रब्बा मेरे मुझको बचा.........🙆

मला सांगा असं कोणी आहे का ज्याचा एकही दिवस कुणालाही वावगं न बोलता जातो? खरंतर मला शिव्या न घालता जातो असं म्हणायचं होतं..........
मूर्ख, वेडा, बावळट, गाढव तर किती बेसिक लेवलचे वाईट शब्द आहेत ना? हे तर एवढ्या तेव्हढ्यावरून तोंडातून सारखे खाली उड्या मारायला उतावीळच असतात.
घरात दांडगाई करणारी पोरं असतील तर मग या शब्दांची रेलचेलच असते नाही का?
पहिले बरं होतं, मुलांनी त्रास दिला की पालक जास्त काही विचार न करता रट्टे घालायचे, पण आम्हा हल्लीच्या पालकांच्या मनात नुसता रट्टे घालायचा विचार जरी आला तरी मन आमचा धिक्कार करायला लागतं.
माझीही मुलं छळायला लागली की मलाही त्यांना कुटून काढावं वाटतं, मी काढते सुद्धा, पण फक्त इमॅजीनरी!!
मला अगदी डोळ्यासमोर दिसत असतं, मोठ्या आवेशाने मी पोरीला दोन सटासट आणि पोराला चार खटाखट वाजवून देताना.........
प्रत्यक्षात मात्र असं करायला जीवच धजावत नाही!

मारता येत नाही म्हणून त्यांच्या नावाने जीव शांत होईपर्यंत ठो ठो करत बसते आणि ते करताना नाही म्हटलं तरी स्लिप ऑफ टंग होऊन नको नको ते शब्द बाहेर पडतातच.

माझी मुलगी लहान होती त्यावेळी मुलांसमोर वाईट शब्द उच्चारायचे नसतात, थोडक्यात शिव्यांचं उच्चारण करायचं नसतं, पोर आपलं बघून शिकतात, असं बालमानसशास्त्राच्या पुस्तकात वाचलेलं प्रत्यक्षात उतरवायचा मी अगदी कटाक्षाने प्रयत्न केला होता. तिचा कितीही राग आला तरी आणि कितीही वाईट शब्द माझ्या तोंडातून बाहेर यायला अतिउत्सुक असायचे तरी मी जास्तीत जास्त मूर्ख या एवढ्या एकाच शब्दाला बाहेर काढलेलं फक्त .......पेशन्स खूप म्हणजे खूप पकडून ठेवलेले मी आणि मला त्याबद्दल माझा तेव्हा खूप अभिमान वाटत होता.

मुलगा आला, तेव्हाही मी तेच ठरवलं होतं. कितीही राग आला तरी वाट्टेल ते शब्द अजिबात वापरायचे नाहीत. पण तो जसा जसा मोठा व्हायला लागला, तसा तसा माझ्या पेशन्सचा धज्जा उडायला लागला. तोंडातून वेडे वाकडे शब्द माझ्याही न कळत बाहेर पडायला लागले. मूर्ख, महामुर्ख, बेअक्कल, गाढव आणखी काय न काय!!
प्रत्येकवेळी बोलून झाल्यावर प्रचंड म्हणजे प्रचंड वाईट वाटायचं, आणि ठरवायचे की पुढच्या वेळी सबुरीने घ्यायचं. 
पण कितीही ट्राय केलं तरी अजूनपर्यंत सबुरीने घेता आलंच नाहीये मला त्याच्याबाबतीत. 

आता तो पाच वर्षाचा झालाय. मी जशी त्याला बोलते रागवल्यावर तसं त्याने इतरांना म्हणजे त्याच्या ताईला, मला, पप्पाला बोलायला सुरुवात केली. अगदी माझ्या टोनसकट!! माझी रागात बाहेर पडणारी स्तुतीसुमनं त्याच्या तोंडून ऐकताना मलाच कोणीतरी आपल्याला थप्पड मारतय असं वाटायला लागलं.
आणि मी एका क्षणी ठरवलं, बास्स्. आता काहीतरी केलंच पाहिजे.

मग एक दिवस त्याला जवळ बोलावलं आणि म्हटलं, मी  मूर्ख, गाढव, बेअक्कल, बावळट वगैरे म्हणते ना रागवल्यावर ते खूप वाईट शब्द आहेत, लहान मुलांच्या काय खरंतर कोणाच्याच तोंडात नाही शोभत ते. 
त्यावर तो म्हणाला,  तू का बोलतेस मग? 
मी म्हटलं, राग आला की बोललं जातं रे चुकून.
मग तो म्हणाला, राग मलाही येतो ना.
मी म्हटलं, ठिक आहे आता आपण कोणीच नको बोलूया असे शब्द.
आणि जर चुकून कोणाच्या तोंडात आलं असं काही तर लगेच तू त्या बदल्यात नवीन चांगला शब्द मागायचा. तू वॉच ठेवायचा हं आता सगळ्यांच्या बोलण्यावर.

तसाही त्याचा वॉच असायचाच आमच्यावर, पण आता खुद्द मम्मीने अधिकृत रित्या परवानगी दिली म्हटल्यावर त्याने जास्तच मनावर घेतलं.
तेव्हापासून आमच्या घरात कोणी काही वावगं बोललं, तर तो लगेच टोकतो. 
मी मूर्ख आहेस असं म्हटलं जरी तर म्हणतो, मम्मी मूर्ख हा वाईट शब्द आहे, चांगला शब्द सांग आता.
मग मी त्याला छोटे मोठे वेगवेगळे चांगले शब्द सांगते. 
आम्हा कोणालाही तो वाईट शब्द बोलत असेल तर ते वाक्य पूर्ण करूच देत नाही, पहिले त्या बदल्यात चांगला शब्द सांगा, त्याशिवाय पूढे बोलायचं नाही.
बरेचदा चांगले आणि प्रत्येकवेळी वेगळे शब्द डोक्यातून काढायला विचार करावा लागतो.
असे शब्द सांगून त्याचा अर्थही सांगतो, कधी त्यावर चर्चाही होते. 

एकंदरीत मज्जा येते, लहान मुलांची ग्रहणशक्ती खूप जास्त चांगली असते, एखादा अवघड शब्द पण सहज डोक्यात घुसतो. 
शब्द त्यालाही द्यावे लागतात, मग त्या निमित्ताने तोही आमच्याकडून ऐकलेले चांगले शब्द सांगतो.

आssणि या सगळ्यात कधी डोक्याला भरपूर ताप होतो तर कधी इतक्या गमती जमती होतात की बस रे बस.......

कधी मी फोनवर कोणाबद्दल बोलत असते, बोलता बोलता तोंडातून निघतं शुद्ध बावळटपणा आहे हा!! मुलाचे कान माझ्याकडेच असतात, मी आपलं माझ्या तंद्रीत बोलत असते,  तेवढ्यात तो समोर येऊन काहीतरी हावभाव करायला लागतो,  ते काही मला कळत नाही, आणि मी खेकसते काय आहे रे? तर तो म्हणतो; मम्मी, आता तू बावळट म्हणालीस, बावळट हा चांगला शब्द नसतो, दुसरा शब्द सांग. मग मी त्याला प्रेमाने विनंती करते, बाबा आता जरा थांब, बोलून झाल्यावर सांगते. तर तो म्हणतो नाही, पहिले सांग मग बोल. देवा.......मग त्या कोणाच्या तरी बावळपणाचा ट्रॅक मधेच सोडून पोराला एखादा चांगला शब्द देऊन मला माझी गाडी पुन्हा तो वाईट शब्द वगळून त्याच ट्रॅकवर आणावी लागते. आणि तिकडे त्या फोनवरच्या लटकून राहिलेल्या माणसाला तुमचं नक्की चाललेलं तरी कायचं स्पष्टीकरण द्यावं लागतं ते एक वेगळंच!!

आम्हा नवरा बायकोला तर मनसोक्त भांडताच येत नाही त्याच्यामुळे, जरा आम्ही तावातावाने भांडणाच्या आवेशात नको त्या शब्दावर घसरलो, की हा मधेच येऊन तोंडावर हात ठेवून म्हणतो, मम्मी तू नॉनसेन्स बोललीस आत्ता; मला माहितीये, नॉनसेन्स हा चांगला शब्द नसतो. चल, चांगला शब्द दे . मी त्याच आवेशात त्याला तू गप रे, नंतर देईन म्हंटलं, तर हा तिथेच अडून बसतो. पहिले दे मग जातो.

कसलं भांडण आणि कसलं काय, सगळा फुसका बार होऊन जातो!!

त्याने उच्छाद मांडून माझ्या जीवाला सैरभैर केलं की त्याला ओरडताना चार पाच शब्द बाहेर पडतातच पडतात, कितीही कंट्रोल करा. मग तो रडत रडतच मम्मी, च्या मारी, गाढव, बेलायक, आणखी काय म्हणालीस हा बेअक्कल हे सगळे वाईट शब्द आहेत, पहिले चांगले शब्द दे, मग हवं तेवढं ओरड.
आता असं मधेच कुणी बोलल्यावर कुठल्या शहाण्याचा ओरडायचा टेम्पो तसाच राहील सांगा??
आम्हाला सर्वानाच फिदीफिदी हसायला येतं, एवढा कॉमेडी सीन असतो तो!!

कधी मात्र मधेच असा तो बोलला तर एखाद्या फ्रस्टेशनच्या क्षणी माझ्याकडून निघतंच, काय डोक्याला ताप झालाय यार.....गप पड, मी आता काही नाही देणार तुला एकही शब्द.......
त्यावर तो एवढसं तोंड करून बोलतो, कशाला शिकवलस मग असलं? तूच सांगितलं म्हणून करतो ना? आता का तूच वैतागतेस?
मग मलाच वाईट वाटतं, त्याला जवळ घेते आणि म्हणते, तू करेक्ट आहेस रे, पण मी सांगितलेलं मलाच झेपेना झालंय. तुझं चालू दे, मला माझंच बघायला पाहिजे, मी प्रयत्न करेन आवरायचा, नाही तर तुला देत जाईन हा चांगले शब्द, तू ते कायमचे लक्षात ठेवत जा मात्र!!

पण खरंच, एकही साधासुधा वाईट शब्द न बोलता कुणाला ओरडायचं, रागवायचं हे अगदी कसं अळणी जेवणासारखं वाटतं.
जीवाला थंडक ती काय मिळतच नाही, काय करणार पण?
पोरं आपल्याकडे बघून शिकतात आणि नको ते तर सर्वात आधी शिकतात म्हटल्यावर??

पोरांना नुसते उपदेशाचे डोस पाजून शिकवणं फार सोप्पं, पण आपल्या कृतीतून शिकवणं भयंकर अवघड हो !!

बरोबर ना.........?

फोटो साभार: गुगल

©️स्नेहल अखिला अन्वित

कथा आवडल्यास माझ्या 'हल्ला गुल्ला' या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा........


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel