एक झोका......!!

कांचन- सोनाली, सोनाली- कांचन.....
कित्ती वेड्या होतो ग आपण!! कित्ती प्रेमात होतो नाही त्यावेळी एकमेकींच्या!! तिकडे वर्गात शिकवणं चालू असायचं आणि आपण......आपण मात्र वहीच्या शेवटच्या पानावर एकमेकींची नाव गिरवत बसायचो. अगदी प्रियकर- प्रेयसी सारख्या हातात हात घालून काय बसायचो, ऑफ पिरियडला एकमेकींच्या खांद्यावर हात ठेवून काय फिरायचो........
कित्ती मज्जा करायचो नाही आपण!!

तशा पहिलीपासून बरोबर होतो, पण मैत्रीचा खरा धागा जुळला तो आठवीत. लहानपण आणि मोठेपण यांच्या मधला जो टप्पा असतो त्याच्यात!!
कोणीतरी आपलं जवळचं, खूप जवळचं असावं असं वाटू लागलं, अन् माझ्या सुदैवाने एखाद्या मुलापेक्षा मी तुझा हात पकडला. आणि तूही तो तेवढाच घट्ट धरून ठेवलास. आपल्याला गरजच नाही लागली मग दुसऱ्या कुणाची. तू आणि मी जिवाभावाच्या मैत्रिणी बनून गेलो. 

मला नाही आवडायचं शाळेत यायला, दांडी मारून घरी बसायलाच जास्त आवडायचं. आणि तू माझ्या विरुद्ध, तुला खूप आवडायची शाळा. मला शाळा आवडायला लागली ती तुझ्यामुळे, तू तिथे होतीस म्हणून!!
मनातलं सगळच्या सगळं तुला सांगता यायचं म्हणून......
भांडणं तर मला आठवतच नाहीत आपली, पण हा मला राग मात्र बरेचदा यायचा आणि तू, तू इतकी छान मनवायचीस ना मला, की तुझ्याकडून मनवुन घेण्यासाठी मला फार आवडायचं रुसून बसायला.
किती भाव खायला मिळायचा मला!!
तुला माहितीये माझा नवराही मला म्हणतो, त्या तुझ्या सोनालीने तुला फार वाईट सवय लावलीये, मस्का मारून घ्यायची. मला भोगावं लागतंय, सारखा आपला मस्का मारत बसा बायकोला.

पण तरीही सांगते, तुझ्यासारखं मनवणारं अजून कोणी भेटलच नाही मला. तुझी जागा कोणी घेऊच शकणार नाही खरंतर.......

तुला आठवतं सोनाली, आठवीत मैत्री फुलली आपली, आणि जरा कुठे जोम पकडत होती; तर दहावीत, तू मला सोडून दुसऱ्या शाळेत गेलीस. तुझ्या बाबांच्या ट्रान्सफरने माझी प्राणप्रिय मैत्रीण माझ्यापासून दुरावली गेली. किती किती रडले होते माहितीये मी!!
तू दूर गेलीस खरी पण मनातून माझ्या जवळच होतीस कायमसाठी......
तुझी आठवण डोळ्यात पाणी घेऊनच यायची माझ्या......
आपल्या त्या शाळेतल्या आठवणींच्या झोक्यावर अजूनही, हो अगदी अजूनही मन झुलत असतं ग माझं!!

सगळंच बदललं पुढे. तू वेगळ्या ठिकाणी, मी वेगळ्या ठिकाणी. मग पुढच्या शिक्षणात अडकलो, मग नोकरी आली, मग आपली लग्नं झाली.
आणि या सगळ्यात ती शाळेतली घट्ट मैत्री, धूसर कशी झाली कळलच नाही की ग.........!!
लांब शरीराने गेलो होतो, पण त्या अंतराने गैरसमज  कधी निर्माण केले आपल्यात हे तर कळलंच नाही अजूनपर्यंत!! कधी काळी मनातला एकेक तरंग उत्साहाने शेअर करणाऱ्या आपण, आता काहीच कसं सांगत नाही आहोत एकमेकींना?
कुठे हरवलं ग ते निर्व्याज प्रेम आपलं? कित्ती वर्ष मनात एखाद्या ठेवीसारखं जतन केलं होत ना आपण, असं अचानक कसं निसटलं ग हातून?

चुकलं, आपल्या दोघींचही चुकलंच!!

आपण सावरलं नाही, कधीकाळी एकमेकींवर असणारा प्रचंड विश्वास कमकुवत होताना बघत राहिलो फक्त, त्याला बळकट करायला पुढे सरसावलो नाही. मोठ्या झालो होतो ना आपण? 
तो लहानपणीचा निरागसपणा नाही कायम धरून ठेवता आला आपल्याला.........

असो, तुला आठवत असेल ना ग, त्यावेळी तुझ्या वाढदिवसाला मी नेहमी तुला प्रेमपत्र लिहून द्यायचे. म्हणूनच यावेळीही असंच मनातली सारी खळबळ मांडणारा, पुन्हा ही मैत्री पूर्वी इतकीच जिवलग व्हावी, अशी अपेक्षा करणारा हा पत्ररूपी झोका मी तुझ्याकडे सोडला आहे, आणि वाट बघतेय, तो तू कसा परत पाठवतीयेस याची.......
तितकंच प्रेम घेऊन येईल ना ग तो परत? तीच आठवीतली घट्ट मैत्री आणेल का ग तो सोबत?
झालं गेलं विसरून सगळी मनातली गुजं सांगता येणारी मैत्रीण मला मिळवून देईल का ग तो परत.......

हा माघारी येणारा झोका, तुझ्या-माझ्या हरवलेल्या मैत्रीला पुन्हा एकमेकींच्या काळजात पूर्वीसारखीच जागा मिळवून देणारा असेल ना ग??

माझं मन सांगतय मला, तो तसाच येईल अगदी........!!

[यातील शब्द माझे असले तरी भाव माझ्या एका छान वाचक मैत्रिणीचे आहेत. आज कांचनच्या सोनालीचा वाढदिवस आहे, आणि तिला तिच्या मनातलं प्रेम माझ्या शब्दांनी सजवून द्यावसं वाटलं!! म्हणून त्यांच्या मैत्रीच्या झोक्याला माझाही हात लागला.........]

©️स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार : गुगल
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel