कौटुंबिक
मराठी कथा
सामाजिक
सुख म्हणजे नक्की काय असतं......!!
मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९
रविवार सुट्टीचा दिवस, पेंडिंग कामं करावीत म्हणून मुलांना नवऱ्याच्या गळ्यात बांधून बाहेर पडले. येताना मुलीला काही घ्यावं म्हणून ड्रेसच्या दुकानात गेले तर खूप दिवसांनी तिथे कॉलेजमधली मैत्रीण भेटली. अगदी काही जवळची नव्हती, पण कॉलेजमधलं कोणीही का भेटेना आनंद होतोच.
नेहमीच्या हाय हॅलोवाल्या गप्पा झाल्यावर, साहजिकच इतर कॉन्टॅक्टमधल्या मैत्रिणींची चौकशी सुरू झाली. मी म्हटलं, ती जुई भेटते का ग तुला?? मी फेसबुकवर किती शोधलं तिला, मिळतच नाहीये.
त्यावर ती मैत्रीण म्हणाली, जुई ना? ती तर मागच्याच आठवड्यात भेटलेली मला. आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो, तिथे ती पण आली होती. नवरा आणि मुलगा पण होता बरोबर.
मी म्हटलं, हो का??
कशी आहे ग ती, कॉलेजमध्ये एकाच बेंचवर बसायचो आम्ही. नंतर काही भेटच नाही.
मैत्रीण म्हणाली, तशी ठिक वाटली. पण फारसं काही बरं चाललेलं दिसत नाही असं वाटतंय तिचं!!
मी म्हटलं, का ग?
अगं बघ ना, आम्हाला गाडी पार्क करायची होती, ती समोर दिसली मग तिलाच विचारलं, तुम्ही कुठे केली ग गाडी पार्क?
तर म्हणाली, ती बघ समोर आम्ही बाईक लावलीये.
हल्ली फोरव्हिलर किती कॉमन झालीये ना? एवढी ही नसावी?
नवरा काय बरोबर कामाला नाही वाटतं तिचा. ती सुद्धा घरीच बसून असते दिसतंय, कमवायचे ना पैसे जरा बाहेर पडून!!
मी म्हटलं, हे तिने सांगितलं का तुला?
त्यावर ती म्हणाली, मी आपला अंदाज बांधला ग. ती निघत होती आणि आम्ही जस्ट पोचलेलो. बोलायला नाही मिळालं जास्त. आम्ही नंबर एक्सचेंज केले फक्त.
मी लगेच म्हटलं, मग मला दे ना तिचा नंबर प्लिज.
त्या मैत्रीणीने नंबर दिला आणि आम्ही आपापली खरेदी करून एकमेकींचा निरोप घेवून निघालो.
मी घरी पोचले अन् पहिल्यांदा तिला कॉल लावला.
मला खूप उत्सुकता होती, तिच्याशी बोलायची. कॉलेजमध्ये आम्ही खूप काही शेअर करायचो एका बेंचवर बसून.
फोन केला तर तिच्या नवऱ्यानेच उचलला. मी ओळख सांगितली तसं त्याने पटकन जुईला बोलावलं. मला म्हणाला, मी ओळखतो तुम्हाला, जुईने मला सगळं सांगितलंय तुमच्याबद्दल.
मी म्हटलं, पण मला काहीच नाही माहिती तुमच्याबद्दल.
तर तो म्हणाला, माहिती करून घ्यायला घरीच या एकदा तुमच्या मिस्टरांना घेऊन.
मी म्हटलं नक्की येईन. तेवढयात जुईने फोन घेतला.
आणि म्हणाली, खूप पकवलं का ग तुला. माझा नवरा एक नंबरचा गपिष्ट आहे. आज सुट्टी, मग काय फोन अटेंड करायचं काम करत बसलाय.
मी म्हटलं नाही ग, छान बोलतात तुझे मिस्टर.
हो, इन्शुरन्स मध्ये आहेत ना, लोकसंग्रह बराच आहे, आणि बोलायचाही खुप नाद आहे.
मी म्हटलं, छानच ग.
बाकी नेहमीच्या गप्पा मारून झाल्यावर तिने तिच्या नवऱ्याच्याच बोलण्याला दुजोरा देत पुढच्या रविवारी जेवायला याच म्हणून खूपच आग्रह केला. इतका की मग मलाही तो मोडणं जड गेलं.
फोन ठेवला तसं माझ्या मनात त्या मैत्रिणीने सांगितलेलं आठवू लागलं. फारसं काही बरं चाललेलं नसावं तिचं!!
एकीकडे कसंतरी सुद्धा वाटत होतं, उगाच कशाला जायचं, एखाद्याची परिस्थिती बरी नसताना जेवायला वगैरे.
पण मग विचार आला, त्यांचं काही बरोबर नसतं तर एवढा आग्रह जरून त्यांनी जेवायला बोलावलं असतं का?
ठरल्याप्रणाने रविवारी आम्ही निघालो, सकाळी तिचा आग्रहाचा फोन आलाच होता.
माझी मुलं पण खूष होती. नवीन ठिकाणी जायला मिळणार म्हणून.
एका छान स्वच्छ अशा सोसायटीत तिचं घर होतं.
बेल वाजवली तसं तिच्या मिस्टरांनीच दार उघडलं.
आणि एकदम आनंदाने आमचं स्वागत केलं. मुलांशी शेकहँड वगैरे करून दोस्तीही करून टाकली. माझ्या मुलांना आत त्यांच्या मुलाबरोबर खेळायलाही पाठवलं.
तेवढ्यात माझी मैत्रीण, जुई बाहेर आली.
ती आली तशी, एक सेकंद आम्हाला दोघींनाही काही सुचलंच नाही बोलायला.
इतक्या वर्षांनी भेटलो आम्ही. एकाच शहरात असून देखील.
मग मात्र आमच्या नॉनस्टॉप गप्पा सुरु झाल्या.
तिकडे तिच्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याचा पूर्ण ताबा घेतला होता. विविध विषयांवर त्याची खलबतं सुरू झाली होती.
जुईशी बोलता बोलता माझी नजर शोकेस मध्ये ठेवलेल्या बक्षिसांवर गेली. पूर्ण एक मोठा कप्पा त्याने व्यापलेला. मी म्हटलं, ही एवढी बक्षीसं कोणाची ग?
ती म्हणाली, आमच्या गपिष्ट महाराजांची!!
नोकरीतल्या अचिव्हमेंट आहेत त्या सगळ्या. इन्शुरन्स कम्पनी मध्ये आहे बोलले होते ना मी??
बोल बच्चन आहेत एक नंबरचे, जवळपास सगळी टार्गेट अचिव्ह करतात.
मी म्हटलं, वा भारी ग!!
तुझं काय चाललंय मग??
मी बाहेर कुठे नाही जात कामाला, पण घरातून सार्वजनिक संस्था,पतपेढ्या, हौसिंग सोसायट्या यांची अकौंटस पाहते.
मी म्हटलं, चांगलंच चाललय की मग तुमचं!!
जुई डोळा मारून म्हणाली, हो खाऊन पिऊन सुखी आहोत.
मी म्हटलं, पण हल्ली सुख गाड्या-घोड्यात, मोबाईलच्या हँडसेटवरून मोजतात ग. पहिले बाईच्या अंगावरच्या दागिन्यांवरून मोजायचे.
जुई म्हणाली, हो ना. पण ते तर सुखाचे देखावे झाले ना ग?
कित्येकदा वरून सुख तर दिसत असतं, आणि प्रत्यक्षात तिथे कल्पनेपलीकडलं दुःख असतं.
मी म्हटलं, पण लोकांचा तर याच शोबाजीच्या सुखावर विश्वास असतो फक्त!!
मला खरंतर त्या मैत्रिणीचा किस्सा जुईला सांगावा असं खूप वाटत होतं, पण आवरतं घेतलं स्वतःला.
पण जुईला मात्र मुद्दामच विचारलं, काय तुम्ही घेतलय का कुठलं गाडी-घोडं?
ती म्हणाली, दुचाकी आहे बघ. नवऱ्याला तर तिच बरी पडते. सारखं हिंडावं लागतं त्याला. आणि आम्ही तिघेच तर आहोत.
त्यावरून पाहिजे तिथे हिंडूफिरू शकतो. सध्या तरी गरज नाही वाटत. पुढे बघू. उगाच शो साठी हत्ती कशाला पोसा?
मी म्हटलं, खरं ग आहे तुझं!!
गप्पात जेवणाची वेळ कधी झाली ते कळलं सुद्धा नाही.
पोरं नाचत आली भूक लागली करत, तेव्हा आम्ही हललो.
जुई आणि तिचा नवरा दोघेही ताटं-पाणी घेत होते. मी मदतीला गेले तर तिचा नवरा म्हणाला, तुम्ही बसा पानावर , आम्ही आहोत.
जुई पण म्हणाली, ते नाही ऐकणार. त्यांची मदत असतेच प्रत्येक गोष्टीत.
गुलाबजाम खाऊन बघ त्यांनी केलेत खास तुमच्यासाठी.
आम्ही जेवायला बसलो, पानातला प्रत्येक पदार्थ रुचकर होता, अगदी मनापासून केलेला.
आग्रहाचा गुलाबजाम तोंडात घातला, तर अगदी एखाद्या स्वैपाकात मुरलेल्या हाताची चव होती त्याला.
आम्ही सगळ्यांनी एकमुखाने दाद दिली.
जेवणानंतरची प्रत्येक गोष्ट आवरायला जुईला, नवरा आणि तिचा मुलगाही मदत करत होता.
सर्वांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. मन अगदी आनंदून गेलं होतं त्या सर्वांना भेटून.
एक खरोखरीचं हसतं खेळतं समाधानाने भरलेलं घर होतं ते........
आता पुढच्या वेळी मात्र त्या नसते अंदाज बांधणाऱ्या मैत्रिणीलाच घेऊन जुईच्या घरी जाणार आहे, म्हणजे तिला आपोआपच कळेल, सुख म्हणजे नक्की काय असतं.......!!
काय म्हणता??
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार : गुगल
Previous article
Next article