मिरॅकल्स हॅपन ..........

भूमीच्या लग्नाला सात वर्ष झाली होती, पण हवी तशी बातमी मिळत नव्हती. प्रत्येकवेळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की हिच्या मनात आशा फुलायची.
पण काही न काही कारणाने तिसऱ्या चौथ्या महिन्यातच निराशा हाती लागायची.
कोण काय सांगेल ते सर्व चालू होतं, पण फळ मात्र हाती येत नव्हतं.

दोघांनाही चांगला जॉब होता. सगळील सुखं घरात होती, तरीही भूमीचं मन मात्र अशांत असायचं. सारखा मनात तोच विचार, कधी मला हवं ते होणार? कधी मी आई होणार?
नवऱ्याचं तसं काही नव्हतं, तो म्हणायचा एवढं नको मनाला वाईट वाटून घेऊ. आणखी दोन वर्षे वाट पाहू, नाहीतर दत्तक घेऊ आपण.

भूमी म्हणायची, तसं नाही रे. दत्तकही घेऊ आपण. पण मला त्या सर्व प्रक्रियेची ओढ लागली आहे, मला खूप आवडेल, माझ्यातून दुसरा जीव निर्माण करायला.
का असं होतंय माझ्याचबरोबर.......आणखी किती वर्षे तग धरून ठेवायचा मी. कधी कधी नको वाटत सारं. माझी आशा मावळत चालली आहे रे........

भूमी खूप झुरत होती, आई होण्यासाठी. मधेच तिला वाटायचं काय वेडे आहोत आपण, एवढे वर्ष झालं नाही आता काय होणार? का मन मानत नाही आपलं??
ही आशा मरत का नाही मनातली आपल्या, का पुनः पुन्हा नव्याने स्वप्न बघतं मन??

त्या दिवशीही असाच काहीसा विचार करत ती झाडांना पाणी घालायला म्हणून गॅलरीमध्ये आली. गॅलरीतली झाडं तिचा जीव. फक्त त्यांच्याबरोबर असली की ती स्वतःची खंत विसरायची. सगळ्यांना कुठून कुठून आणून लावलं होतं तिनं. अगदी निगुतीने जपायची, तिच्यासाठी बाळं होती ती तिची.
हातगुण म्हणा की तिचं प्रेम म्हणा, तिच्या छोट्याश्या गॅलरीत जेवढा फुलापानांचा बहर होता, तेवढा पूर्ण  सोसायटीत कोणाकडे दिसायचा नाही.

तर झाडांना पाणी घालता घालता ती एका झाडाजवळ आली, वरती छान वाढलं होतं, पाणी घालताना तिला खालीही आणखी नवी पालवी फुटलेली दिसली. मनात म्हणाली, वरती तर बहरलय आता खालपासून पण नव्याने फांद्या फुटतायत वाटतं, मस्तच.
तिने पुन्हा प्रेमाने त्या नुकत्याच फुटलेल्या पालवीकडे पाहिले, आणि क्षणात तिची नजर चमकली. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. पालवी वरती मोठया वाढलेल्या झाडाला फुटलीच नव्हती.......

दोन वर्षापूर्वी तिच्या आईने गावाहून जास्वंदाच्या दोन कांडक्या आणून दिल्या होत्या. हिने त्या एका रिकाम्या कुंडीत खोवल्या, त्यातली एक भराभर वाढली. गॅलरीत असूनही बऱ्यापैकी मोठी होऊन फुलली. पण दुसरी काही फुटेना. प्रत्येकवेळी ही विचार करायची तिला उपटून टाकावं, पण तेही तिला जीवावर यायचं. तिच्या दृष्टीने ती ऑलमोस्ट डेड होती. वाळकी म्हणून सोडून दिलेली. टाकता आली नाही म्हणून ठेवली इतकंच. होईल कुठल्यातरी वेलाला टेकू दयायला म्हणून राहू दिलेली. 
आणि आता पाहते तर काय, तिलाच चक्क दोन वर्षांनी पालवी फुटलेली......!! 

इतरांसाठी डेड असलेल्या वाळक्या काठीने रुजायची आशा धरून ठेवली होती. भूमीच्या दृष्टीने ते एक मिरॅकल होतं.
तिला प्रचंड आनंद झाला, इतका की तो आनंद डोळ्यातून नुसता अविरत पाझरत होता. 

तिचा नवरा ऑफिसवरून आला तसं तिने त्याला ओढतच गॅलरीत नेऊन ते मिरॅकल दाखवलं.

डोळ्यातून पाणी थांबतच नव्हतं तिच्या, शब्दात मात्र यापूर्वी कधी नव्हता तेवढा ठामपणा आला होता. येस, होप्स आहेत, अजूनही होप्स आहेत, मी सुद्धा नाही सोडणार आशा. मलाही फळ मिळेल नक्की, अगदी नक्की मिळणार !!

हा शुभ संकेत आहे, आता माझ्या मनालाही नव्याने पालवी फुटलीये, माझी मावळणारी आशा पल्लवित झालीये. आता तर मला पूर्ण विश्वास आहे, लवकरच मी आई होणार.......!!

त्या एवढ्याश्या पालवीने इतका जबरदस्त विश्वास, इतकी सकारत्मकता भरली तिच्यात, की ती 'नाही' हा शब्दच विसरून गेली, सर्व शंका-कुशंका निघून गेल्या मनातल्या आणि होणार होणार करता करता, हो खरंच ती आई झालीही.........


©️ स्नेहल अखिला अन्वित

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel