मराठी कथा
सामाजिक
मी वाट पाहतेय, माझ्या सुनेची.....!!
शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९
प्रभाताईंनी चार साड्या बेडवर टाकल्या आणि प्रमोदरावांना विचारलं, बोला कुठली नेसू??
प्रमोदरावांनी त्या साड्या खालीवर केल्यासारखं केलं, आणि म्हणाले, ही नेसा जांभळी.
प्रभाताईंना खरं तर पिवळी नेसायची होती, तो त्यांच्या आवडीचा रंग!!
पण काही न बोलता त्यांनी जांभळी उचलली, आणि आवरून प्रमोदरावांबरोबर लग्नाला जायला निघाल्या.
प्रमोदरावांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे लागायची.
माझ्याकडेच चॉईस आहे फक्त, मला सगळ्यातलं सगळं कळतं, असं त्यांना वाटायचं.
अगदी स्वैंपाकाच्या बाबतीतही तेच!!
प्रभाताईंनी स्वतःच्या मनाने काही बनवलं, तर हमखास त्यात चूक काढणार. ही भाजी अशी कशी बनवली? यात तो मसाला तुम्ही घातलाच नाहीत. हा रस्सा कोणी असा बनवतं का, नुसतं पाणी आहे पाणी!!
काही येत नाही तुम्हाला, मला तरी विचारायचं ना??
त्यामुळे काहीही करताना प्रभाताईं त्यांचं अनमोल मार्गदर्शन घेऊनच करत. भाजी, आमटी किंवा कुठलाही पदार्थ केला, की प्रमोदराव प्रथम टेस्ट घेणार, आणि मग त्यात काय कमी जास्त झालं हे सांगणार आणि मगच तो पदार्थ ओके होणार.
त्यांच्या मते प्रभाताईंच्या जिभेला काडीची चव नाही, त्यांना काही कळत नाही.
संसार नवीन होता, तेव्हाही प्रमोदराव असे प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये करायचे. तू हे कर, हे नको करू, हे जरा असं बनवायचं होतं, तुला हिच साडी चांगली दिसेल, आपण ही वस्तू घेऊ, ही जास्त उपयोगी आहे, प्रत्येक गोष्टीत आवर्जून मत दयायचे. तेव्हा मात्र प्रभाताईंना वाटायचं, माझा नवरा किती हौशी आहे!!
माझा नवरा घरातल्या प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट घेतो. माझ्याकडेही त्याचं लक्ष आहे. त्यांना खूप आनंद व्हायचा त्यावेळी.
पण असं करत करत हळूहळू प्रमोदरावांच्या मतांनी आपल्यावर कधी कब्जा केला हे त्यांना कळलंही नाही.
प्रत्येक गोष्टीत ते आपलं नाक खुपसत होते.
सगळं घर त्यांनी त्यांच्या सूचनेनुसार आणि चॉईसनुसार लावलेलं होतं!!
अगदी मुलगा झाल्यावर सुद्धा त्याचं सगळं करताना यांच्या सूचनेचा भडिमार असायचा. आणि प्रभाताईं कावऱ्याबावऱ्या होऊन आणखीनच चुकायच्या.
त्यांना वाटायचं सासू नाही म्हणून किती बरं वाटलेलं आपल्याला, पण यांच्या जाचापुढे एकवेळ तो सासुरवास परवडला असता.
खरंतर प्रभाताईंनी तसा बरेचदा त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केलेला, पण मग प्रमोदराव रुसून घरातून निघून जात. दोन दोन दिवस घरी येत नसत. आणि आल्यावर पण अखंड धुसपुस चालू राही.
मग हळूहळू प्रभाताईंनी विरोध करणंच सोडून दिलं आणि त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकून आपला पूर्ण कॉन्फिडन्सच घालवून टाकला.
लग्नाअगोदर प्रभाताईंचा चकल्या करण्यात हातखंडा होता. लहानपणापासून आईला दिवाळीच्या चकल्या करताना बघून आपल्या आवडीचा पदार्थ त्यांनी आईकडून अगदी तिच्यासारखाच होईल असा शिकून घेतला होता.
लग्नानंतरही सर्वाना खूप आवडायच्या त्यांच्या हातच्या चकल्या.
पण एकदा कसं कुणास ठाऊक काहीतरी प्रमाण चुकलं आणि चकल्या फसल्या. तर प्रमोदरावांनी केवढा तरी ऊहापोह केला त्या गोष्टीचा!!
तुमचं लक्षच नसतं, इतकं साधं जमत नाही; पासून बऱ्याच गोष्टी बोलून त्यांची अक्कल काढली होती.
वरून दिवाळीला येणाऱ्या पाहुण्यांसमोर सारखं आमच्या चकल्या बिघडल्या यावेळी, तिला काही जमत नाही हो हल्ली, असं तुणंतुणं वाजवलं होतं.
तेव्हापासून पुढे कधीच प्रभाताईंच्या चकल्या नीट बांधल्या गेल्या नाहीत, सगळं सुटतच गेलं, आणि मग त्यांनी ते कायमचंच सोडून टाकलं, मला जमणं शक्यच नाही म्हणून!!
आता त्यांनाही असंच वाटतं, आपल्याला कशातलंच काही कळत नाही, त्या फक्त प्रमोदरावांना फॉलो करतात.
या दोघांचा मुलगा आता लग्नाला आलाय.
आणि जेव्हापासून ती अग्गबाई सासूबाई सिरीयल चालू झाली, तेव्हापासून मात्र त्यांच्या मनात आशेचा किरण जागा झालाय. त्यांना शुभ्रासारखी सून हवीये, त्यांच्या घराचा कायापालट करण्यासाठी!!
त्यांना फार वाटतं, मी नाही आणू शकले पण माझ्या सुनेने या माणसाला वठणीवर आणावं!!
प्रभाताई खूप आतुरतेने वाट बघतायत त्यांच्या सुनेची, देव करो आणि इथून पुढे तरी सर्वकाही त्यांच्या मनासारखे होवो, आपण एवढी सदिच्छाच व्यक्त करू शकतो, हो ना??
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास लाईक, कमेंट नक्की करा आणि शेअर करताना मात्र नावासकटच करा.
Previous article
Next article