मी न माझी उरले काही........!!

का मला एकटं सोडत नाही तुम्ही? मी जाईन तिथे मागे मागे आलच पाहिजे का माझ्या? प्लिज मला थोडं मोकळं सोडा ना. जा निघाss इथून.........

अनघा आपल्या मागे मागे स्वैंपाकघरात येणाऱ्या दोन्ही पोरांवर जोरात खेकसली, तशी पोरं चेहरे पाडून बेडरूममध्ये निघून गेली. त्यांना कळेना आपल्या आईला नेमकं झालं तरी काय?

खेकसून झाल्यावर अनघालाही खूप वाईट वाटलं. एकदम रडायलाच आलं तिला. पण ते ही मोकळं रडता येईना. सारखं कोण ना कोण कुठेतरी असायचंच. पोरं आत होती तरी सासूबाई बाहेर पडल्या होत्या. तिला खरंतर त्या क्षणी खूपच रडावंस वाटत होतं. पण थोडासाही आवाज झाला असता, तर सासूबाई उठून, काय झालं? करत आल्या असत्या. तिला आता कोणी नको होतं. एकांत हवा होता फक्त. पण रडून मोकळंही व्हायचं होतं. मनात बरंच काही साठलं होतं. 

ती पटकन तशीच बाथरूममध्ये गेली, मोठा नळ सोडला. आणि हमसून हमसून रडू लागली. त्या क्षणी वैताग आला होता तिला सगळ्याचा. सगळं सोडून पळून जावसं वाटत होतं. 

आधी अनघा ऑफिसला जायची, पण नंतर मात्र कोरोनामुळे तिचा जॉब गेला. त्यावेळी तिला तसं एवढं दुःख झालं नाही. ठिक आहे इतकी वर्ष काम केलं, आता थोडे दिवस घरी काढू, त्यात काय एवढं, असं वाटलेलं तिला. 

पहिले दोन-तीन महिने तसे बरे गेले. नंतर मात्र जाणवायला लागलं, आपल्याला आपला वेळ मिळतच नाहीये. सतत कोणाची ना कोणाची भुणभुण मागे आहेच. घरी आहे तर प्रत्येकजण माझ्याकडून अपेक्षा करतय. ऑफिसला जाताना आणि येताना मिळून लागणारे दिड-दोन तास तरी माझे हक्काचे असायचे. वाटलं तर गाणी ऐकायचे, वाटलं तर जुन्या गोष्टी आठवत बसायचे, वाटलं तर वाटेल त्याला फोन करत बसायचे, वाटलं तर काही न करता नुसती स्वतःच्या तंद्रीत असायचे. कोणी नसायचं डिस्टर्ब करायला.
पण आता चोवीस तास घरी आहे तर मला माझ्यासाठी वेळच नाही. जरा हातात मोबाईल घेतला की पोरं खेचून घ्यायला येतात. मी घेतला की त्यांनाही लागतो. पप्पाने घेतला तर त्याच्याकडे मात्र नाही जात मागायला. दहा मिनिटं निवांत कोणाशी बोलुही देत नाहीत. गाणी ऐकणं तर दूरच राहीलं. टिव्ही तर माझ्यासाठी नाहीच, बघावं तेव्हा सासूबाईंचा कब्जा. 
कामं तर संपण्याची नावच घेत नाहीत. सासूबाई करतात मदत, नाही असं नाही पण भार माझ्यावरच.
ती करून जरा आतल्या खोलीत यावं, तर पोरं लगेच आमच्याशी खेळ ना म्हणून पाठीमागे लागतात. साधं पडायला ही देत नाहीत. प्रत्येकजण फ्री आहे, पाहिजे ते करतोय, मला मात्र सगळ्यांनी सगळ्यात अडकवून ठेवलंय.
 

सकाळी चहा, नाष्टा, जेवण, पुन्हा संध्याकाळी तेच चहा, नाष्टा, जेवण.........

थोडा एकांत मिळावा म्हणून गच्चीत जावं तर तिथेही बरोबर येण्यासाठी मुलं मागे आहेतच.......

अनघाला सगळं कळत होतं, मुलांना आई समोर दिसते, तर सारखं तिच्या भोवती राहावं वाटणं साहजिकच आहे. तिच्याकडून लाड करून घ्यावे वाटणं, सगळं बरोबर आहे. 
ऑफिसला जाते तेव्हा सांभाळते ना मी सारं, मग आता बघितलं तिने तर काय एवढं?, ह्या विचाराने सगळ्यातलं अंग काढून घेणं, हेही सासूबाईंचंही चूक नाही.

पण तरी...... अगदी सगळं समजत होतं तरी, तिला वाटायचं, माझी मला मी जराही मिळत नाही ह्याचा त्रास होतोय मला, त्याचं काय करू मी?

बंद बाथरूममध्ये सगळं आतल्या आत धूमसत होतं तिच्यातलं. ......
रडून रडून मनातले सगळे विचार बाहेर काढत असताना किती वेळ गेला ते अनघाला समजलच नाही.
बाथरूमचा दरवाजा ठोठावत मुलं ओरडायला लागली, तेव्हा तिला भान आलं.
छोटी पोरगी तर घाबरून रडायलाच लागली होती. अनघा तोंडावर पाणी मारून बाहेर आली. आता अगदी हलकं वाटत होतं तिला मनसोक्त रडल्यावर. 
तिने पटकन मुलीला उचलून घेतलं. घट्ट कुरवाळलं, तसा मुलगाही जवळ आला तिच्या, दोघांना मिठ्या मारताना पुन्हा अनघाला भरून आलं. माझी पोरं, कित्ती आवडतात मला, माझा जीव आहेत अगदी. थोडी मोठी झाली की कशाला येतील आपल्या पाठी? त्यावेळी मग आपल्यालाच वाटेल, त्यांना जवळ घ्यावं, प्रेम करावं. पण तेव्हा त्यांचं जग वेगळं असेल. आता येतात तर........

न राहवून ती त्यांना म्हणाली, सॉरी रे माझ्या बछड्यांनो, ओरडले ना तुम्हाला मी. 
पण काय करू होते चिडचिड उगाच कधीतरी. 

मोठा सहा वर्षाचा मुलगा म्हणाला, तुला नाही आम्ही खेळायला बोलवणार सारखं, तू अशी रागवू नको पण पुन्हा. आणि बाथरूमधे जाऊन तर मुळीच बसू नको.

अनघा म्हणाली, बोलवा रे मला खेळायला. नाही बोलवलत तरी मला राहवणार नाही. होतं असं. तुमच्या कसं अंगात येतं, उगाच वेड्यासारखं वागता ना कधी कधी, तसंच माझंही झालं.
 

तेवढ्यात सासूबाईही आल्या, आणि म्हणाल्या, चहा केलाय, नाष्टयाला चिवडा करतेय, म्हणजे काही दिवस तेवढाच आराम मिळेल तुला. तो संपला की पुरवठ्याचं दुसरही काहीतरी करून ठेवीन. मधे मधे बघत जाईन पोरांना, खेळेनही त्यांच्याशी. पण तू परत खरंच त्या बाथरूममध्ये जाऊ नको ग बाई. जागीच होते मी. म्हटलं येशील, पाच-दहा मिनिटात, असेल काही काम. पण पंधरा मिनिटं झाली तरी तू येईना म्हटल्यावर, जीव घाबरला माझाही. म्हणून पोरांना पाठवलं, दार ठोठवायला. 
असं नको करू बाई, काय चुकलं तर सांगत जा सरळ. चालेल मला. घरीच होतीस म्हणून थोडी मोकळी झालेले मीही. चुकलं माझं, जास्तच भार आला तुझ्यावर........
तू माहेरी जाऊन येतेस का नाहीतर, रहा चांगली पंधरा दिवस, आता जातायत गावाला लोक.

छान वाटतय आई मला. कधीतरी दाटून येतं ना काही, तसंच झालेलं थोडफार. काळजी नका करू, असं म्हणत, चहा घेण्यासाठी ती उठली.

चहा पिता पिता तिच्या मनात आलं, धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय......अशी गत आहे आपली. ही सगळी माणसं अशी आहेत की त्यांना सोडूनही मी राहू शकत नाही, आणि त्यांना धरून राहीलं की माझी 'मी' मलाच मिळत नाही.

असो, पण या माझ्या माणसांकरता माझ्यातल्या 'मी'  ला जरा बाजूला ठेवावं, हेच बरं आहे सध्यासाठी .......


©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel