चटक........!!

तू बाहेरचं खायला सुरू केलं का ग?, घरात पाऊल ठेवताच मेनकेने प्रश्न केला.

नाही अजून? का ग?

तुला आवडतात म्हणून तुमच्याच इथले फेमस समोसे घेऊन आलीये मी!! मग खाणार नाही का तू आता?

अं.......????

पोरं तरी खातील ना?

पोरांनी एकदा माझ्याकडे बघितलं. मी डोळे वटारुन मानेने नाही खुणावलं, तसा चेव चढून ती दोघही जोराने ओरडत म्हणाली, आम्ही खाणारss!!

मेनकेची दोन आणि माझी दोन, मिळून चार पोरं आणि साक्षात मेनका जमिनीवर फतकल मारून माझा आवडता समोसा खायला बसली. 
माझा जीव नुसता खालीवर खालीवर झाला.......

मेनकेने पिशवीतून समोश्याची पुडी बाहेर काढली,  पुढच्या सेकंदात त्यांच्यावरचं कागदाचं आवरण बाजूला सारून त्यांना माझ्यासमोर खुशाल उघडं पाडलं. मी अधाशासारखं बघत राहिले त्यांच्याकडे डोळे फाडून फाडून....... 
घमघमाट!! नुसता घमघमाट सुटला घरभर......
माझा जीव माझ्या शरीरातून त्यांच्यात उतरला, चिंच बघून सुटतं ना तसं पाणी सुटलं अगदी तोंडाला!!
मी न माझी उरले काही, अशी सैरभैर स्थिती झाली.

तेरी ओर, तेरी ओर, तेरी ओssर, हाय समोसाss 

कतरिनासारखी गुलाबी साडी नेसून त्यांच्यासाठी मुरकत नाचताना, दिसले मी मलाच!!
इतक्या महिने राखलेला संयम डळमळू लागला. तरी......तरीही मी थांबले. 

पोरं  'हा' हवा 'तो' हवा करत ओरडू लागली.
माझ्या मनात हळूच आलं, मला कुठलाही चालेल!!

मेनकेसह माझ्यासमोर सगळ्यांनी हवा तो समोसा उचलला, त्या खमंग वासाने माझा जीव प्रचंड म्हणजे प्रचंडच खालीवर होऊ लागला.
हवा का? हवा का? खा ग काही नाही होत.
गरमागरम आहे बघ, करत मला एकेकजण बोलवू लागलं. 

बघ खातेस तर खा. एकदम टेस्टी आहे. मन नको मारू, थोडा तरी टेस्ट कर ये, मेनका गोड गोड आर्जव करत भरीस पाडायला लागली.

माझ्या मुलीने एक घास खाल्ला, आणि तिला काय वाटलं कुणास ठाऊक, तिने एक समोसा उचलला आणि माझ्या पुढे करत म्हणाली, खा ग खा. काही नाही होणार.
मी सवयीने हात पुढे केला, पण परत मागे घेतला.
ओझरता स्पर्श झाला त्याला, त्याचा वास हाताला लागला. अगदी जवळून नाकात घुसला. 

जीव भुलला रुणझुणला, का असा, सांग ना रे 
श्वास हा गंधाळला........
एका समोश्यासाठी मन वेडं होऊन चक्क प्रेमगीत गाऊ लागलं......

मी सुटले, जागेवरून उठले, आणि आत्ता ह्या क्षणी हा समोसा आपल्या तोंडात गेला नाही तर माझं काही खरं नाही, असं म्हणत मी खाली फतकल मारलं, आणि हावरटासारखा तो समोसा उचलून खायला सुरुवात केली. 

अजूनही जणू काही माझ्यासाठीच गरम राहिलेल्या समोश्याचा पहिला क्रंची बाईट घेतला आणि इतक्या वेळ त्याच्याविना तडफडत असलेला जीव शांत शांत झाला.

मेनका दात विचकत हसू लागली. पोरगी म्हणाली, मला माहिती होतच, मम्मी समोसा सोडणार नाही.

पोरगा स्वतःचं टमकं भरल्यानंतर, मम्मीची काळजी वाटून ओरडला, अगं मम्मी तुझा कोरोना?

मी घास रिचवत उत्तर दिलं, जाऊ दे तिकडं गेला उडत तो कोरोना!!

मेनका डोळा मारत म्हणाली, बघ बाई मी तर काही फोर्स सुद्धा नाही केला तुला. तुझी तूच आलीस हं.
तूच असणार तुझ्या त्रासाला जवाबदार!!

ए गपे, किती कसोशीने पाळला होता ग करोना मी साडेआठ महिने!! एकही बाहेरचा पदार्थ घरात आणला नाही म्हणजे नाही. जे काय जसं येतं तसं घरात शिजवून खाल्लं. प्रसंगी ना ना म्हणणाऱ्या मुलांना आडवं पाडून त्याच्या तोंडात कोंबलं.
ना समोश्याची, ना वडापावची,ना चमचमीत भजीची, ना पाणीपुरीची, ना भेळेची, ना त्या चायनीज मंचूरियनची कोणाकोणाची आठवण मी काढली, ना कोणाला काढू दिली.
मनातल्या खोल खोल तळ्यात दाबून टाकलं होतं मी त्यांना.

आणि आज तू माझ्यावर समोश्याची माया टाकून माझा करोना भंग केलास........
माझा इतक्या महिन्यांचा करोना मोडलास!!

माझी जीवश्च् कंठश्च मैत्रीणच घुसावी मेनका बनून माझ्या घरात!!

बरं, वाईट वाटतय ना तुला, एक चूक माफ. आता अजिबात खाऊ नको बाहेरचं काही. चुकले म्हण आणि सोडून दे, मेनका माझी समजूत घालून निघून गेली.

त्यानंतर मोजून पाच दिवसानंतर संध्याकाळी नाष्ट्याला करावं काय हा प्रश्न उगाच गंभीर होऊन समोर आला.

पोहे, उप्पीट, शिरा, खीर, भडंग, दडपे पोहे, कटलेट, रव्याचा उत्तप्पा, धिरडी अशा बऱ्याच नेहमीच्या पदार्थांवर घोर चर्चा झाली. पण यातलं कुणालाच काही खावं वाटेना.

मग मुलगी हळूच म्हणाली, मम्मी समोसा जाऊन आणू का पटकन?

माझ्यासकट सर्वांचे चेहरे खुलले, मी म्हटलं, जा लवकर पळ. 

मेनकेने जी काही चटक लावली, ती काही जाता जाईनाच बघा!!

समोसा म्हणता म्हणता, वडापाव झाला, वडापावच्या मागे भजी, भजीच्या मागे मंचुरीयन असे गरमागरम चटकदार पदार्थ करोनाव्रत तोडण्यासाठी नाही हो करत घरात घुसलेच एकदाचे. 
पाणीपुरी,भेळ यासारख्या गार पदार्थाचं, अहो असं काय करता? आम्हाला पण खाऊन बघा ना म्हणत बघावं तेव्हा टवके टाकणं चालू आहे ते एक वेगळच!!

नही नही, अभी नही, थोडा करो इंतजार......म्हणत मोठ्या प्रयासाने अजूनही दूर ठेवलंय त्यांना.......

बाकी एक चूक माफ म्हणता म्हणता किती चुका झाल्या, ते मोजायचंही सोडून दिलंय मी आता........

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel