कौटुंबिक
मराठी कथा
सणवार
श्यामलला या कोरोना प्रकरणाचा कितीही कंटाळा आला असला, त्याला इतके महिने कितीही शिव्या घातल्या असल्या तरी तिला आज दहीहंडीच्या दिवशी मात्र कधी नव्हे ते खूप हायसं वाटत होतं.
याचं कारण म्हणजे तिचा सोळा वर्षाचा मुलगा रोहन. अंगात सतत अचाट साहसाची खुमखुमी. त्यात त्याला हवेत उडायला लावणाऱ्या वयाची साथ!!
पण श्यामल कोणी समजून समजणारी नव्हती. तिने ते सगळं तिच्या डोळ्यांनी पाहिलेलं. आणि तिला वाटायचं माझ्या जागी कोणी असत तरी काही समजू शकलं नसतं.
त्यावेळी मोठ्या चाळीत राहायचं श्यामलच कुटुंब. आई, बाबा, ती आणि तिचा मोठा भाऊ. ती दहावीत, तर भाऊ कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला. त्याचं मोठ्ठ मित्रमंडळ. चाळीत तसही सगळ्याच सणांची बातच काही और असते!! मोठा उत्साह असतो सर्वांच्याच अंगात!! त्यांच्याही चाळीत तेच होतं, सगळे सण दणक्यात साजरे करायचे सर्वजण. पैसे कमी पण उत्साह मात्र वारेमाप!!
त्या दहीहंडीच्या दिवशीही अगदी सारं नेहमीसारखाच चाललेलं होतं.........
दिवसभर पोरांचा नुसता कल्ला चाललेला ग्राऊंड मध्ये.......
त्या दिवशी जो सकाळी गेला, ते जेवायलाही आला नाही. निरोप पाठवला तर त्याने दोन वडापाव खाऊन पोट भरलं सांगितलं.
पोरं थरावर थर चढवायला लागली, तशा बायका पाण्याच्या बादल्या ओतू लागल्या. पोरांत आणखी उत्साह आला. पहिला पाचाचा थर लावता लावताच सगळी पोर खाली पडली. मोठी माणसं पुढे आली, हंडी खाली करूया म्हणाली, पोरं ऐकायला तयारच नव्हती. श्यामलचा भाऊही कुणाला जुमानत नव्हता.
श्यामलची आई कधी नव्हे ते पाहायला आली होती,आणि काय बघितलं?
एवढं सगळं बघितलेल्या श्यामलला दहीहंडीच नावच काढायलाही नको वाटायचं.
अगं, आज लवकर जाग आली नंतर काही झोप लागलीच नाही.
पण इतके दिवस जरा ऐक ना रे गोपाळा करत मागे लागलेल्या यशोदेचं दुःख माझ्या कृष्णाला स्वतःहूनच कळालं, यातच मला सर्व मिळालं....…...!!
ऐक ना रे गोपाळा.........!!
बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०
श्यामलला या कोरोना प्रकरणाचा कितीही कंटाळा आला असला, त्याला इतके महिने कितीही शिव्या घातल्या असल्या तरी तिला आज दहीहंडीच्या दिवशी मात्र कधी नव्हे ते खूप हायसं वाटत होतं.
नाहीतर दहीहंडीचा दिवस म्हणजे तिच्यासाठी मनावर प्रचंड दडपण असणारा दिवस असायचा!!
याचं कारण म्हणजे तिचा सोळा वर्षाचा मुलगा रोहन. अंगात सतत अचाट साहसाची खुमखुमी. त्यात त्याला हवेत उडायला लावणाऱ्या वयाची साथ!!
आई काय म्हणते ते ऐकायला वेळच कुठे होता त्याच्याजवळ?
तरी तिने अगदी दहा वर्षाचा होईपर्यत त्याला या सगळ्यापासून थोपवून धरलेलं. पण रक्तातच ते असल्यावर किती थांबला जाणार होता तो?
लहान होता तेव्हा हातात होता, मिसरूड फुटायला लागलं तसा सुटायलाच लागला तो एकदम.
आईपेक्षा मित्र जवळचे वाटू लागले, त्याचं ऐकणं जास्त गरजेचं वाटू लागलं. आईने जिवाच्या आकांताने कितीही विरोध केला तरी त्याला न जुमानता गेली चार वर्षे तो दहीहंडीच्या थरावर थर लावण्यात आपलं योगदान देत होता.
काळजी तशी त्याच्या वडिलांनाही वाटायची, पण ऐकतच नाही म्हटल्यावर ते सोडून द्यायचे. एकदा काय वाईट घडलं की सारखं तसच थोडं घडणार आहे, ते तिलाच समजवायाचे.
पण श्यामल कोणी समजून समजणारी नव्हती. तिने ते सगळं तिच्या डोळ्यांनी पाहिलेलं. आणि तिला वाटायचं माझ्या जागी कोणी असत तरी काही समजू शकलं नसतं.
म्हणून तर अजूनही दहीहंडी जवळ आली की दरवर्षी तिचा जीव व्याकुळ होतोच. विसरावं म्हटलेलं ते सगळं पुन्हा डोळ्यासमोर येऊ लागतं..........
त्यावेळी मोठ्या चाळीत राहायचं श्यामलच कुटुंब. आई, बाबा, ती आणि तिचा मोठा भाऊ. ती दहावीत, तर भाऊ कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला. त्याचं मोठ्ठ मित्रमंडळ. चाळीत तसही सगळ्याच सणांची बातच काही और असते!! मोठा उत्साह असतो सर्वांच्याच अंगात!! त्यांच्याही चाळीत तेच होतं, सगळे सण दणक्यात साजरे करायचे सर्वजण. पैसे कमी पण उत्साह मात्र वारेमाप!!
दहीहंडीला तर काही विचारायचंच काम नव्हतं. मुलांचं टोळकं तर होतच मोठ्ठच्या मोठ्ठ. सगळ्या वयोगटातली मुलं होती त्यात उत्साहाने सामील झालेली.
दिड दोन महिने अगोदर पासूनच प्रॅक्टिस सुरू व्हायची त्यांची.
मोठे गडी तर सारे मुरलेले होते त्यात. त्यांच्याहाताखाली लहानसहान पोरं तयार व्हायची.
तिचा भाऊही मुरलेल्या गड्यातच होता. अगदी पाचसहा वर्षाचा असल्यापासून जायचा तो.
घरच्यांनाही त्याच्यावर विश्वास बसला होता त्यामुळे ते काही अडवायचे नाहीत त्याला.
त्या दहीहंडीच्या दिवशीही अगदी सारं नेहमीसारखाच चाललेलं होतं.........
त्यांच्या चाळीसमोर मोठ्ठ ग्राऊंड होतं. त्यांच्या संपूर्ण एरियाची दहीहंडी तिथेच असायची.
सकाळी लवकरच भावाचं टोळकं त्याला नेहमीप्रमाणे बोलवायला आलं. मित्रांनी हाक दिली तसा तो नाष्टा अर्धवट टाकून तसाच उठत होता, पण आई मित्रांच्या नावाने मोठ्याने ओरडायला लागली म्हटल्यावर त्याने पुढ्यातलं कसंबसं संपवलं आणि तसाच पळत सुटला.
तरी श्यामलने आईला विचारलं, हे हंडी तर फोडतात संध्याकाळी नाहीतर रात्रीच, ह्याला आतापासूनच काय ग घाई एवढी?
काय बोलणार या पोरांना, म्हणत आईने सोडून दिलं.
दिवसभर पोरांचा नुसता कल्ला चाललेला ग्राऊंड मध्ये.......
बारा वाजल्यापासून बाहेरचं एकेक मंडळ यायला सुरुवात झाली होती.
हंडी मुद्दामच जास्त वरती लावली होती, दुसऱ्या कोणाला फोडायला द्यायची नव्हतीच ती. तो हक्क फक्त चाळीतल्या पोरांचा होता.
जीवावर उदार होऊन तरणी पोरं थरावर थर लावत होती, बघणाऱ्याला वाटायचं, एखादा पडला तर काय होईल, विचारानेच अंगावर काटा यायचा.
श्यामलची आई तर कधी बघायचीच नाही, तिला नकोच वाटायचा तो थरार. तिला तर तिच्या मुलालाही पाठवायचं नसायचं. पण पोराला वडिलांची फूस होती. त्यांनी लहानपणापासूनच त्याच्यात पाडला होता त्याला. ती काय अडवणार होती?
त्या दिवशी जो सकाळी गेला, ते जेवायलाही आला नाही. निरोप पाठवला तर त्याने दोन वडापाव खाऊन पोट भरलं सांगितलं.
बघता बघता संध्याकाळचे सहा वाजले, अजूनही मंडळं येत होती. शेवटी चाळीतली सगळी लोकं कंटाळली, आणि पोरांना आता बास झालं. तुम्ही सुरू करा म्हणून सांगितलं. तो उंच थर खाली करून दिलाच नाही पोरांनी. आम्ही तसाच फोडणार म्हणून हट्ट धरला. आठ मजली थर, पोरांच्या अंगात अफाट उत्साह संचारला होता. गाणी दणादण वाजत होती. श्यामल तिच्या मैत्रिणीबरोबर कॉमन गॅलरीतून बघत होती. तिचे वडील खालीच होते पोरांबरोबर.
पोरं थरावर थर चढवायला लागली, तशा बायका पाण्याच्या बादल्या ओतू लागल्या. पोरांत आणखी उत्साह आला. पहिला पाचाचा थर लावता लावताच सगळी पोर खाली पडली. मोठी माणसं पुढे आली, हंडी खाली करूया म्हणाली, पोरं ऐकायला तयारच नव्हती. श्यामलचा भाऊही कुणाला जुमानत नव्हता.
सर्वाना साहस दाखवायचंच होत. त्यांचा इज्जतीचा प्रश्न करून टाकला होता त्यांनी. जोश नुसता रोमारोमात सळसळत होता.
श्यामलने आईला बोलावून आणलं. दादा बघ कुठे चढणार आहे. आई ओरडत होती, पण तिचा आवाज त्याच्यापर्यंत पोचतच नव्हता.
तरी दोनदा सहा थरापर्यत पोचून सर्व खाली आले. पण नाही, त्यांना आठ थर लावायचेच होते.
त्यांनी पुन्हा जोमाने प्रयत्न सुरू केला.
आणि थर लावलाही, दुसरा, तिसरा, चौथा.....
आई आणि श्यामलने एकमेकींचा हात घट्ट धरून ठेवला होता.
हा पाचवा, हा सहावा.......
टाळ्या, शिट्या, आरडा ओरडा, जोरात सुरू होतं. पाण्याचे फवारे मारले जात होते.......
आणि हा सातवा थर लागला..........आता शेवटचा......
श्यामलचा भाऊ वरच्या थराला होता. शामलने डोळ्यावर हात ठेवले, आईचे ठोके वाढू लागले.
आठवा थरही लागला आणि पापणी लवते ना लवते तोच सगळे दणादण सगळे खाली पडले. जोरात आवाज झाला. वरचे दोन तर वरून तसेच्या तसेच खाली आपटले. आधाराला काही मिळालंच नाही त्यांना. बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. सगळा जोश हरवला. वरून खाली पडलेल्यात एक श्यामलचा भाऊ होता. तो डायरेक्ट डोक्यावरच पडला होता. जो कोमात गेला तो उठलाच नाही कधी.
बरोबरचा दुसरा कायमचा अपंग झाला. बाकी बऱ्याचजणांनाही खूप लागलं होतं.
श्यामलची आई कधी नव्हे ते पाहायला आली होती,आणि काय बघितलं?
तिच्या डोक्यावर परिणाम झाला, दोन वर्षात तीही गेली.
वडील होते तोवर स्वतःला कोसूनच अर्थहीन जगत होते.
पुन्हा चाळीत कधी दहीहंडी लागलीच नाही. धसकाच घेतला दहीहंडीचा, चाळीनेच नाही तर त्यांच्या संपूर्ण एरियानेच!!
एवढं सगळं बघितलेल्या श्यामलला दहीहंडीच नावच काढायलाही नको वाटायचं.
आता तिचा मुलगाही त्याच वळणावर जाऊ पाहत होता, नव्हे गेलाच होता.
मात्र यावर्षी कोरोनामुळे ती त्याला तिच्यासमोर कधी नव्हे ते दहीहंडीच्या दिवशी लोळताना बघत होती. कधी नव्हे ते तिचं मन शांत होतं.
घरी आहे तर काहीतरी खास करावं त्याच्यासाठी म्हणून भावाच्या आठवणीने डोळ्यात आलेलं पाणी पुसत ती स्वैपाकघरात गेली. तर रोहनही तिच्या मागे आला, आणि तिच्या गळ्यात हात टाकून म्हणाला, आई सॉरी.....
श्यामल त्याच्याकडे बघून खोटं हसत म्हणाली, सॉरी कशाबद्दल?
अगं, आज लवकर जाग आली नंतर काही झोप लागलीच नाही.
मग माझी दरवर्षीची दहीहंडीची धावपळ आठवली. मी माझ्या जोशात दिसलो. आणि त्याचवेळी मी उडवून लावायचो, दुर्लक्ष करायचो, तो तुझा चेहरा समोर आला.
जो मी अगोदर बघितलाच नव्हता. तुझ्या विनवण्या, तुझी आर्तता जी मी दरवेळी धुडकावून लावायचो, ते सगळं समोर आलं. आणि त्यामागोमाग मनात आलं, माझी आई कुठे चुकली? तिचं आईचं मन आहे. आणि तिने जे भोगलय त्यावरून तिचं वागणं बरोबरच आहे. का आपल्यावर जीव लावणाऱ्या माणसाला आपण त्रास द्यायचा??
एवढं निष्ठुर का व्हावं मी, नको त्या गोष्टींपायी.
आई, मी आता ठरवलंय. मी कधीच नाही जाणार थर रचायला. घरच्यांच्या जीवाला घोर लावून स्वार्थी आनंद लुटण्यात काय मजा?
त्या कोरोनाने बघ मलाही शिकवलं शहाण्यासारखा विचार करायला.........
श्यामलला जीवावरचं मोठ्ठ ओझं उतरल्यासारखं वाटलं, तिने प्रेमाने रोहनला जवळ घेतलं, आणि म्हणाली, तसा तर जीवनातला प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवत असतो बाळा, आपणच आपल्या सोयीची झापडं लावून घेतलेली असतात.
पण इतके दिवस जरा ऐक ना रे गोपाळा करत मागे लागलेल्या यशोदेचं दुःख माझ्या कृष्णाला स्वतःहूनच कळालं, यातच मला सर्व मिळालं....…...!!
आज इतक्या वर्षांंनी माझ्या मनातलं दहीहंडीवरचं भीतीचं काळं सावट दूर झाल्यासारखं वाटतय मला.........
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझ्या 'हल्ला गुल्ला' या फेसबुक पेजला नक्की लाईक करा.
Previous article
Next article