मराठी कथा
सामाजिक
माज
रविवार, ११ जुलै, २०२१
त्याचं दुकान असं ओकंबोकं कधीच दिसायचं नाही.
बघावं तेव्हा मुलांचा किलबिलाट असायचा त्याच्या दुकानात. त्याच्याकडे जेवढी गोळ्या, चॉकलेटची, बिस्किटांची व्हारायटी होती, तेवढी आजूबाजूच्या कुठल्याच दुकानात नसायची. अगदी दोन रुपयांपासून पाच रुपयांपर्यंत मिळणारी खेळणी पण होती त्याच्याकडे.
मोक्यावर दुकान होतं. एक नाही तर दोन शाळा अगदी हाताच्या अंतरावर होत्या.
कधीही बघितलं तरी मुलांची झुंबड उडालेली असायची त्याच्या दुकानात!!
काका, आठआणेवाली ती पिवळी गोळी द्या, काका मेलोडी द्या, काका पॉपिंग्ज द्या, पेप्सी द्या, फ्रूटी द्या, कुणी म्हणायचं काका मला भवरा द्या, कुणी कुठला स्टिकर मागायचं तर कुणी पट्टी, कुणी वही, तर कुणी खोडरबर, सतत कुणी काहीतरी मागतच असायचं.
आपलं दुकान एवढं भरभरून ज्यांच्यामुळं चालतं, त्या मुलांवर तो मात्र सतत चिडचीड करत असायचा. ज्यांच्यापायी धंदा होत होता त्यांच्यावरच तो सतत उखडत असायचा .
जरा कुठल्या पोराने हे नको ते द्या म्हटलं की तो व्हसकन डाफरायचा. जरा कोणी बरणीत खाली असणारी आवडीच्या कलरची गोळी मागितली, तर घेतलेले पैसे परत त्या पोराच्या हातावर टेकवून म्हणायचा, निघ चल इथून.
मुलाचे आई बाबा असले त्यांच्याबरोबर मात्र त्याचं बोलणं सौजन्यतेचं असायचं.
जरा कळणाऱ्या मुलांनी त्याला 'तुसडे काका' म्हणूनच नाव ठेवलं होतं. पोरांना कितीही वाटलं त्याच्या दुकानात जाऊ नये, तरी त्याने जे जे काही ठेवलं होतं, त्याची मुलांना चटक लागली होती. त्याने कितीही तुसडेपणा केला तरी मुलांची गाडी त्याच्या दुकानापाशीच अडकायची.
मागच्या महिन्यातलीच गोष्ट. माझ्या मुलाला पोकेमॉनचा बॉल पाहिजे होता, त्याच्या मित्राने तो त्याच्या दुकानातूनच आणला होता, म्हणून मी मुलीला म्हटलं, "जा ग जरा घेऊन ये त्याच्याकडून."
तर माझी मुलगी म्हणाली, "मी अजिबात जाणार नाही मम्मी. ते फार हडतुड करतात ग. मी चुकूनही जाणार नाही त्यांच्या दुकानात."
माझ्या मुलाला तोच म्हणजे तोच बॉल पाहिजे होता. मुलीने दुसरीकडे शोधला. पण तो कुठे मिळालाच नाही.
मग मीच मुलाला घेऊन संध्याकाळी त्याच्याकडे गेले. दुकान अर्ध उघडं अर्ध बंद होतं. तो दुकानातच होता. बायको दुकानाच्या बाहेर खुर्ची टाकून बसली होती. आधी मुलीला, नंतर मुलाला घेऊन गोळ्या- चॉकलेटसाठी मी वरचेवर त्यांच्याकडे जायचे, त्यामुळे तशी तोंडओळख होती त्या दोघांशीही.
मी मुलाला बॉल घेऊन दिला. आतला तो पुढे आला, आणि त्याने पोराला चॉकलेट दिलं.
मी म्हटलं, "चॉकलेट नकोय आम्हाला.
तर तो हसून म्हणाला, असच दिलं हो."
मनात म्हटलं, एवढा बदल कधीपासून झाला याच्यात? मुलीनं तर मला खूप काही सांगितलेलं याच्या खडूसपणाबद्दल.
मी त्याच्या बायकोकडे बघून भुवया उंचावल्या.
तर तिला माझा रोख झटकन कळला. किती न काय काय सांगू असं झालं. कोणापाशीतरी तिला मोकळं व्हायचं होतच बहुतेक.
"ताई, दिवसभर पोरांची वाट बघत बसतात हो ते आता. येत होती तेव्हा किती व्हसकायचे पोरांवर. आता तेच आठवून आठवून रडतात हो भडाभडा कितीतरीवेळा.
त्या शाळा सुरू होत्या, तेव्हा त्यांच्यावरच चालत होतं आमचं सगळं. मागच्या वर्षीपासून अगदी ओस पडलं दुकान आमचं. काय ती मुलांची गर्दी असायची. किती गलका, किती तो आवाज असायचा. अन् किती तो पैसा असायचा, त्या चिमुकल्या हातांनी येणारा !!
त्या पैश्याने माज आणला, आणि तो पैसा देणाऱ्या पोरांवरच तो निघायला लागला. पोरं नकोशी झाली होती त्या काळात आमच्या ह्या माणसाला. अगदी घरचीही. घरी आल्यावर चिडीचूप शांतता लागायची यांना. आमची बारकी पोरं अगदी शहाण्या बाळासारखी गपगार व्हायची. मार पडायचा ना बेदम, जरा आवाज केला की. सवयच लागली मग त्यांना.
आता हे हात जोडून म्हणतात, पोरांनो उठा दंगा करा वाट्टेल तेवढा. पोरं करतच नाहीत अजिबात. बापाने पाऊल टाकलं घरात, की तोंडं बंदच होतात त्यांची आता आपोआप.
दुकानात सतत येणारी पोरं देखील कोरोनामुळं बंद झाली. त्यांच्याबरोबर पैसाही गेला.
माज उतरला. आता दुकानासमोरून जाणाऱ्या एखाद्या पोराला स्वतःच बोलावून गोळ्या चॉकलेट देत बसतात. आता स्वतःहून एखाद्याला विचारतात, कुठल्या रंगाची गोळी हवी बाळा."
अहो मला दिवसातून किती वेळा म्हणतात, "देवाची शपथ आता शाळा सुरू झाल्या की एकाही पोरावर डाफरणार नाही मी. बोल की ग, शाळा कधी सुरू होणार? पोरांची झुंबड कधी उडणार ग दुकानात? कितीतरी वेळा डोळ्यातून पाणी काढतात हो पोरांसाठी. देवापुढं उभं राहून थोबाडीत मारून घेतात कित्येकदा.
आणखी असच राहीलं तर वेड लागेल हो आता त्यांना, मला खूप भीती वाटते."
मी त्याच्याकडे पाहिलं, तो शून्यात बघत होता कुठंतरी.
तिला म्हटलं, "होईल आता लवकरच सगळं नीट."
घरी आले, मुलगा बॉलशी खेळत बसला.
मुलगी म्हणाली, "आणलास एकदाचा त्या तुसड्या काकांकडून बॉल. आमच्या गँगमधलं कोणी म्हणजे कोणी जात नाही त्यांच्या दुकानात. कुठं काही नाही मिळालं तर बसतो गप तसेच. फुकटचा मूड ऑफ कशाला करून घ्यायला सांगितलाय कोणी त्यांच्या दुकानात जाऊन !!"
"नका ग असं करू. तो माणूस फार फार वाट बघतोय सगळ्या पोरांची. तुम्हा मुलांचं त्याच्याकडे पाठ फिरवणं, त्याचा जीव काढतय आता. त्याचा माज उतरलाय सगळा.
शाळा पुन्हा सुरु होईपर्यंत त्याने तग धरला पाहिजे, त्यासाठी तुम्ही पोरं त्याच्या दुकानात जायला हवीत. त्याचं जगणंच तुम्हा पोरांवर अवलंबून झालंय ग आता......"
हे बोलताना त्या माणसाशी काही सबंध नसताना डोळयात पाणी का भरून आलं, कळलंच नाही मला. मुलीकडे बघितलं तर तिचंही तेच झालं होतं. ती समजायचं ते समजली.
झट्कन उठली अन् म्हणाली, मी मैत्रिणीला घेऊन त्याच्याकडून ती मला आवडणारी गोल्डन रॅपरवाली चॉकलेटं घेऊन येते लगेच. कित्येक महिन्यात खाल्ली नाहीत ती.
जाऊ ना?
मी आवंढा गिळत म्हटलं, जा, पळ पट्कन...........
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article