प्रेरणादायी
मराठी कथा
असंच नाही मिळत काही........!!
गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०
साहिल दिसायला एकदम राजबिंडा होता. आणि त्याचा मोठा भाऊ उदय त्याच्या एकदम विरुद्ध. बारीक अंगकाठीचा, तेल लावून केस चोपून बसवणारा. एकदम सरळमार्गी. त्याच्या एकंदरीत सगळ्याच देहबोलीवरून कोणाच्या नजरेत तो फारसा यायचा नाहीच कधी.
सगळे कौतुक करायचे ते साहिलंच!! तो पाहताक्षणीच कोणालाही आवडायचा. बाकी सगळं नंतर, आधी त्याच्या दिसण्याचा प्रभावच समोरच्याला आकर्षून घ्यायचा. सगळे त्याच्या आईवडिलांना म्हणायचे, हा तुमचा पोरगा हिरो होईल हिरो.
मोठं होता होता, हिच हिरोगिरी साहिलच्या डोक्यात जायला लागली. आणि तो त्याच अविर्भावात वागायला लागला. शिक्षणही मधेच सोडून दिलं त्याने. तसाही कधी इंटरेस्ट घेतला नव्हताच त्याने त्याच्यात. साहिलच्या डोक्यात मॉडेलिंग करायचं भरलं. बघणारी लोकं चढवत होती, तो चढत होता. मित्रही बोलायचे तुला काय कोणपण हिरो म्हणून घेईल!!
काही कमवत नव्हता, तरी कपडे, बूट, सेंट सर्व काही शानदार लागायचं त्याला. मला असंच राह्यला हवं, तरच लोकं समोरून विचारतील, ऑफर देतील, असं सांगून तो घरच्यांना पटवायचा. वडील विचार करायचे, प्रयत्न करतोय तर करु दे. नाहीतरी शिक्षणात गती नाहीच आहे.
पण बहुदा असं असतं; चांगलं, छान म्हणणारे भरपूर असतात, पण मदतीला एक हात मिळताना मुष्किल होतो. तसच झालं, ज्या साऱ्यांनी साहिलला हिरो बनायचं असेल तेव्हा भेटायला ये, तुला इकडं घेऊन जातो, तिकडं घेऊन जातो म्हटलं होतं, त्यांनी नंतर त्याला हजार कारणं दिली. जे घेऊन गेले, तिथे याचा टिकाव लागला नाही. त्यांना चेहऱ्याबरोबर टॅलेंटही हवं होतं. तशा मॉडेलिंगच्या दोन-तीन ऑफर मिळाल्या, पण त्यातून पुढे काही विशेष लाभ झाला नाही. कामातून काम मिळालं नाही. आणि प्रत्येकालाच ते मिळत असंही नाही. मिळणारे एकदोन आपल्या नजरेसमोर चमचमत येतात, आणि न मिळणारे हजार अंधारात हरवून जातात.
दोन तीन वर्षे इकडे तिकडे प्रयत्न करून, नंतर त्याला कंटाळा यायला लागला. आता घरचे पण मागे लागले, शिक्षण पूर्ण कर, नाहीतर कुठेतरी नोकरी बघ. पण कंटाळा आला तरी डोक्यातून खुळ जात नव्हतंच. नोकरी नाही पण छोकरी बघितली साहिलने. तशा त्याच्यावर भाळणाऱ्या भरपूर होत्या. अन् हा जिच्यावर भाळला तीही लाखात एक होती. अगदी सुंदर जोडा दिसायचा. सगळं होतं, पण कामधंदा नव्हता. म्हणून अडून बसलेलं. साहिलला काही झालं तरी नोकरी करायचीच नव्हती. तो नशीब उघडण्याची वाट बघत होता. प्रयत्न सोडून देऊन. त्याला वाटायचं कोणीतरी आपलं घर शोधत येईल, आणि आपलं स्वप्न पूर्ण होईल.
वय निघून जात होतं, छोकरीही वाट पाहून निघून गेली. तिशी उलटली तरी कोणी दार ठोठावत आलच नाही. आणि हा राजबिंडा लोकांच्या नजरेत रिकामटेकडा बनला. रात्री उशिरापर्यंत मित्रांबरोबर फिरत, टाईमपास करत बसायचं, आणि सकाळी आरामात उठायचं. पुन्हा दिवसभर टाईमपास सुरू.
घरचे बोलून बोलून थकले, तरी याच्यात सुधारणा झाली नाहीच. आईच्या जीवाला तर घोरच लागला, कसं होणार पोराचं? ज्या पोराचं राजबिंडं रूप पाहून हा नक्कीच मोठा कोणीतरी होईल, अशी भाकीतं केली जायची, तो लोळून दिवस काढत होता. कामधंदा नसलेला, बेकार संबोधला जाऊ लागला.
आणि ज्याच्याकडे कोणी ढुंकूनही बघायचं नाही. त्या उदयने स्वतःही आपल्या दिसण्याकडे दुर्लक्ष करून, पहिल्यापासून आपलं सगळं लक्ष अभ्यासाकडे केंद्रित केलं. बघता बघता नामांकित डॉक्टर झाला. त्याच्यासारखीच उच्चशिक्षित बायको मिळाली त्याला. कुणाच्या खिजगणतीतही नसलेला तो डॉक्टर साहेब म्हणून सगळ्यांच्या नजरेत वर आला. कुणी याच्याबद्दल काहीही भाकीत केलं नसताना सुद्धा!! कष्ट करून त्याने आपलं लक्ष्य साध्य केलं. स्वतःच नशीब स्वतः लिहिलं.
आता दोघांकडे बघितलं तर उदय जास्त स्मार्ट दिसतो. शानदार कपडे, बूट, सेंट, आता तोही वापरतो. शिवाय आलिशान घर, गाडी सर्वकाही आहे त्याच्याकडे.
साहिलकडे मात्र यातलं काहीच नाही, रूप होतं, त्याचीही आता पार रया गेली. डोक्यात हिरोगिरी होती म्हणून कुठलीही नोकरी करून वर यायची तयारी कधी झालीच नाही मनाची. धड नोकरी नाही त्याला मुलगी तरी कोण देणार, त्यामुळे पन्नाशीला पोचला, तरी साहिल एकटाच राहिला. आईवडील त्याच्याच काळजीने तसे लवकरच गेले.
उदयने लाख समजावून साहिल त्याच्याकडे राहायला गेला नाही. जुन्या घरात असतो अजूनही लोळत पडलेला. उदय पुरवतो स्वतःहूनच सगळं, हिरो काही मागत नाही. कमीपणा वाटतो त्याला.
देवाने साहिलला सुंदर रूप देऊन पाठवलं, ज्याने त्याला अनेक स्वप्न दाखवली. पण उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करायला, त्याचा सतत आणि सतत पाठपुरावा करावा लागतो, अथक परिश्रम करावे लागतात, मधेच हार मानून चालत नाही, हे कळण्यापुरता तरी बुद्धीचा वापर साहिलने केला असता, तर त्याला आज आपण हिरो म्हणून ओळखतही असतो कदाचित..........!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज हल्ला गुल्ला नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article