नाद खुळा हा लागला ......!!



लहानपणी गाणी ऐकायला मिळायची ती बाजूवाल्यांच्या टेपरेकॉर्डरवर. त्यांच्या चॉईसची!!
त्यातल्या एका शेजाऱ्याची चॉईस होती, अनुप जलोटाची भजनं. सक्काळ झाली रे झाली की ऐसी लागी लगन, जग मे सुंदर है दो नाम, रंग दे चुनरिया दणदणीत आवाजात सुरू व्हायचं. मी चार वर्षाची होते, तर माझा मामे भाऊ नुकताच काही दिवसांचा जन्मलेला.
त्या एवढ्या भक्तिमय वातावरणात त्याला काही डोळा लागायचा नाही, लागला तरी बाळ्या दचकून उठायचा . 
शेजाऱ्यांना विनंती करूनही ते काही आवाज कमी करायचे नाहीत, आणि मग दोन्ही घरांची एकमेकांशी चांगलीच जुंपायची. 
गाणी या प्रकाराशी माझी पहिली ओळख झाली ती अशी, हिच गाण्यांची पहिली आठवण.
पण ती तेव्हा कानावर आपटवलेली भजनं, कायमची लक्षात राहिली,आणि नंतर मोठी झाल्यावर त्यांची आपोआप गोडी लागली, त्या आठवणी धरून ठेवण्यासाठी तेव्हा मी त्याची कॅसेटच आणली होती, अगदी आताही मोबाईलमध्ये अनुप जलोटा ठाण मांडून बसलाय.
दुसऱ्या बाजूच्या शेजाऱ्यांची चॉईस होती, जवा नविन पोपट हा, लागला मिठ्ठू मिठ्ठू बोलायला.
आणि त्यामागोमाग बाईच्या नादानंss सारं लुगड्यात गमावलं......
आsराराsss 🙆🏻‍♀️🤦🏻‍♀️
काय गाणी कानावर पडत होती. आणि पडत होती म्हणून आम्ही पोरं ती गात सुटायचो.


घरातली माणसं एकदा दोनदा सौम्य शब्दात बोलून बघायची, नाहीतर मग हाणायची. आम्हाला वाटायचं, साधं गाणं म्हटलं तर त्यात काय एवढं?? ते का नाही म्हणायचं याचं मात्र कोणीच संदर्भासहित स्पष्टीकरण देत नव्हतं.
सर्वात पहिले पाहिलेलं गाणं आठवतं ते 'सागर' पिक्चर मधलं "ओमरिया ओमरिया". त्या पिवळ्या फ्रॉकातल्या डिंपलला बघायला मला खूप आवडायचं. तिचा फ्रॉकही आवडायचा आणि केसही.
आमच्या घरी टिव्ही नव्हता, बाजूवाल्यांना बजावून सांगायचे, ते गाणं लागलं की मला बोलवा. चित्रहार लागला की मी अगदी बाजूच्या भिंतीला कान लावून बसायचे, कधी ते गाणं लागतंय अन् मी बघायला पळतीये.
त्यावेळी दुसरं एक आवडतं गाणं होतं, "सुन साहिबा सुन", त्यावर त्या मंदाकिनीसारखं कंबरेवर हात ठेवून ठुमकायला खूप आवडायचं.
कुठलीही गाणी आवडली की तो पिक्चर पाहण्यासाठी घरच्यांच्या मागे लागायचं, हा आम्हा पोरांचा रिकामटेकडा उद्योग असायचा, असे फक्त एका गाण्यासाठी पाहिलेले पिक्चर तर खूप आहेत.
तशी आमची पूर्ण फॅमिली पिक्चरप्रेमी होती, त्यामुळे खूप काही पटवायला लागायचं नाही.
धाकटा मामा खबर घेऊन यायचा कुठला नवीन चांगला पिक्चर आलाय, आम्ही पोरं लगेच त्यातली गाणी गाऊन नाचून दाखवायचो, मग काय बेत पक्काच होऊन जायचा.
असाच सनी देओलच्या 'अर्जुन' पिक्चर मधलं "ममिया केरो केरो केरो मामा, दुनिया ना माने तो गोली मारो" हे गाणं आवडायचं म्हणून पिक्चर बघायचा घाट घातला, आणि तेवढं गाणं पाहून जे झोपलो ते पिक्चर संपल्यावरच आम्ही पोरं उठलो.
तसंच "दे दे प्यार दे" गाण्यासाठी 'शराबी' बघताना झालं. त्या गाण्यासाठी गेलो खरे, पण तो ढोसायला बसला की घरचे डोळ्यावर हात ठेवायचे. नको ते पाहू नये म्हणून. शेवटी कंटाळून आम्हीच झोपी गेलो. आताच्या पोरांइतके ओव्हर स्मार्ट नसल्याने तसं फारसं काही कळतही नव्हतं.
"मै तेरी दुष्मन" गाण्यासाठी 'नगिना' पाहण्याचे धारिष्ट केले, साप-नाग यांसारख्या वळवळणाऱ्या प्राण्यांची प्रचंड भीती वाटत असून सुद्धा!!
"डिंग डाँग बेबी सिंग सॉंग" साठी 'हिरो', "चलो चलो चले दूर कही" आणि "पतझड सावन बसंत बहार" साठी 'सिंदूर'.......
'हत्या' मधलं मै प्यार की पुजारन, 'जिते है शान से' मधलं जुली जुली, 'साहेब' मधलं प्यार बिना चैन कहा रे, 'आखरी रास्ता' मधलं गोरी का साजन, फक्त गाण्यांसाठी हे सारे पिक्चर बघितले.
तेव्हा खरं तर पिक्चरमधलं काडीचं काही समजायचं नाही, पण तो काही करून पहायचाच असायचा, त्यातल्या गाण्यांसाठी फक्त.


माधुरीचा "डिंग डाँग डिंग" वाला 'तेजाब' बघण्यासाठी कित्ती गोंधळ घातलेला, पण त्या गाण्यांनतरचं सर्व काही तेव्हा डोक्यावरून जायला लागलं.
'राम लखन' मधलं "वन टू का फोर" तेव्हा खूप फेवरेट होतं, पण त्याच्यातली बाकीही गाणी खूप आवडायची.
"तेरा नाम लिया" पासून "ओs रामजी, बडा दुख दिना" ते "बेखबर बेकदार बालमा" पर्यंत, अजूनही सूर लावत असते मी त्यावर.
तेजाब' मधलं एक दो तीन, 'त्रिदेव' मधलं तिरछी टोपीवाले, 'चांदनी' मधलं मेरे हाथो में नौ नौ चुडीया है, 'थानेदार' मधलं तम्मा तम्मा लोगे, निलम आणि चंकीचं 'तुतक तुतक तुतीया' ह्यावर अगदी पाय दुखेपर्यंत नाचायचो आम्ही पोरं. ही गाणी नाचण्यासाठी आवडायची.
'कयामत से कयामत तक' मधलीही सगळीच गाणी सारखी ऐकून ऐकून पाठ झालेली. अगदी ते काहे सताये काहे को रुलाये, राम करे तुझंको निंद ना आये सुद्धा🤦🏻‍♀️
'मैने प्यार किया' च्या गाण्यांनी सारे रेकॉर्ड्स मोडलेले. अंताक्षरीचा तर सिझन सुरू झालेला, प्रत्येक पिक्चर मध्ये अंताक्षरी हवीच. पण मैने प्यार कियाच्या अंताक्षरीची सर कोणालाच गाठता आली नाही.
ही सगळी गाणी सगळीकडे वाजायची आणि आपोआप आमच्या तोंडात यायची.
सारखी तोंडात गाणी घरच्यांना अजिबात चालायची नाहीत, त्यातून पाहुणे आलेले असले आणि आम्ही असे रेकताना दिसलो, तर इज्जतीचा पार फालुदा करायचे. उगाच स्तोत्रं,पाढे बोलायला सांगून, गणितं घालून आमची अक्कल काढायचे. वरून लक्षणं काही ठिक दिसत नाहीत, सिनेमातली नटी व्हायचंय की काय, असं विचारायचे.
उत्तर खरं तर 'हो' असायचं, पण त्यांना कोण सांगणार!!
आपल्या मराठीतले लक्ष्या (आमचा लक्ष्याच, त्यातच प्रेम वाटतं), अशोक सराफ, सचिन आणि महेश कोठारे यांचे पिक्चर आणि गाणी म्हणजे जीव की प्राण असायचा.
इकडून तिकडून ऐकून सगळी तोंडपाठ.
हीs नवरी असली, अगं अगं पोरी फसलीस ग, प्रियतम्मा प्रियतम्मा, धुमधडाक्यातली सगळीच, चिकिरी बुबुम बुबुम, सुटलाय ग थरथराट, अश्विनीss ये ना, चोरीचा मामला; मामाही थांबला, बनवाबनवी, हृदयी वसंत फुलताना, एकापेक्षा एक मधलं दोन रूपे रूपे दे ग मला; ही गाणी सुद्धा खूप आवडायची तेव्हा मला.
नंतर घरी जेव्हा टेपरेकॉर्डर आला, तेव्हा मोठा मामा सकाळी उठला की गाणी सुरू करायचा, आम्हाला उठवण्यासाठी.
आमची सकाळची सुरुवात व्हायची ते, मराठीतली भक्तीगीतं, भावगीतं, भारुड ऐकून, खूप प्रसन्न वाटायचं दिवसभर.
मराठीतली सगळी नवी-जुनी गाजलेली गाणी तोंडपाठ झाली होती त्यामुळे!! अजूनही आहेत, कृपा आमच्या मामाची!
कोळीगीतंही जरा जास्तच फॉर्मात होती तेव्हा!!बिलनशी नागीन निघाली, आठशे खिडक्या नऊशे दार, एकविरा आई तू डोंगरावरी, पारू गो पारू, हिल हिल पोरी हिला ही गाणी सगळीकडे ढणढणत असायची.
नॉनस्टॉप गाण्यांचं एक फॅड आलेलं, नॉनस्टॉप 100 कोळीगीते, नॉनस्टॉप 50 गाजलेली मराठी गाणी.
आणि देवांची गाणी गाजलेल्या मराठी किंवा हिंदी गाण्यांच्या चालीवर!! जास्त करून साई बाबांची असायची.
साई की लिला अपार, चलो रे शिर्डी चलो😅
या सगळ्या गाण्यांवर वाढले मी, म्हणायला काही हरकत नाही. ती त्या वेळी ऐकलेली, ऐकवली गेलेली, गाणी अजूनही जशीच्या तशी त्या आठवणींसकट मनात घर करून आहेत, आणि सदैव राहतील. लहानपणीची मधुर आठवण म्हणून. 
हा जो नाद लहानपणी लागला, तो पुढे जाऊन जीवनाचा एक भागच बनला. कुठलंही इमोशन असो, त्यानुसार गाणी मनात आपोआप सुरू होतातच!!
इतकंच काय तर आता ही सगळी गाणी माझ्याकडून माझ्या मुलीपर्यंत पोचून तिचीही आवडती झालीयेत. कधी टिव्हीवर लागली तर तीही माझ्याबरोबर आवडीने बघते आणि मी त्या प्रत्येक गाण्यांची तिला आठवण सांगत बसते. 
हा सगळा काळ 90 पर्यंतचा होता, जिथे मी लहान होते, इथूनच सुरुवात झाली होती, पुढचा काळ तर सुवर्णकाळ होता गाण्यांसाठी, जो आजही 90's चा दौर म्हणून ओळखला जातो. तेव्हा मी वयात येत होते, तेव्हाही गाणी सोबत होतीच; त्याच्याही गोड आठवणी आहेत, त्याबद्दल पुन्हा कधीतरी!!!
तुमच्याही लहानपणातल्या गाण्यांच्या आठवणी वाचायला आवडतील मला, सांगताय ना??
©️स्नेहल अखिला अन्वित

लेख आवडल्यास लाईक कमेंट आणि फॉलो नक्की करा आणि शेअर करताना नावासकटच करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel