सासूबाई नमो नम: !!

यावेळी खूप दिवसांनी मनस्वी माहेरी आली होती. 
तसं होतं एकाच शहरात, मात्र यावेळी पहिल्यांदाच जवळपास महिन्याच्या अंतराने तिची फेरी झाली होती.
दोन्ही भावजया अगदी मैत्रिणीसारख्याच होत्या तिच्या. ती आली की आपली एखादी जिवाभावाची मैत्रीण भेटल्याचाच आनंद व्हायचा त्यांनाही. भरपूर काही असायचं बोलण्यासारखं. कसा वेळ जायचा समजायचंही नाही कुणालाच.

त्यातून मनस्वीची आईही मनाने मोकळी होती, तीही त्यांच्यात सहज सामावली जायची. 

आता मनस्वी खूप दिवसांनी आलेली म्हटल्यावर,
निवांत गप्पा झोडता याव्यात म्हणून सगळ्यांनी काम पटापटा आवरली, अन् दुपारच्या जेवणाचा कार्यक्रम उरकल्यावर मात्र मनस्वी, तिच्या दोन्ही भावजया आणि आई यांच्या मस्तपैकी गप्पागोष्टी सुरु झाल्या.
  
एकात एक विषय निघत होते आपले!! तेवढ्यात कुठूनतरी बोलण्याबोलण्यात  मनस्वीच्या सासरच्या माणसांंचं नाव निघालं  आणि दोन्ही भावाजयांनी एकमेकींकडे बघत जीभ चावली. आईही एकदम गप्प झाली. तिने दोन्ही सुनेकडे 'आता झाली का पंचाईत' या भावाने पाहिलं.

"सांगू का? काही म्हणा, कधी कधी ना मलाच हेवा वाटतो माझ्या भाग्याचा!! एवढी समजून घेणारी सासरची माणसं किती कमी बघायला मिळतात नाही?," मनस्वी अगदी तल्लीनतेने गोडवे गायला सुरू झाली.

ते गोडवे तिच्या माहेरी अगदी तोंडपाठ झाले होते. नुसता विषय निघायचा अवकाश की मनस्वी एकदम सुरूच होई. तिच्या घरातल्या झाडून सगळ्यांचं तास तास गुणगान गायला लागी.
खासकरून 'सासूबाई नमो नम:' तर कायमच !!

भावाजयाच कशाला आईही कंटाळून जाई अगदी.
शक्यतो कुणी तो विषय टाळायचंच बघत नेहमी.

यावेळी मात्र मनस्वी बोलत असतानाच तिच्या धाकट्या भावजयीने तिला मधेच टोकलं.
"मानलं पाहिजे वन्सं तुम्हाला!! कोणाचं कौतुक करायला शिकावं ते तुमच्याकडूनच!! एवढं भरभरून बोलता सासरविषयी पण मागच्या वेळी तुमच्या सासूबाईंनी आम्हा सर्वाना खास निमंत्रण दिलं होतं  जेवायचं, तेव्हा मुद्दाम बाजूला घेऊन सांगितलं तुमच्या आईला, मुलगी नीट काम करत नाही, फारच हळुबाई आहे. जेवणात सुद्धा जेमतेमच आहे. जरा चार गोष्टी सांगा तिला, अस्स्ं म्हणाल्या माहितीये?"

"जाऊ दे ग, कशाला उगाच नको ते विषय काढायचे आपण," मनस्वीची आई नाराजीनेच म्हणाली.

"अहो आई, इतके दिवस मी बोलले का काही. पण या इतकं भरभरून बोलतात,आणि ते मात्र तिकडे यांना नावं ठेवतात. वाईट वाटतं मला हो." धाकटी हे म्हणाली तशी मोठी भावजय पण तिच्यात मिसळून म्हणाली, "खरंच आमच्या वन्सं भोळ्या आहेत बाई फार!!"

मनस्वीची आईही मग सुनांना दुजोरा देत म्हणाली, "मनस्वी, काळजी वाटते ग तुझी. तू बोलतेस खरी इतकं त्यांच्याबद्दल पण त्यांचही मत तसच असतं तर किती आवडलं असतं ग आम्हाला!!"

"आई अग मी पहिल्यापासूनच हळुबाई आहे, माहीत नाही का तुला? काय खोटं बोलतात त्या? त्यांचं सगळं फास्ट काम. मी कितीही प्रयत्न केला तरी मला नाही जमत तसं. पण अगं खरंच त्या समजावून घेतात मला. कधी रागावतातही, मात्र मनात काही म्हणजे काही नसतं त्यांच्या. मलाही अनेकदा म्हणतात, थांब तुझ्या आईलाच नाव सांगते आता. लहान मुलाला कसं म्हणतो आपण अगदी तसच, लटक्या रागाने!!
मग सागितलं असेल कधी माझं नाव त्यात काय एवढं? 
माझ्याकडून काही चूक झाली जरी, तरी एकदम तोडून त्या कधीच काही बोलत नाहीत. माझ्या नणंदेला खूप त्रास आहे सासरी, आल्यावर नेहमी बिचारी रडत असते. तिच्यामुळेच हळव्या झाल्यात त्या माझ्या बाबतीतही. आपल्याकडून असं नको व्हायला, म्हणून खूप दक्ष असतात हो त्या. 
मला तरी बाई काही चुकीचं वाटत नाही त्यांचं. एखादी म्हणेल माझी पोरगी भोगतेय तर हिला का मी अशीच सोडू. वचपा काढला असता एखादीनं साध्या साध्या कारणावरून!! 
ते सोडून तुम्हाला माझं नावच सांगितलं ना फक्त? वाटलं असेल त्यांना, आईने समजावलं तर फरक पडेल काही.
कुठे एवढ्या छोट्या गोष्टीचं भांडवल करत बसायचं? बाकी सगळं चांगलं असताना, नेमकं एखादया वाईट गोष्टीवर बोट ठेऊन झुरायचं? 
मी माझा फोकस मुद्दामहूनच चांगल्यावर ठेवलाय फक्त, आणि माझ्या सासुबाईंसारखीच दक्ष राहते त्याबद्दल मीही !!"

मनस्वीचं बोलणं संपलं तेव्हा तिची आई आणि  दोन्ही भावजयींच्या डोळ्यात तिचं कौतुक मावत नव्हतं!!

आईने तिला जवळ घेतलं, आणि मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली, "माझी मुलगी हळुबाई असेल, पण हेवेदावे करणारी नाही,  
घरादाराचं चांगुलपण मिरवणारी आहे, याचा मला खूप अभिमान वाटतोय!!"

"पोरगी तुमच्यावरच गेलीये हं अगदी, आई तशी लेक!!" दोन्ही भावजयाच्या तोंडून एकदमच निघालं. मनस्वी मुद्दाम ओरडून म्हणाली, "मला बोलता आणि स्वतः पण तेच करता की ग, सासूबाई नमो नम:!!"

"ते तर करायलाच हवं बाई!!" म्हणत दोन्ही भावजया आपल्या सासूच्या हातावर टाळ्या देत खळाळून हसल्या...........

(सत्यकथा बरं का ही!! खोटं काहीएक नाही.)

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel