वाचनवेड- वळीव

 Marathi Book Review - वळीव



मला नेमकं आठवत नाही, पण अकरावीत की बारावीत असताना आम्हाला एक धडा होता, 'वळीव' नावाचा. तो त्यावेळीसुद्धा वाचताना मला आतून काहीतरी दाटून आल्यासारखं व्हायचं. उगाच उदास उदास वाटायचं. पण तरीही त्याबद्दल एक ओढ निर्माण झाली होती. आजही कधी वळीवाचा पाऊस पडला, की तो धडा हमखास डोळ्यासमोर येतो अन् मन उगाच कावरंबावरं होतं.
कुठलाही धडा आवडला की लेखकाची सगळी माहिती वाचून त्याची इतर पुस्तक मिळतील तशी शोधून काढून वाचायची, ही मला तेव्हा सवय होती, जी अगदी आजही आहे. शंकर पाटील यांचं नाव जे तेव्हा फिट्ट डोक्यात बसलं होतं, ते अगदी अजूनही तसच होतं. तो 'वळीव' धडाही पक्का ठाण मांडून बसला होता डोक्यात. आता मागच्या दोन वर्षांपासून पुस्तकं विकत घेऊन वाचण्याची हौस सुरू झालीये. किंडल आहे, पण आपलं स्वतःचं पुस्तक असणं, ते घेऊन वाचणं, त्या पुस्तकाचा स्पर्श अनुभवणं, त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून सगळं मन भरेपर्यत न्याहाळत बसणं, हे जे काही आहे ते एखाद्या वाचनवेड्यालाच कळू शकतं.
कोणती पुस्तकं घ्यावीत असा विचार आल्यावर शाळेत, कॉलेजमध्ये ज्यांचे धडे होते, ते सगळे लेखक धावतपळत येऊन आठवणींचं दार ठोठावू लागले. त्यात पहिला नंबर पटकावला, शंकर पाटील यांनी. बुकगंगावर पुस्तकांच्या दुनियेत भटकत असताना शंकर पाटीलांचं वळीव समोर आलं आणि मी माझ्या कॉलेजच्या वर्गात जाऊन पोचले.
झटकन् पुस्तक मागवलं आणि आलं तसं फटकन् वाचायला घेतलं. सुरुवातीलाच समोर आला माझा कॉलेजमधला धडा 'वळीव'!! एकदा अधाशासारखा भरभर वाचून काढला अन् नंतर पुन्हा शांतपणे वाचला. आयुष्याची संध्याकाळ खरंतर रात्रच तोंडाशी आलेल्या तात्याच्या जीवाची घालमेल आणि त्याच्या म्हातारीचा त्याच्यात गुंतलेला जीव या दोहोंची वळीवाच्या सोबतीने इतकी सुंदर गुंफण केली आहे की शेवटाला डोळे डबडबतातच आपले!!
पण भरून आलेल्या मनाला रिझवण्यासाठी लेखकाने पुढची धमाल कथा 'शाळा' फर्मास मांडली आहे. दिसतंच डोळ्यांना जणू सारं सिनेमा पहिल्यासारखं!! खेडेगावातली शाळा, त्यातले बेरके मास्तर, टवाळ पोरी पोरं अन् त्यांचा रांगडी धाबडधिंगा!!
यातली 'आफत' ही कथा म्हणजे भलाई का तो जमाना ही नही रहा म्हणत, हल्ली लोकं कुणाला मदत करण्याऐवजी त्यापासून दूर का पळू पाहतात, त्याचं मस्त चित्र रंगवून दाखवलं आहे. 'दाखवलं आहे' हे मी मुद्दाम म्हणतेय कारण शंकर पाटीलांनी लिहिलेली यातली प्रत्येक गोष्ट आपल्या डोळ्यासमोर त्यातल्या व्यक्तिरेखेच्या बोलण्याच्या हेलापासून ते हावभावापर्यंत सारं काही जिवंत उभं करते.
संपूर्ण कथाभर चालणारा 'खेळ' कथेतला खेळ शेवटाला जीवाला चटका लावून जातो.
तर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या उतावळ्या नवऱ्याची 'टिपिशन' ही कथा आपल्या चेहऱ्यावर शब्दागणिक हसू फुलवते.
शंकर पाटील यांचं हे पुस्तक आसू आणि हसू यांचं सुरेख मिश्रण आहे.
चौदा कथा आहेत या पुस्तकात, त्यातली कुठली कथा सर्वात बेस्ट म्हणून निवडावी, याची मी निवड करूच शकले नाही, इतक्या माझ्या मनाला त्या साऱ्याच भावल्या आहेत.
राज्यशासनाचं पारितोषिक मिळालंय या त्यांच्या कथासंग्रहाला!!
माझ्या मनाच्या जवळची आणखी एक गोष्ट आहे शंकर पाटील यांच्या लिखाणात ती म्हणजे माझ्या गावाची, माझ्या लहानपणीची आठवण करून देणारी भाषा!! जी आता खरंतर फारशी ऐकायला नाही मिळत. बरेचसे हरवलेले शब्द मला सापडले त्यांच्या कथांमध्ये अन् तुमास्नी सांगत्ये लै मंजी लै भारी वाटलं बगा !!

वाचनप्रेमी असाल आणि 'वळीव' वाचायचं राहीलं असेल तर आवर्जून वाचा. तुम्हाला वाचण्याबरोबर साऱ्या कथा डोळ्यादेखत घडतायत जणू असच वाटेल.
वाटेल म्हणजे काय वाटणारच.........!!

©️ स्नेहल अखिला अन्वित

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel