ससेमिरा........!!

काही दिवस चेंज म्हणून ग्रीष्माचा नर्सरीतला मुलगा सोहम हट्टाने त्याच्या आत्याच्या घरी राहायला गेला होता. 
आत्याचा मुलगा नीरव त्याच्याएवढाच होता साधारण. दोघांची चांगली गट्टी होती. पहिले सारखी एकमेकांकडे ये जा असायची दोघांची, पण कोरोना सुरू झाल्यापासून त्यांच्याही भेटण्यावर बंधनं आली. 
फोनवर तसं बोलणं व्हायचं दोघांचं, पण एकदा मात्र फारच हट्ट धरला सोहमने मला नीरवकडे नेऊन सोडाच म्हणून. मला त्याच्याशी खूप खूप खेळायचय.
ग्रीष्माचं आणि त्याच्या बाबांचं मग काहीच चाललं नाही त्याच्यापुढे. त्यांनी त्याला नीरवकडे नेऊन सोडलं.
आठवडाभर राहिल्यावर त्याच मन भरलं. अन् त्याने ग्रीष्माला घ्यायला बोलावलं. त्याच संध्याकाळी ग्रीष्मा गेलीही लगेच. तिलाही करमत नव्हतंच.
तिकडे गेल्यावर गप्पा सुरु असतानाच सोहमची आत्या एकदम म्हणाली, वहिनी काय ग मुलाला तू काहीच शिकवलं नाहीस?

ग्रीष्माला एकदम धस्स झालं. वागण्यात कुठे चुकला की काय आपला मुलगा? नीट रहायच असं समजावलं तर होत त्याला, आणि त्यानेही मोठ्याने हो म्हणून प्रॉमिसही केलं होतं.
"का काही केलं का त्याने?," असं म्हणत तिने आत खेळणाऱ्या सोहमला हाक मारली.

"काही केलं नाही, खूप गुणी बाळ आहे तुझं. मी वागण्याबद्दल नाही बोलत नाही ग. त्याला साधी साधी स्पेलिंग येत नाहीयेत. ABCD पण पूर्ण नाही काढून दाखवली त्याने. ऍडीशन, सबस्ट्रँक्शन तर दूरच राहीलं," चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दाखवत सोहमची आत्या म्हणाली.

"अगं शाळेत कुठं जायला मिळालं त्याला या कोरोनामुळे?"

"ऑनलाईन होती ना पण शाळा?"

"मी नाही बसवलं ग त्यात. कुठे डोळ्यांना त्रास द्यायचा एवढ्याशा पोरांच्या!!"

"अगं त्रास काय? नुकसान नाही का होतंय त्याचं?"

"नुकसान व्हायला तो असा केवढा मोठा आहे? चिल्ल्यांपिल्यांचं कसलं नुकसान?", ग्रीष्माला तर हसायलाच आलं फार.

"हसतेस काय वहिनी? सिरीयस मॅटर आहे हा!! तुला सांगू आमच्या नीरवचं एकही ऑनलाइन सेशन मिस केलं नाही मी. शिवाय ऑनलाईन फोनीक्सला ही टाकलंय त्याला. कुठलंही स्पेलिंग विचार धडाधडा सांगेल बघ. शिवाय ऑनलाइन ऍबँकस सुद्धा चालू आहे त्याचं. सगळं सगळं येतं त्याला. आता कोडिंगसाठी पण चौकशी चाललीये. थांबच!! नीरव, ये इकडे. टेबलची स्पेलिंग सांग पाहू? आता चेअरची? कार्टूनची?"
नीरवने झट की पट सगळ्या स्पेलिंगा बोलून दाखवल्या. नंतर काही कॅलक्युलेशन्स ही करून दाखवले.
"सोहम खूपच मागे आहे ग!! टेन्शन वाटतय मला त्याचं" असं म्हणून आत्याने चेहऱ्यावर बऱ्याच आठ्या पाडल्या.

ग्रीष्माने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, "तुला आठवतंय का हे सगळं तुला कधी येत होतं?" 

"होss मला ना इंग्लिश तर पाचवी पासून सुरू झालं. मग स्पेलिंगही तेव्हाच हळूहळू यायला लागले. गणितं साधारण पहिली दुसरीत थोडी थोडी  जमायला लागली. पण बघ ना माझा मुलगा कशी चटाचटा नर्सरीतच सोडवतो. I am so proud of him!!"

"चुकलं माझ्या सासू सासऱ्यांचं फार!!"

"का?

का ग काय चुकलं?"

"त्यांनी वेळच नाही दिला तुला. मुलगा एवढ्या फास्ट शिकला तर तुही शिकली असतीस की? त्यांनी तुझ्याकडून करून नाही घेतलं. मी तर म्हणते तुझं नुकसान केलं त्यांनी." ग्रीष्मा अगदी ठासून बोलली. 

"छे ग माझं कसलं नुकसान झालं? बोर्डात आठवी आले होते मी!!" आत्या अभिमानाने उद्गारली.

"खरंच!! एवढ्या लेट सगळं शिकून सुद्धा? नर्सरीत जे यायला हवं ते पाचवीत का कधीतरी आलं तरीसुद्धा तू बोर्डात आलीस? काही फरक नाही पडला तुला?" 

"नाsही. मला तर पहिलीतच शाळेत टाकलेलं, नर्सरी मी पाहिलीच नाही." आत्या अभावितपणे बोलून गेली.

"अय्या हो?"

"मग काय तर......खोटं सांगते का मी?"

"मग मुलाच्या डोक्यावर का बसलीयेस ग बाई? त्याच्या मागे का नर्सरीतच तुझं पाचवीतलं सगळं आत्ताच यायची सक्ती? एवढी घाई का?
एन्जॉय करू देत की त्याला त्याचं बालपण!!
का नको इतका अभ्यास, फोनीक, कोडींगचा ससेमिरा त्याच्यामागे आत्तापासून?
पहिली दुसरीत गेल्यावर आपोआप स्पेलिंग येतील त्याला, तू विशेष कष्ट न घेताही. स्टेप बाय स्टेप सगळं शिकेल तो. जन्मलो की आपण पण लगेच चालायला लागत नाही. पालथं पडणं, रांगणं, बसणं, उभं राहणं, ह्या सगळ्या स्टेप पार करून पहिलं पाऊल उचललं जातं बाळाचं!! ते सगळं अनुभवताना कित्ती आनंद मिळतो आपल्याला!! 
आपोआप करत ना बाळ ते? त्याच्या मेंदूची तयारी झाल्यावर? करु शकतो का ढवळाढवळ आपण त्यात?

बरं त्यातून हे सगळं आत्ताच शिकून कोणी लगेच दहावीत बसवणार आहे का त्याला? पहिली दुसरी करतच पोचणार ना दहावीत तो?
यावं की सगळं यावं, पण मेंदूची तेवढी क्षमता तरी विकसित होऊ द्या ना त्याच्या!! 
'म्हणे अब हर बच्चा सिखेगा कोडिंग', अरे पण बच्चा आहे ना तो? त्याला काय करायचंय आत्ताच शिकून कोडिंग? बच्चाचं बचपन हिरावून घेऊन त्याच्या डोक्यात अनेकानेक गोष्टी भरण्याची खरंच घाई का एवढी?

हो, नाही येत माझ्या मुलाला काही. पण तो खूप खेळतो, त्याला पाहिजे ते करतो. मस्त आनंदात मोकळा घरी-बाहेर बागडतो. त्याच्या वयात जे मी करत होते अगदी तेच तोही करतो. त्याचं वय, त्याचं बालपण तो खूप खूप एन्जॉय करतो. 
I am sooo proud of him!!

ग्रीष्माचं बोलणं सपलं. सोहमच्या आत्याला त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी सुचलच नाही. तिला ग्रीष्माकडून हे सगळं अपेक्षितच नव्हतं. तिला वाटलेलं ग्रीष्माला पोराची अधोगती ऐकून प्रेशर येईल. पण झालं उलटंच!!

ग्रीष्माने तिलाच सुनावलं. आता त्याचा किती परिणाम होईल हे मात्र देवालाच माहीत!!
कारण मुलांना काहीही माथ्यावर न मारता नुसतच मोकळं सोडणं ही स्वाभाविक गोष्ट देखील सहजासहजी कुणाच्या पचनी पडणं फारच कठीण होऊन बसलय हल्ली!!

होन्ना?

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel