मराठी कथा
विनोदी
अहो राया, जरा माझं ऐकणार का??
सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९
सुट्टीचा दिवस म्हटलं, की हल्ली आमचा राया उठला की खाऊन पिऊन घरातल्या सगळ्या मोडक्या तोडक्या वस्तू रिपेअर करत बसतो. काहीच नाही मिळालं तर पोरग्याने तोडलेली खेळणी जोडत बसतो.
अस्सा सगळा भोवताली पसारा मांडून ठेवतो की पाहणाऱ्याला वाटलं पाहिजे अगदी पट्टीचा दुरुस्तीकार दिसतोय बुवा!!
सगळ्या आकारातले खिळे, स्क्रू,पान्हे, नट, वॉशर्स, पक्कडी, फेविकोल, फेविस्टिक एकन् एक गोष्ट त्याच्या बाजूला पडलेली असते, मेरा नंबर कब आयेगा म्हणत.
राया इतका गढलेला असतो की डोकं वर काढायला फुरसत नसते, बाप्याकडे!!
पोरगं त्याला एकेक तुटलेल्या वस्तू आणून देत असतं, आणि बापलेक डोक्याला डोकं लावून तासन् तास काहीतरी खुटपुट करत बसतात.
पोराला तर वाटतं, आपला बापू म्हणजे कोण आहे नि कोण नाही!!
आपला जन्म खेळणी तोडण्यासाठी आणि आपल्या बापाचा जन्म ती जोडण्यासाठी झालाय, हा गाढ विश्वास तो उराशी बाळगून आहे.
त्यामुळे खेळणी कशाला तोडतो रे, म्हणून व्हसकलं की तोऱ्यात म्हणतो, पप्पा आहे ना, देईल की रिपेअर करून!!
तर आमचा राया असा अचानक एवढा कामात गढून जायचं कारण म्हणजे; त्याच्या मते, जशी सून रिकामी बसलेली कुठल्याही सासूला बघवत नाही, अगदी तस्सच नवरा रिकामा बसलेला कुठल्याही बायकोला बघवत नाही.
बायको खोदून खोदून काम काढणार!! ह्यांची कामं तर करा आणि वरून असंच केलं, अन् तसच केलं म्हणून बोलणीही खावा, त्यापेक्षा आपणच आपलं काहीतरी काम काढून त्यात डोकं घातलेलं बरं.
म्हणजे किमान बायको फुटकळ कामं देताना विचार तरी करेल.
मी म्हणते, फुटकळ कामं राहू द्या की बाजूला. पण महत्वाची कामं तरी करावीत की नाही??
सुट्टीचा दिवस दोघांचा असतो, पण तो एन्जॉय मात्र एकच करणार, ये क्या बात हुई??
सुट्टीच्या दिवशी आम्हाला कामातून सुट्टी नाही, आणि ह्यांनी मात्र खुश्शाल लोळत पडायचं? जीव जळणार नाही का कुठल्या बाईचा!!
बरं, नुसतेच लोळत पडणार नाहीत तर वरून ऑर्डरी सोडणार, आज काही तरी फर्मास बेत होऊन जाऊ देत!!
काही दिवस रायांची अशी नाटकं बघितली, मग मात्र मी रायांची खोड मोडायचं ठरवलं.
पुढच्याच सुट्टीच्या दिवशी, त्यांनी नेहमीप्रमाणे आरामात लोळून फर्मास बेताची ऑर्डर सोडली आणि मी लग्गेच म्हणाले, फर्मास बेत ना? नक्की होईल, पण राया आधी मला बाजारात जाऊन फर्मास बेत बनवण्याचं साहित्य आणून दया ना!!
रायांना कळलं, आता काय ही बया लोळून खायला घालणार नाही, रायांनी गुमान जाऊन साहित्य आणून दिलं.
साहित्य हातात घेतानाच त्यांना म्हंटलं, मी फर्मास बेत करण्याची तयारी करते; तोपर्यंत तुम्ही राया, त्या धुळीने माखलेल्या पंख्यावरून हात फिरवून जरा त्यांना त्यांचा मूळ रंग प्राप्त करून दया ना!!
पंखे चमकायला लागले, अन् राया स्वतःवर खूष होऊन मला सांगायला येताच मी रायांना हलकेच म्हटलं, तो तुमचा फर्मास बेत बनवण्यासाठी मी खमंग वाटण करतेच आहे, पण राया तुम्ही जरा घरातल्या भिंतीवर खूप दिवसांपासून लटकत असलेल्या जळमटांवर अलगद झाडू फिरवून घ्या ना!!
रायांनी धुसपुसत का होईना जळमटांची विल्हेवाट लावली, तेवढयातच रायांकडे लाडिक स्वरात दुसरी ऑर्डर आली, आता ते तुमचं फर्मास फोडणीला घालेपर्यंत राया, बाथरूम मधल्या कपाटात झुरळांनी हाहाकार माजवलाय, त्यांचं जरा नामोनिशाण मिटवून या ना!!
रायांनी लगेच माझ्यावरचा सगळा राग त्या झुरळांवर काढून त्यांचा खातमा खातमाच करून टाकला.
निष्पाप झुरळांचा जीव घेऊन रायांनी मला चिडूनच विचारलं, झालं का बाई तुझं सगळं??
मी म्हटलं, आता होतच आलं; मी त्या बेतावर बारीक नजर ठेऊनच आहे, अगदी फक्कड होणार बघा सगळं!!
पण राया तोपर्यंत तुम्ही जरा त्या माळ्यावर भांड्यांच्या टपात काचेच्या बाऊलचा सेट आहे, तो जरा काढून दया ना!!
रायांना खरंतर तो बाऊलचा सेट माझ्याच डोक्यात फोडावा वाटत होता, पण आवरतं घेऊन स्टुलावरनं माळ्यावर चढून रायांनी तो सेट माझ्या हातात तिरस्कार भरल्या नजरेने सुपूर्त करून टाकला.
खरंतर अजून बरीच कामं बाकी राहिली होती सुट्टीची, पण रायांच्या तोंडावरून आता मी काहीही बोलले तर दे दणादण होणार असा अंदाज आल्यावर रायांना त्यांच्या फर्मास बेतावर ताव मारायला बसवलं.
फर्मास बेतावर उभा आडवा हात मारून स्वारी खुशीत आली, की अजून एक होतं, पण जाऊ दे, दमायला झालं असेल नाही तुम्हाला?? म्हणून सोडून दिलं की राया स्वतःहूनच विचारणार, हे चांगलंच ठाऊक होतं मला!! त्याप्रमाणे त्यांनी विचारलंही, बोल काय ते बोल बाई एकदाचं.
मग म्हटलंच, बाकी सगळं झालंय राया फक्त तो कुठला प्रोजेक्ट दिलाय शाळेने तो काय पोरगीकडून धड हुईना झालाय, जरा तिला मदतीचा हात मिळाला असता तर.........
गुणाचा माझा राया पोरीला घेऊन प्रोजेक्ट करायला बसला, आणि जेवणानंतर ताणून द्यायचा माझ्या रायाचा बेत आपोआप धूळीस मिळाला.
त्या दिवसापासून अचानक काय झालं कुणास ठाऊक??
आमच्या रायाने त्याच्या डोक्यात घरातल्या मोडक्या तोडक्या वस्तू जमवून दुरुस्त करत बसायचं खूळ भरून घेतलं आणि माझा राया सुट्टीचा पूर्ण दिवस त्यात डोकं खुपसून बसू लागला.
इतका की अगदी आपल्या लाडक्या राणीकडे मान वर करून बघायलाही फुरसत नाही मिळत त्याला!!
भले दहा गोष्टीतल्या चार गोष्टी, चार दिवस चालण्यालायक ठिक करत असेल, पण आताशा रायाचं सुट्टीत लोळून ऑर्डरी सोडणं बाकी बंद झालय बरं का!! आणि बायकोपासून पळवाट शोधण्याच्या निमित्ताने का होईना, त्याच्याकडून पोरांना, तोडलेलं जोडताही येतं, हे शिकायला मिळतंय ते काही कमी आहे का??
हो की नाही??😜
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
लेखाचं जास्त काही मनावर घेऊ नका बरं का!! मात्र ज्याने त्याने वेळच्या वेळी सावध झालेलं चांगलं, नाही का??
Previous article
Next article