कौटुंबिक
मराठी कथा
सुयशने आईचा निर्णय समिधाला सांगितला तर ती म्हणाली, आपण कशाला जायचं, त्यांना जाऊ देत की, जा म्हणावं गावाला जाऊन राहा. देवदेव करत फिरत बसा नाहीतर.
घर कसं भरलेलं हवं......!!
गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९
विणाताईचं त्यांच्या सुनेशी, समिधाशी अजिबात पटत नव्हतं. दोघींचा एकमेकींशी अगदी छत्तीसचा आकडा!!
एकीचंच कुणाचं चुकत होतं असं नाही, दोघींनाही एकमेकींशी जमवून घेता येत नव्हतं.
जास्तच कुरीकुरी वाढल्या, तेव्हा विणाताईंनी आपल्या एकुलत्या एका मुलाला, सुयशला बोलावून सांगितलं, तुमचं तुम्ही आता वेगळं बघा.
इथं एका घरात आम्ही दोघी काही नीट राहू शकणार नाही. तुमचं तुम्ही सुखाने जगा, आमचं आम्ही सुखाने जगतो.
रोज उठून नवीन तमाशा नको.
सुयशलाही ते दिसतच होतं. दोघींनाही एकमेकींसोबत राहणं आवडत नव्हतं. आणि दोघीही भांडताना कुणाचंच ऐकायला तयारही नसायच्या. हाच मार्ग होता आता शांतीचा.
सुयशने आईचा निर्णय समिधाला सांगितला तर ती म्हणाली, आपण कशाला जायचं, त्यांना जाऊ देत की, जा म्हणावं गावाला जाऊन राहा. देवदेव करत फिरत बसा नाहीतर.
सुयश म्हणाला, असे कसे जातील ग ते गावाला, कोण आहे तिथे आता त्यांचं??
इथे दोघांनाही एकमेकांचा आधार आहे. त्यांना काही झालं तर आपण धावणार आणि आपल्याला काही झालं की तेच असणार. हल्ली कशाचा भरोसा आहे का??
मला आणि बाबांना तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुमच्या दोघींच्या भांडणात आमचा बळी जातोय फुकटचा.
आणि आई-बाबा गावाला गेले तर आपल्या मुली कुठे राहणार ग?? माझी आई जेवढं करते, त्याच्या निम्मं तरी करणार का कोणी?? कितीही काही दिलंस तरी ते जेवढ्यास तेवढंच बघणार.
मुलींचा विषय निघाल्यावर समिधाकडे काही बोलायलाच नव्हतं. तिला विणाताईंचं मुलींवरचं प्रेम चांगलंच माहीत होतं.
शेवटी एकदाचे हो-नाही करत करत, सुयश आणि समिधा घराबाहेर पडले. त्यांनी तिथेच जवळपास आपलं बिऱ्हाड केलं. दोन्ही मुली मात्र आम्ही आजी-आजोबांजवळच राहणार म्हणून हट्ट धरून बसल्या. त्यांच्या हट्टापुढे कुणाचंच काही चाललं नाही.
त्या विणाताईंकडेच राहिल्या. त्यांनाही त्या हव्याच होत्या.
विणाताईंनी मुलींचं तेवढं केलंच होतं. दोघीही जुळ्या. जन्मानंतर सहा महिन्यानंतर समिधा ऑफिसला जाऊ लागली.
तशा मुली विणाताईंच्या हातात आल्या. त्यांचं सर्व त्या अगदी मायेने करायच्या. दिवसभर दोघी त्यांच्याच अंगावर. अगदी आई ऑफिसवरून आली, तरी आजीच्याच मागे मागे असायच्या. आजीचा स्पर्श त्यांना जास्त आश्वसक वाटायचा. कारण सर्वात जास्त त्यांना तोच मिळायचा.
अगदी झोपतानाही त्यांना आजीचीच कुशी लागायची.
मोठ्या होऊ लागल्या, तशा तर भांडायच्या एकमेकींशी, आजी माझ्याकडे तोंड करणार म्हणून, मग विणाताई दोघींच्या मध्ये पाठीवर झोपून दोन हाताला दोन्ही बाहुल्यांना घेऊन झोपायच्या. पोरींना जरा काही झालं की विणाताईंच्या डोळ्यात पहिले पाणी यायचं.
भले सुनेशी त्यांचं मिनिटभर का पटेना, पण मुलींवर मात्र त्या जीव ओवाळून टाकायच्या.
मग जाणार तरी कशा मुली त्यांच्या लाडक्या आजीला सोडून दुसरीकडे?
तिच्याकडे नेण्यासाठी समिधाने त्यांना खूप आमिषं दाखवली, चला तुम्हाला हे घेऊन देते, ते घेऊन देते, तुमची खोली आपण मस्त सजवूया वगैरे वगैरे.
पण मुली ढिम्म हलायला तयार नाही. त्यांचं एकच, आजी आली तर आम्ही येणार. तू आमच्या आजीला पण घेऊन चल.
मग मात्र समिधाचा नाईलाज झाला. आणि ते दोघेच वेगळीकडे राहू लागले. मुली कधी सुट्टीच्या दिवशी दिवसभर असायच्या, पण झोपायला मात्र त्यांना आजीच लागायची.
खरं तर मुलींच्या अशा वागण्याचा समिधाला खूप राग येत होता. इन्सलटिंगही वाटत होतं तिला की आपल्याला सोडून मुली त्यांच्याकडे धाव घेतात. पण तिही जाणून होती विणाताईंची मुलींवरची माया!!
मुली एकवेळ आईबरोबर कुठे जाणार नाहीत, पण विणाताईंची पाठ मात्र त्या सोडायच्या नाहीत. त्या जातील तिथे ह्या मागे असायच्याच.
मुलींना आई आवडायची नाही असं नाही, पण लळा जास्त आजीचा होता.
मुलींविना समिधाला वेगळं घर खायला उठायचं. कसला चिवचिवाट नाही, काही नाही. त्यापेक्षा तिकडे बरं होत, असंच तिला हळूहळू वाटायला लागलं.
इकडे मुलीसुद्धा आजीला विचारायच्या, तू आमच्याशी एवढी छान वागतेस, मग आईशी का ग भांडतेस??
तू भांडू नको ना, म्हणजे आई पण इथे राहील, आपण सगळे एकत्र राहू.
विणाताईंना कळत होतं, मुलींना आईसुद्धा हवीय. नैसर्गिक ओढ आहे ती. त्यांना आईकडे जावं वाटत असूनही माझ्यावर जास्त जीव असल्याने त्या इथे राहतायत.
मोठ्यांच्या भांडणात लहानांच मन मारलं जातंय.
खरंतर सासू आणि सून या दोघींनाही मनातून वाटायला लागलं होतं, झालं तेवढं पुरे झालं, आता मुलींसाठी पुन्हा एकत्र येऊया.
पण तसं बोलायला मात्र दोघींचीही जीभ अडकत होती.
पुढाकार घेणार तरी कोण??
काही दिवसांनी दोन्ही मुलींचा वाढदिवस आला. विणाताईंकडेच छान साजराही झाला. जेवणखाण झाल्यावर समिधा जायला निघाली, तशा मुली जोरात रडू लागल्या, आई, तुम्ही पण रहा ना इथेच, आपण सगळे राहू ना अगोदर कसे राहत होतो तसे!!
समिधाने मुलींना जवळ घेतलं, तसं तिला खुप रडायला आलं. त्यांना मिठी मारून ती रडायला लागली. कचाकचा भांडणाऱ्या आपल्या सुनेला असं रडताना पाहून विणाताईंना पण खूप गहिवरून आलं. त्या तिला आवरण्यासाठी तिच्या जवळ गेल्या आणि म्हणाल्या, रहा ग इथेच. तुमचंही घर आहे हे. आम्हाला तरी कोण आहे तुमच्याशिवाय.
समिधाला त्यांच्या या आधाराच्या शब्दांनी खूप बरं वाटलं. सगळा राग, इगो गळून पडला.
ती डोळे पुसत विणाताईंना म्हणाली, खरंच हो, तिथल्या शांतीपेक्षा इथली भांडणं लाख पटींनी चांगली होती; असं वाटतंय आता मला. घर कसं माणसांनी भरलेलंच हवं!!
मुली घरभर आनंदाने नाचू लागल्या. आता मज्जा येणार सगळे एकत्र राहणार, करत ओरडू लागल्या.
सुयश म्हणाला, तुम्हाला मज्जा येणार आणि आमची मात्र सजा चालू होणार!!
काय बायांनो, खरं ना??
विणाताई आणि समिधा एकमेकिंकडे बघून ठसक्यात म्हणाल्या; म्हणजे काय, अगदी खरं!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Previous article
Next article