पोराचं लगीन काय हुईना झालंय........!!

काल आमच्या नेहमीच्या भाजी विकणाऱ्या काकूंकडे भाजी घ्यायला गेले, तर त्यांचा काही भलताच मुड होता. तशा नेहमीच आमच्या गप्पा होतात, इकडच्या तिकडच्या. त्या आमच्याच गावाकडच्या असल्याने आमचं जमतंही भारी!!

पण काल माझ्या पिशवीत भाजी भरता भरता त्या काकू म्हणाल्या, तायडे कुठली पोरगी बघ की असल तर माझ्या पोराला??

मी दबकूनच विचारलं, काय म्हणता? लग्न नाही झालं अजून पोराचं??

काकू म्हणाल्या, कुठलं ग बाई?? कुनी बी पोरगी दिना झालंय बघ!!

मी म्हटलं, का हो?? कामाला आहे ना??

त्या म्हणाल्या, पोरगा येस्टीत डायवर हाये, म्हणशील तर  बिडी काडीचा कसलाबी शोक न्हाई त्याला.
पर डायवर नगं कुनाला बी!! डायवर बी नग अन् कंडाक्टर बी नगं! कोन ईचारंना झालंय त्यांना!!

अहो, गावाकडची बघायची की एखादी, मी हुशारीने म्हटलं.

त्यावर काकू तोंड वाकडं करत म्हणाल्या,  बाई गावाकडच्या पोरीचं तर काय बी ईचारुच नगस.
त्यांना मोठ्ठा हापीसर पायजे. डायवर म्हनलं तर बघाया बी बोलवत न्हाईत.
लई नाकं मुरडत्याती!! 

मला काय बोलावं तेच सुचेना.

त्याच पुढे म्हणाल्या, आता पोरगं पस्तिशीचं व्हईल येत्या वर्साला!! आमी दोगं म्हातारी मानसं डोळं असंच मिटणार वाटतया.
सूनमुख काय बगायला न्हाई मिळत बग आमाला!!

साध्या साध्या पोरींचे बी हे लय मोटे नखरे!! आमचं पोरगं पंधरावी तरी शिकलय, पर डायवर हाय तर धावी नापासवाली  बी ईचारना झालीया.

म्हनूनशान तुला म्हनलं, बग कोणी घावली तर, आमच्या काय बी अपेक्षा न्हाईत. पोराचं, दोनाचं चार हात हुदे म्हंजी समदं मिळवलं.

मी म्हटलं, मिळेल हो...... तुम्ही शोधणं थांबवू नका. मी पण चार दोन ठिकाणी विचारून बघते, कोणी असेल तर!!

बग ग बाई, कुणी मिळाली तर लय बरं व्हईल, पोरीवानी जपन म्या तिला.
चार पोरींच्या पाठीवरचा एक ह्यो पोरगा हाय. ह्याचा संसार लय बघुसा वाटतुया ग, एवढं बोलून काकूंनी डोळ्याला पदर लावला.

मी पुन्हा एकदा काळजी करू नका, लवकरच लग्न होईल त्याचं, असं म्हणून तिथून निघून आले.

पण माझ्या डोळ्यासमोरून त्या काकू काही जाईनात.
मी तर पहिल्यांदा पोराच्या आईला असं पोराचं लग्न होत नाहीये, म्हणून काळजीने रडताना पाहिलं होतं.
 
पोरगा एसटी मध्ये कामाला लागल्यावर किती खूष झालं असेल घर त्यांचं! आणि आता त्या नोकरीपायीच रडायची वेळ आली त्यांच्यावर.....

पूर्वी घरातल्या मुलींची लग्न जमवताना कानावर पडायचं, पगार थोडाफार कमी असला तरी चालेल. घरातली माणसं चांगली हवी. मुख्य म्हणजे मुलगा निर्व्यसनी असावा. 

हल्ली नक्की काय हवंय, तेच काही कळत नाही बाबा लोकांना!!

आता प्रत्येकच मुलीला डॉक्टर, इंजिनिअर, किंवा कोणी मोठ्ठा साहेब कुठून आणायचा??

बरेचदा खूप जास्त चिकित्सकपणा आणि प्रमाणाबाहेर ठेवलेल्या अपेक्षा पण नुकसान करतात.

एक विशिष्ट वय निघून गेल्यावर हेच नखरे करणारे समोर येईल ते कोणीही स्वीकारतात, हे सुद्धा पाहिलं आहे.
कधी कधी तर वय वाढल्यावर बरेचदा स्थळं सुद्धा दुसरेपणाचीच येतात. आणि मग ती सुद्धा मुकाट्याने स्वीकारली जातात, कारण हातात तेवढा वेळ नसतो आणि लग्न तर करायचंच असतं!!

असं झालंय खरं जिथं तिथं.......
आता हे ज्याचा त्याचा प्रश्न म्हणून सोडून द्यायचं की त्यावर काही तोडगा निघतोय का बघायचा, हे ज्याचं त्यानीच ठरवावं!!

माझं म्हणाल तर मी काकूंसाठी कोणी सून मिळतीये का ते शोधायचं मनावर घेतलंय, कुठून काही जमलं की तुम्हाला नक्की कळवतेच!!


©️ स्नेहल अखिला अन्वित


फोटो साभार : गुगल

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel