नाही, असा ताबडतोब शपथविधी करून घेतला त्याने, आणि त्वरित अंमलबजावणीही चालू केली.
तर असा हा आमच्या घरातला कान्हा, बघितलं तर एक नंबरचा बिलंदर......🙄
आमचा हा कान्हा पक्का जळकुंडा आहे बरं का. दुसऱ्या नंबरच्या भावंडांची जमात कानामागून येऊन तिखट होणारी असते, हा त्यातलाच.
मम्मी फक्त आणि फक्त माझी, दुसऱ्या कुणाची नाही. ताई आणि पप्पा, better you stay away from her!
माझ्याशिवाय तिच्या आसपास कोणी दिसलं तर एकेकाचं तंगडं तोडून हातात देईन, असाच अविर्भाव असतो सदा न् कदा त्याच्या चेहऱ्यावर!
बघितलं तर पाप्याचं पितर, आपलाच धक्का लागून ह्याला टेंगळ यायचं, म्हणून याच्या जास्त कोणी नादाला लागत नाही, इतकच काय ते.
तर असा हा आमच्या घरातला मुरारी, बघितलं तर एक नंबरचा फुसका बार.....🙄
आग लावायचा उद्योग तर सर्वात आवडता या मुराऱ्याचा!
पप्पाने घरात पाऊल ठेवलं रे ठेवलं, की ताईच्या चहाड्या सुरू. अभ्यास बिभ्यास काही केला नाही, नुसता टि. व्ही. लावून बसलेली, मला चंपक म्हणाली, मला चिमकुटा काढला,माझं डोकं टणकवलं अशा अनेकानेक सुचतील तेवढ्या कमीच.
ताईबरोबर बाहेर खेळायला जातो, आणि ताईला कोण कोण, कसे कसे, कुठल्या कुठल्या नावाने चिडवतात, हे अगदी न विसरता कुणी विचारलं नाही तरी सांगतो.
पप्पाने हातात मोबाईल घ्यायची खोटी, की लगेच मम्मीला खबर पोचलीच पाहिजे. मम्मीss पप्पा माझ्याशी खेळत नाहीयेsss मोबाईल घेऊन बसलाय करून जोरात केकाटणार.
सगळ्या घरादाराच्या सूक्ष्म हालचालींवर याची करडी नजर.
तर असा हा आमच्या घरातला कन्हैय्या, बघितलं तर एक नंबरचा चुगलखोर.......🙄
हा कन्हैय्या लहान होता, तेव्हा झोपताना मला गोष्टीचे विषय द्यायचा; भिंत, कपाट, बेड, पंखा, फरशी, आरसा, जे त्याला आठवेल त्यावर मी बोलायचं. आम्हाला कॉलेजमध्ये असे विषय द्यायचे ऐनवेळी बोलायचे, पण तेही यापेक्षा बरेच बरे असायचे. आता चार वर्षाचा झाल्यावर मला झोपताना विचारतो, पंखा कसा बनवतात, मग ट्यूबलाईट कशी बनवतात आणि टिव्ही, घड्याळ कसं बनवतात, जे समोर दिसतं ते कसं बनतं हे सांगत बसायचं.
खरंतर माझ्याही डोक्याबाहेरचं, मग पप्पा मार्गदर्शनपर व्याख्यान देतो, आणि ते देता देता पोरगं राहीलं बाजूला, तोच निद्राधीन होतो.
तर असा हा आमच्या घरातला मनमोहन, बघितलं तर एक नंबरचा पकाऊ......🙄
माझं लिहिणं हे त्याच्या नटखटपणाची देन, त्याच्या नानाविविध कारवाया गाऱ्हाण्याच्या रुपात मांडता मांडता कुठेतरी कोपऱ्यात दडलेलं माझं कौशल्य नव्याने समोर आलं.
अन् म्हणूनच आमच्या घरातल्या या कृष्णाची मी अगदी शतशः आभारी आहे!!
तेरे लाख कारनामे सरआखोंपर .....त्यानंतर फटके सुरु😜
©️स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
लेख आवडला तर लाईक, कमेन्ट आणि फॉलो नक्की करा आणि शेअर करताना नावासकटच होऊ द्या😊
Previous article
Next article
