मराठी कथा
विनोदी
नावाची लागली वाट........!!
शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०
काल एक पार्सल आलं, ते देणाऱ्याने त्यावरचं नाव वाचलं, दरवाजा मी उघडला म्हणून आपल्या वाचण्यात चूक झाली, असं समजून त्याने विचारलं 'सुनीता' ना?
मी म्हटलं, नाही जरा नाव पुन्हा वाचा बरं!!
मग त्याने पुन्हा वाचलं, आणि म्हणाला, 'सुमित' का?
मी म्हटलं, अजूनही नाहीच. आणखी जरा नीssट वाचा बघू. मग त्याने नीsssट वाचलं, सुsनीsत.
मी म्हटलं, आत्ता कसं? एवढी कसली ती घाई लोकांच्या नावांची चिरफाड करायची?
त्याला पटलं, मला दोनदा हसत हसत तो 'सॉरी' बोलला, आणि मग मी ही हसत हसतच सांगितलं, माझ्या नवऱ्याचं नाव आहे ते, ज्याला तुम्ही काहीही विचार न करता बाई करून टाकलत. नावं नीट वाचावीत हो.
भला माणूस मला आणखी एकदा 'सॉरी' म्हणून त्याच्या वाटेने निघून गेला.
पण त्याच्यामुळे माझ्या आख्ख्या जिंदगानीतल्या सगळ्या नावांची चिरफाड मला राहून राहून आठवायला लागली.
बघा ना, इथे कालच्या गोष्टी काही आठवत नाहीत, पण जुन्या पुराण्या अगदी तशाच्या तशा आठवत असतात. मागच्या जन्मीचं आठवण्याचं काही प्रयोजन असतं ना, तर तेही आठवलं असतं एकवेळ, पण ताजं ताजं काही आठवत नाही हे मात्र खरं!!
तर मी सहावीत होते, तेव्हा आमच्या बाजूला पाच वर्षांचा मुलगा होता, त्याला माझं नाव उच्चारणं महाकठीण वाटायचं. 'सिनेहल, सिनेहल' करत हाका मारत बसायचा तो मला.......मी त्या बाबड्याला कित्येकवेळा माझं नाव नीट उच्चारायला शिकवलं, पण त्याची जीभ काही सैलावली नाहीच. मग त्याच्यामुळे माझं नाव 'सिनेहलच' पडलं.
दुसराही एक असाच आयटम होता, जो 'सिंव्हल सिंव्हल' करत माझ्या नावाने बोंबट्या मारायचा. पण त्यावेळी मांजरालाही पाहून घाबरणारी मी स्वतःला सिंहाच्या बिरादरीतली समजायला लागले होते खरी!!
अशाच एक आजी बाजूला राहायच्या, त्या कोण जाणे मला 'स्ने, स्ने' असंच बोलवायच्या सारख्या. मला वाटायचं, एवढ्या 'स्ने' म्हणतात, तर त्याला 'हल' जोडायला का एवढे कष्ट पडावे या आजीबाईना? पण मोठ्या माणसांना वर तोंड करून काहीही बोलायची, त्यावेळी अंगात हिम्मत नव्हती, म्हणून गुमान 'ओss' दयायचे त्यांना.
तसा त्यावेळी राग कोणाचाच यायचा नाही.
आता येतो. जेव्हा माणसं घाईघाईत आपलं नाव कसंही आणि काहीही वाचतात ना, तेव्हा खरंच तो खूप येतो.
राग याचा येतो की वाचता येत असून किंचितसेही कष्ट घेतले जात नाहीत, वाचलेलं नाव नीट उच्चारायचे.
स्वतःपेक्षा जास्त आपल्या भवितव्याचा विचार करून ह्याच्यात-त्याच्यात पैसा टाकायला सुचवणारे, आपल्याला हवं तेवढं कर्ज तडकाफडकी मंजूर करायला आसुलेले, डोक्यावरच्या उधाऱ्या वाढवण्यासाठी हवी तेवढी क्रेडिट कार्ड पुरवणारे; बाकी सगळं करु शकतात, पण आपलं साधं सोप्पं नाव चुकूनही धड उच्चारू शकत नाहीत, हे खरंय.
साध्या साध्या नावांचाही ते अस्सा काही बॅंडबाजा वाजवतात, मग वाकड्या तिकड्या नावांची काय बरे दैना करत असावेत??
एकाला तर मी म्हटलंही होतं, तुमची स्किम जाम भारी आहे, घेतलीच असती मी. पण तुम्ही माझ्या नावाची वाट लावलीत, त्यामुळे सध्या तरी माझा मूड गेलाय.
खरं वाटून अगदी हिरमुसून गेला होता बिचारा........
माझ्या मुलीच्या शाळेत तर आयकार्डवर जवळपास प्रत्येक वर्षी चुकीचं नाव छापतात, आणि सांगितलं तर म्हणतात, होते चूक माणसांकडून घाईघाईत. एकदा होते हो, सारखी कसली मेली ती एवढी घाई??, असं फाsर वाटतं बोलावं त्यांना, पण दया दाखवून सोडून देते मी.
माणसं सतत एवढ्या घाईत असतातच का हेच मला कळत नाही!! काय सुटत असतं, कोण पळत असतं, देव जाणे??
माझ्या पोरांनी तर लहानपणी स्वतःच त्यांच्या नावांची वाट लावलेली.
मुलगी ज्याला त्याला आपलं नाव 'अखिलाला' असच सांगायची आणि मुलगा 'अsन्निsक' असं प्रत्येक अक्षरावर जोर देऊन ठासून सांगायचा. लोकांना वाटायचं, ही कुठली नावं? आम्ही ती दुरुस्त करून सांगायला गेलो की त्यावेळी ते दोघेही चिमुरडे आरडाओरडा करून आम्हालाच खोटं ठरवायचे.
नवऱ्याचं नाव तर आजपर्यंत एकानेही एकदाही व्यवस्थित घेतलेलं त्यालाही, मलाही आणि आमच्या समस्त परिवारात कोणालाही आठवत नाही. आपण कितीही सुस्पष्ट आवाजात 'सुनीत' असं सांगितलं तरी समोरचा ऐकतो 'सुमित' असंच!!
मग माझा नवराही त्यांच्याकडून चार वेळा स्वतःचं नाव नीट बोलवून घेतल्याशिवाय त्यांचा पिच्छा सोडत नाही.
काहीतरी विचार करून आईवडील एखादं छानसं नाव ठेवतात, आणि बाकीची लोकं त्यांच्या मनाप्रमाणे त्याची वाट लावतात, हे बरं का सांगा?
हा आता काही नावं असतात क्लिष्ट त्यांना अपवाद म्हणून सोडू शकतो आपण, जसं की मी ऐकलेली हस्नैन, दक्षेश, शर्याली, विश्रुती ही पटकन तोंडावर रुळणारी नाहीत. अशांचं त्यातल्या त्यात ठिक. पण साध्या सोप्प्या नावांच्या मनुष्यप्राण्याचं नाव जसच्या तसं घ्यायला का कष्ट पडावेत कोणाला?
असो.......
हे तर नावाचं झालं, आडनावांच्या विल्हेवाटीबद्दल लिहायला गेले तर अजून दोन पानं नक्कीच भरतील. तूर्तास ते राहूच द्या.
तुमचंही काही सांगा, तुमच्या नावाची वाट लावणारे घावलेत का कोणी तुम्हाला? गंमतीशीर आठवणी वाचायला आवडतील की सर्वांनाचं.........
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article