हक्काचं सोडावं लागलं........!!

तू म्हणतेस ते सगळं खरं, पण मला नाही मागता येत कुणाकडे काही, काय करू मी सुविधा?

कुणाकडे कुठं, भावाकडे तर मागायचं आहे ना, उमेश? आणि गरज आहे म्हणून मागतोय ना? तुमच्या हक्काचं मागतोय ना? आतापर्यंत काही मागितलं का? तुम्ही काही मागितलं नाहीत आणि स्वतःहून काही कोणी दिलं नाही.

आपल्याला कुठे काय कमी पडलं सुविधा?

पण आता पडतंय ना? किती दिवस राहायचं आपण भाड्याच्या घरात? बारा वर्ष काढली. 
आता जुळवाजुळव झालीये. तुम्हाला कर्ज मिळतय, मी माझे दागिने द्यायला तयार आहे, दहा लाखाचा प्रॉब्लेम होतोय, तेवढे मागा म्हणतीये तुम्हाला, तर तेही तुम्हाला योग्य वाटत नाहीये. मग कसं करायचं?
तुमच्या हक्काचं आहे, आपण सोडून दिलेलं तसं, पण आता घराला कमी पडतय म्हणून मागे लागलीये ना मी तुमच्या?
आपल्या पोरांच्या डोक्यावर पण घर होईल ना?

मी आजपर्यंत कधीच कुणाकडे हात पसरला नाही ग.......

हो, मग हा तुमचा स्वभाव माहीत असूनही, तुमच्या आईवडिलांनी सर्व काही का लिहून ठेवलं नाही? मृत्यूपत्र का बनवून ठेवलं नाही? ते बनवलं तर आज आपण घेऊ पाहतोय, त्याच्या दुप्पट मोठं घर आपल्याकडे असतं. 

त्यांना नाही कळलं ग सुविधा, त्यांना वाटलं असेल, घेतील दोन्ही भाऊ समजून. त्यांना योग्य ही वाटलं नसेल जाण्याअगोदर अशी वाटणी बिटणी करुन जाणं. प्रत्येकजणाच्या डोक्यात ते येत नाही.

पण मुलांना द्यायची इच्छा असेल तर यायला हवं ना? एक असेल तर ठीक आहे, पण दोन असेल तर दोघांचा विचार केला पाहिजे ना? 
आता आपलं काय झालं बघताय ना? एक आईवडीलांजवळ राहत होता, म्हणून सगळं घेऊन बसला. घरही आणि दागिनेही. आता नावही काढत नाही कशाचं. तुम्ही तर अगदीच मुखदुर्बळ!!
लोकं केवढी भांडतात हो आपल्या हक्कासाठी!!
खरं तर भाऊजींनी स्वतःहून दिलं पाहिजे होतं, तुमच्या वाट्याचं. आपण जवळ राहत नव्हतो, म्हणून काय झालं, प्रत्येक वेळेला होतोच की त्यांच्याबरोबर.

ज्याची त्याची इच्छा. बघू आपण, होईल काहीतरी.

अहो, काही होणार नाही. पैसे काय ढगातून आपोआप पडतात का? नड आहे म्हणून बोलतेय ना मी तुम्हाला? घर होईल आपलं, थोडं तोंड उघडा तुम्ही.
खरं तर जास्त उघडलत तर कर्जबाजारी व्हायचीही गरज नाही आपल्याला. तुमच्या वडिलांनी घेतलेल्या घरात तुमचा भाऊ राहतोय. शहराच्या मध्यभागात आहे अगदी. नाही म्हणायला, आज दिड दोन कोटी भाव हे त्याचा. दागिन्यांचा हिशोब तर मी काढतच नाहीये. सोडलं मी पाणी त्यावर.
पण घर हवं वाटतं हो मला स्वतःचं. दहा लाख काही मोठे नाहीत, कोटीच्या पुढे. तेवढे मागितले तर काय होतं, भाऊ कमावतो ही भरपूर तुमचा, त्याला मोठी नाही रक्कम. कितीही नाही म्हटलं तरी जीव जळतो हो माझा. दोन्ही एकाच आईबापाची लेकरं, त्यांनी मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र बनवलं असतं तर आज कुणापुढे हात पसरायची वेळ आली नसती आपल्यावर.

तुझं सगळं बुद्धीला पटतंय, पण मनाला मागणं पटत नाहीये. स्वभावच नाही माझा तो. मी लहानपणीही कुठे गेलो तर कुणी देईल तेवढं मुकाट्याने खायचो, पण स्वतःहून काही मागायचो नाही. सुविधा, खूप भिडस्त स्वभाव आहे ग माझा अगदी पहिल्यापासून.

तो काय मला माहित नाही? पण आता सोडा ती भीड, आणि मागा आमच्यासाठी. 

तो नाही म्हटला तर? मी कोर्टकचेऱ्या करणार नाही. 

नाही म्हटला, तर सोडून देऊ सगळं. पण एकदा तरी बोला. आपल्या घरासाठी बोला........

सुविधा एवढी जोर देऊन मागे लागली म्हणून उमेश स्वभावाविरुद्ध जाऊन आपल्या भावाकडे पैशाची मागणी करायला गेला खरा. पण त्याच्या भावाने अनेकानेक कारण देऊन त्याची मागणी धुडकावून लावली. त्याने त्याच्या पन्नास गरजा त्याच्यापुढे मांडल्या. न देण्यासाठी हजार खुसपटं शोधून काढली. 
अगोदरच भिडस्त स्वभावाचा उमेश त्याच्यापुढे गपगार पडला.  
घरी आल्यावर सुविधाने त्याचं तोंड बघूनच काय ते ओळखलं. तसही तिला हे असंच होणार हे महितच होतं. कारण त्याला जर मनापासून द्यायचं असतं, तर अशी मागायची वेळ आलीच नसती. पण मनाला वाटायला नको विचारलं नाही, म्हणून तिने प्रयत्न करून बघितला. 

भावाने उमेशच्या हक्काचे पैसे दिले नाहीत, तरी त्यांना घ्यायचं होतं ते घर त्यांना मिळालंच. सुविधाच्या बहिणीने, उमेशच्या काकांनी, काही मित्रांनी त्यांचं घर व्हावं, म्हणून स्वतःहून पुढे येऊन मदत केली. वरून तुम्हाला जमेल तसं द्या हे ही सांगितलं. 

उमेशच्या काकांना पण वाईट वाटलं, तसे भाऊ वहिनी कितीदा तरी बोललेले त्यांना, आमच्या माघारी सगळं आमच्या दोन्ही मुलांचं. पण नुसतं बोलून काय उपयोग? 
लिहून काहीच ठेवलं नाही, एकाच मुलानं सगळं हडपलं. 

पण उमेशचं नवीन घर त्याला लाभदायी ठरलं. अगदी दोन महिन्यातच त्याचा हुद्दा वाढला. कुठल्या ना कुठल्या प्रकारे लक्ष्मी घरात येतच राहिली.

आणि भावाने जी जी कारणं दिली होती, उमेशला पैसे न देण्यासाठी ती ती कारण खरी होऊन त्याच्यासमोर उभी राहू लागली. कारण खुद्द उमेश जरी काही बोलला नाही त्याला, तरी ज्यांना कळलं ते सगळे एवढंच म्हणत होते, भावाने लुबाडलेलं, त्याला काही पचणार नाही. हळूहळू तसंच घडत गेलं. त्याचा धंदा बुडाला, त्याचं शरीर रोगांचं घर झालं, त्याचं मन:स्वास्थ हरवून गेलं, जी संपत्ती लुबाडली, तिचा आनंद त्याला लाभलाच नाही........

हपापाचा माल गपापा, अगदी तसच झालं!!

खरंच आईवडिलांची इच्छा असेल आपल्यानंतर आपल्या मुलांना सर्व मिळावं, किंवा जिथे दान व्हायला पाहिजे तिथे जावं, तर तसं पत्र बनवणं फार गरजेचं आहे. कधी कधी तर एक मूल असेल त्यालाही ते मिळायला कठीण जातं, कारण दुसरंच कोणी त्याच्यावर डल्ला मारायला येतं.
खूप कमी जणं असं आवर्जून करून ठेवतात.
आमच्या परिचितांमध्येच यावरून घडलेला किस्सा आहे........मुलाच्या हक्काचं असून आई वडिलांनी काही लिहून ठेवले नाही म्हणून कोणी तिसरच त्यावर अधिकार दाखवून लंपास करायला पुढे आलं. प्रत्येकालाच भांडता येत नाही. खूप मनस्ताप झाला, पण अखेरीस ज्याचं होतं त्याला ते मिळालं.
सत्याचा विजय झाला.......


©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel