पालकत्व
मराठी कथा
विनोदी
मैनाराणी चतुर शहाणी.........!!
मंगळवार, १३ एप्रिल, २०२१
आमच्याकडे एक तीन वर्षांची छोटी मैना येते रोज माझ्या मुलाशी खेळायला. ती बोलते ते ऐकायला फार गोड वाटतं कानाला, म्हणून आम्ही तिला सतत काहीबाही विचारत असतो.
एकदा माझ्या मुलीने तिला उगाच आपलं विचारलं, "तुझं नाव काय ग?"
तर बाईसाहेबांचा मूड काही औरच होता. ती डोळ्यातल्या डोळ्यात मिश्किल हसत म्हणाली, "मला नाही माहीत!!"
"ठमी कुणाचं नाव आहे मग?", माझ्या मुलीने तिला टपली मारत विचारलं.
तशी चेहऱ्यावरची एकही रेघ न हलवता, तिच्याकडे तिरका कटाक्ष टाकून ती म्हणाली, "माझ्या दिदुचं!!"
"दिदु नाव कोणाचं आहे मग?"
तोंडावर उगीचच गंभीरपणाचा आव आणत ती म्हणाली, "माझ्या आजूचं"
"हो का? मम्मीचं नाव काय ग तुझ्या?"
"पप्पा"
"पप्पा? आणि पप्पाचं नाव"
"मम्मी"
असं आहे का? पण आम्हाला माहिती आहे तुझं नाव, ठमकाई ना?, बाजूलाच बसलेल्या मला संभाषणात ऍड व्हायची खुमखुमी आली.
ए ठमकाई नाही बोलायचं, "मम्मीला नाव सांगेन." तिने आवाज चढवून मला दमात घेतलं!!
मग मीही माझा हिसका दाखवायच्या सुरात म्हटलं, "आहाs ग!! तुझंच नाव सांगेन मी. तू दिदुचं नाव ठमी बोलतेस, आज्जूचं नाव दिदु बोलतेस, मम्मीला पप्पा आणि पप्पाला मम्मी. सांगू का सांगू?"
तर ती चतुर शहाणी तोंड मुरडत लग्गेच म्हणाली, "ठमी आहे माझं नाव. आताच माहीत झालं मला. अन् तोंडावर हात ठेवून खुदुखुदु हसत बसली माझ्याकडे बघून."
मला हम आपके है कौन मधली माधुरी आठवली, त्या चिचुंद्रीवर तिची स्टाईल मारत मी म्हटलं, "व्हेरी स्मार्ट !!"
काल ठमकी ठुमकत ठुमकत आली सकाळी, आणि स्वतःहून म्हणाली, "माझी मम्मी आज ऑफिसला गेली. पप्पा पण ऑफिसला गेले. आज्जू घरी आहे. दिदु अभ्यास करतेय."
मी फिरकी घ्यायची म्हणून विचारलं, "तू का नाही गेलीस ग ऑफिसला?"
काय बेअक्कल सारखा प्रश्न विचारलाय, अशा तऱ्हेचा मला लूक देऊन, दोन्ही हात कंबरेवर ठेऊन, एक पाय नाचवत ती कुंदकळी म्हणाली, "मी कुलला जाते."
"कुलला जाते? कधी ग? दिसत नाहीस ती आम्हाला जाताना?"
त्यावर ती चुरमुरी नाकाचा शेंडा उडवत म्हणाली, "माझा बड्डे झाल्यानंतर असते कुल माझी."
"कधी असतो तुझा बड्डे ग?"
"जुनलाई मध्ये असतो बड्डे माझा. जुनलाईत कुल पण असतं," भुवया उंचावत मानेला उगीचच इकडनं तिकडं फिरवत ती फुल्ल कॉन्फिडन्सने म्हणाली.
जून आणि जुलैचा संगम करून बनवलेला 'जुनलाई' हा शब्द तिच्या तोंडातून ऐकायला आम्हाला भारी म्हणजे भारीच मज्जा येत होती. त्याचा उच्चारही ती क्युट करत होती, ऊन सारखा चट्कन जून आणि त्याबरोबर त्यालाच गोल गिरकी मारल्यासारखा लाssई!! जुनलाssई......
पण जसं तिला कळलं आपल्या जुनलाईने समोरच्यावर भुरळ पाडलीये, तसा तिने तो पुढच्या क्षणापासून अजिबात म्हणजे अजिबात उच्चारला नाही.
या मैनाराणीचा बड्डे ना जून मध्ये असतो ना जुलैमध्ये, ना तिच्या मताप्रमाणे त्यांच्या संगमात जुनलाईमध्ये, तो असतो जानेवारीमध्ये!!
त्याची तिला आठवण करून देता, तिने विशेष काही आढेवेढे न घेता, मोठ्या मनाने ते मान्य केलं, आणि म्हणाली, हा जानेवारीतच असतो बरोबर!!
ससुली आज आली तशी टुणुक टुणुक उड्या मारत घरभर फिरायला लागली. मला ते काही बघवलं नाही. तिच्याशी गप्पा हाणायचा मूड आला, मी तिला पकडलं आणि विचारलं, "काय ग उभी केली का गुढी?"
ती म्हणाली "हो."
मी म्हटलं, "तू काय मदत बिदत केलीस की नाही?"
तर ती गुंडुकली सगळं अंग घोसाळत म्हणाली, "होss मी तांब्या ठेवला गुढीवर!!"
पोरीचं काम ऐकून मला बाई भारी हसायला आलं!!
मग म्हटलं, "काय होतं घरी आज. मला खाऊ नाही आणला काही!!"
आपण बोलतोय ते शत:प्रतिशत खरं वाटावं, असा चेहरा करून ती बिरमुटली म्हणाली, "दुसरं काही नव्हतं, पाडवाच होता फक्त!!"
मी पुन्हा खो खो हसले, अजूनही हसतेय.
ही छबुकडी येते माझ्या पोराशी खेळायला म्हणून, मात्र पाचदहा मिनिटं त्याच्याशी खेळुन त्याला देते टुल्ली, अन् माझ्या मुलीच्या मागे पुढे करत बसते. ताई ताई उनो खेळूया, ताई ताई पत्ते खेळायचेत, ताई ताई कॅरम खेळूया, काही नाही तर भारताचा नकाशा लावत बसायचा असतो तिला तिच्याबरोबर.
सगळे मोठ्यांचे खेळ खेळायचे असतात चिंचुकीला. येत काहीच नाही खरं, पण नाही घेतलं तर आख्खी बिल्डिंग हादरेल एवढ्या ताकदीने भोकाड पसरते इवलीशी बया.
आज खेळताना मी विचारलंच तिला, "काय ग उनो उनो करते. शेंबूड तरी पुसता येतो का स्वतःचा?"
त्यावर तिथेच बसलेल्या माझ्या पोराने हात वर करून सांगितलं, "मला येतो." तिची दिदुही होती तिथंच, तीही म्हणाली, "मला पण येतो."
ह्या चुटूकलीने काय करावं, तिने न गळणारं नाक जोsरात शिंकरून मला पुसून दाखवलं, आणि म्हटली, "हे बघ मला पण येतो."
मी आणि माझ्या मुलीने खदाखदा हसत तिला जोरात मिठी मारली. मुलीने पटकन उठून घरात असलेलं चॉकलेट तिच्या हातात दिलं, आणि म्हणाली, "जहाँपनाह तुस्सी ग्रेट हो!! तोहफा कुबूल करो!!"
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article