बोलती बंद......!!

दोन महिन्यांपूर्वी जेव्हा आम्ही पुण्याला जायच्या गाडीत बसलो होतो आणि ती गाडी सिग्नलला थांबली तेव्हा माझा छोटा मुलगा उत्साहात ओरडला, मम्मीss झेब्रा क्रॉसिंग.......
मी म्हटलं, हो रे!! सांग पाहू कशासाठी असतं ते?
तर माझा मुलगा अगोदरपेक्षा जास्त उत्साहाने ओरडून म्हणाला, याच्यावर घोडेss धावतात........
मी कपाळावर हात मारला, आणि म्हटलं, गाढवा, झेब्रा क्रॉसिंग वर घोडे धावायचा काय संबंध?? झेब्रे धावतात म्हणाला असतास तरी काही कनेक्शन लागलं असतं.
घोड्यांना कशाला मधे आणलस उगाच??

त्याचं काय झालं, काही दिवसांपूर्वी मी त्याला झेब्रा क्रॉसिंग कशासाठी असतं, हे सांगितलं होतं, मला वाटलं दिवटा बरोब्बर सांगेल!!
स्मार्टपणा ओसंडून वाहत असतो ना हल्लीच्या पोरांचा!!पण ह्याने तर भलताच तर्क लावला. घोडे धावतात म्हणून अस्सा जोरात ओरडला की त्या बसमधली लोकं त्याला सोडून माझ्याकडेच बघून "असंच शिकवता का पोराला??" म्हणून कुत्सित नजरेने घायाळ करू लागली.

आपण पोरांना सगळं माहिती असावं म्हणून सांगायला जावं आणि ह्यांनी असं ज्ञान पाजळून, आता नेमकं हसावं की रडावं या पेचात आईबापाला टाकावं!!

आमच्या वरती दुसऱ्या मजल्यावर दोन वर्षांची चिमुकली राहते. ती त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असेल तर धडधड धावत खालती आमच्याकडे येते. तिला म्हटलं, असं पायऱ्यांवरून एकटं धावत यायचं नाही, ताईचा हात पकडून हळू हळू यायचं. कळलं का?
तर मलाच म्हणते, मी पडते मला मोssठं लागतं.
मी म्हटलं, पडते ना म्हणूनच तुला सांगितलं, ताईचा हात पकडायचा.
तर तोंडावर अनेक भाव आणून मला म्हणते कशी, मी ताई पकडल्यावर पडते, कळलं का?
देवाssss काय ही पोरं, बघावं तेव्हा आपल्याला तोंडावर पडायला तय्यार...........

असाच माझ्या मैत्रिणीचा पोरगा, माझ्या पोराएवढाच आहे.
त्याच्या आईला शनिवारी सुट्टी असते, तर हा एकदा उठल्यापासून तिच्या मागे लागला, मावशीकडे चल, मावशीकडे चल.
भंडावून सोडलं तिला. शेवटी तिने मला फोन करून सांगितलं, हा बघ ना मावशीकडे जायचंय म्हणून मला सकाळपासून काही सुचून देईना झालाय. आम्ही येतोय थोड्याच वेळात.
मला एवढं भरून आलं, वाटलं किती लळा लागलाय त्याला आपल्या घराचा. 

थोड्या वेळाने त्याची आई एकटीच घरात आली. मी विचारलं, अगं पोरगं कुठाय?
ती म्हणाली, बाहेर त्या दोन कुत्र्यांबरोबर खेळत बसलाय.
मग मी त्याला बोलावलं आणि म्हटलं, काय रे तू कशाला आलायस इथे, माझ्यासाठी ना?
तर तो म्हणाला, नाहीs काहीs या कुत्र्यांना भेटायला. 
आताच्या आता ही धरणी दुभंगावी आणि आणि मला पोटात घ्यावं, अगदी अस्स् वाटलं त्या क्षणी मला!!
तो आमच्या बिल्डिंगच्या बाहेर फिरणाऱ्या दोन भटक्या कुत्र्यांसाठी माझं नाव पुढे करून आईच्या मागे लागला होता. आणि माझं हृदय मात्र पोरगं मावशी मावशी करत मागे लागलं ऐकताच प्रेमाने ओथंबुन वहायला लागलं होतं.
काय ही ओव्हरस्मार्ट पोरं, खडे खडे आपला पचका वडा करतात!!

आम्ही यांच्याएवढे होतो तेव्हा आई वडील सांगतील ती प्रत्येक गोष्ट खरी वाटायची आम्हाला. आणि हल्लीच्या पोरांना आई वडील सांगतात ते चुकून सुद्धा खरं वाटत नाही. जरा भीती घालायला सांगावं, भूत आलं झोप, तर म्हणतात ह्याs भूत बित काही नसतंच!!
पोलीस आले, बाहेरच्या खोलीत बसलेत सांगावं तर म्हणतात, चल आपण दोघं जाऊन सांगूंया घरी जावा म्हणून!!
साध्या भोळ्या पालकांनी करायचं तरी काय, कितीही गंडवू म्हटलं तरी गंडतच नाही ही चाप्टर पोरं......

एके दिवशी मी स्वैपाकघरात काम करताना, माझा मुलगा आला आणि म्हणाला, मम्मी मी लहान असताना तुझा कसा LOL (हा शब्द त्याच्या ताईकडून उचलेला)झाला होता ना?
मी म्हटलं, कधी रे?
तू नाही का सांगायचीस, पोलीस आले, पोलीस आले, झोप आता. आणि सायरन सुद्धा वाजायचा.......
मी म्हटलं, हो मग, यायचेच पोलीस.
चल, पोलीस बिलीस कोण नाही यायचे, तो सायरन तुझ्या मोबाईलमधून वाजवायचीस ना, माहिती होतं मला.
मी म्हटलं, हो का?
हेs हेs LOL मम्मीचा LOL म्हणत तिथल्या तिथे नाचायलाच लागला आगाव पोरगा........

अस्सं वाटत होतं, आता मी काय करू याचं?? एवढे सायरन वाजवले असतील, ते ऐकून झोपला नाही कधी ते गेलंच कुठे, आणि आता उगाच चिडवून दाखवतोय.

एवढ्या एवढ्या चिरकूटांनी अश्शी बोलती बंद केलीये, की हल्ली मला माझा जन्मच यांच्याकडून पोपट करून घेण्यासाठी झालाय, असंच वाटायला लागलंय !!

तुमचं काय?? तुम्हाला मिळालेत का हो असले अनुभव, चिंटूकल्यांनी बघता बघता तोंडावर पाडल्याचे........???

©️स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel