उपरी.......!!!



सत्तरी पार केलेल्या वृन्दाताई आज मनाने कुठेतरी हरवल्या होत्या. काही केल्या त्याचं मन आज वर्तमानात लागत नव्हतं. तसं सगळं बरं चाललेलं, पण मनाची हुरहूर काही जात नव्हती आज.
खूप दिवस झाले कोणी आपलं त्यांना भेटलं नव्हतं, कोणी फोनवरून पण त्याचं कसं काय चाललय हे विचारलं नव्हतं.
तसे खूप जण होते त्यांच्या आजूबाजूला त्यांच्यासारखेच, पण मन काही केल्या रमतच नव्हतं.  
सारखा मनात एकच विचार, आज माझा संसार असता तर मी इथे असते का अशी या वृद्धाश्रमात???
मी योग्य वेळी निर्णय घेतला असता तर परिस्थिती याहून काही वेगळी असू शकली असती का???
मग वृन्दाताई एकेक आठवणींची पान उलटत बसल्या........
आई-वडिलांची मोठी लेक......प्रत्येक गोष्टीत हुशार, शिक्षणातही सतत चमकणारी, अगदी मागच्या भावापेक्षाही सर्व गोष्टीत सरस.
शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळाल्यावर अर्थातच लग्नाचा बार उडवून दिला गेला.
आणि इथेच तिच्या नशिबाची दुर्दशा सुरू झाली.
घरच्यांची चौकशी कमी पडली. नवरा व्यसनी, जुगारी निघाला. 
एवढी शिकलेली ती, सहन तरी किती दिवस करणार. 
नवऱ्याला बदलायचा प्रयत्न केला, पण तोही अट्टलच निघाला.
हिची नोकरी होतीच, सरळ नवऱ्याचं घर सोडून माहेरी आली. 
इकडे भावाचा संसार सुरू झालेला. हिने तोच आपला मानला. आई-वडील वयपरत्वे निजधामास गेले.
भावाच्या संसारात म्हटलं तरी हिची अडचण वाटायचीच भावजयीला.
तशी ही स्वभावाने गरीब. आणि भावाच्या संसाराच्या प्रत्येक टप्प्यावर हिची मदत होत होतीच. म्हणूनच भावजय पण  तशी तोंड दाबून होती.
घरची बरीचशी कामं, भावांच्या मुलांचं सर्व तिने अगदी आपलेपणाने मनापासून केलं.
तिला एकटं वाटायचं कधी कधी पण अगोदरच्या अनुभवामुळे दुसऱ्या लग्नाचा विचार ती झटकून टाकत होती.  नक्कोच वाटायचं तिला ते सारं.
जवळची मैत्रीण किती समजावयाची. अगं तुझं तुला कोणी तरी पाहिजे. हा भावाचा संसार आहे, कितीही झालं तरी तिथे तू उपरीच, तुझा संसार बहरु दे की. ठेच लागते म्हणून चालायचं कोणी सोडत नाही ग. 
हे सारे नंतर बघणार का तुला??? बघ हिच योग्य वेळ आहे काय तो निर्णय घे.....
तिचं उत्तर ठरलेलंच, अगं ती माझीच मुलं आहेत ग, मी त्यांना माया लावलीये, माझं सारं ते शेवटपर्यंत करतील.
 हिने काही आपल्या दुसऱ्या लग्नाचं मनावर घेतलं नाही आणि हिच्या घरच्यांनीही तेवढं लक्ष घातलं नाही. आता तर ती त्यांची सर्वबाजूने सोयच झाली होती.
भांड्याला भांड लागायचं पण ते थोडक्यात सावरलं जायचं.



हळूहळू भावाची मुलं मोठी झाली, त्यांचे संसार सुरू झाले. नोकरीत उच्चपदी असल्यामुळे घरी श्रीमंती आली.
इकडे ही सुद्धा रिटायर झाली. आता नातवंड सांभाळू लागली. तब्बेतीच्या तक्रारी सुरू झाल्या. आता अडचण जास्तच जाणवायला लागली. तरी देखील चालू होतं सारं धुसपुशीत. 
 भावाची मुलं लहान असताना त्यांच्या आईबरोबर जागून हिने त्यांची आजारपण काढलेली, पण आता त्याच मुलांची हिच्या आजारपणाच्या वेळी चिडचिड होऊ लागली.
भाऊ भावजय देखील बऱ्यापैकी थकलेले......त्यांचीही आजारपण सुरू झालेली. आता एवढ्या सगळ्यांच कोण बघणार.
बरं आता तशी मदत तर काहीच होत नव्हती तिची, उलट यांनाच तिच्यामुळे जास्तीची कामं करायला लागायची.
झालं घरात कुजबुज चालू झाली. आणि एके दिवशी हिला सांगितलं गेलं तुझ्यासाठी एक चांगला वृद्धाश्रम बघितलाय. तू इथे राहिली काय अन तिथे राहिली काय सारखंच..... आम्ही येत जाऊच तुला भेटायला .
ती काय बोलणार होती??? 
तिने स्विकारलं सत्य......कळलं तिला जड झालीये मी यांना, या मुलांची मीही आईच होते ना, मी तर हेच मानत होते, मग हा भेदभाव का केला गेला ??? 
स्वतःच्या आई-वडीलांना जवळ ठेऊन मला का बाजूला सारलं यांनी, मी नव्हतेच का या कुटुंबात कधी. कोणत्या भ्रमात होते मी इतक्या दिवस???
संध्याकाळच्या चहासाठी आश्रमातली घंटा वाजली आणि वृन्दाताई भानावर आल्या. 
आज त्यांना आपल्या मैत्रिणीची प्रकर्षाने आठवण आली. खरंच, तिचं ऐकून मी त्याचवेळी नशिबाला दुसरा चान्स देऊन माझा संसार फुलवला असता तर आज ही वेळ आली असती का माझ्यावर??
दुसऱ्याच्या संसाराला सर्वपरीने हातभार लावला, आणि काय मिळालं मला. त्यापेक्षा स्वतःकडे लक्ष देऊन माझं विश्व उभं केलं असतं तर???
कदाचित उपरी म्हणून कोणी आणून तरी सोडलं नसतं इथं........
पण काय उपयोग आता........
त्याचवेळी पुढचा विचार करून निर्णय घेतला असता, तर आज नक्कीच याहून वेगळी परिस्थिती असती. ही अशी उपरेपणाची सल मला टोचत राहिली नसती........
मी माझ्या लहानपणापासून अगदी आतापर्यंत बरेच असे आजूबाजूला बघितलेत. ते संसारात तर असतात, पण दुसऱ्याच्या. तिथेही त्यांना अगदी प्रत्येक गोष्टीसाठी वापरून घेतलं जातं, आणि बरेचदा गरज सरल्यावर बाजूला केलं जातं. हे साऱ्यांवर आपलं समजून जीव लावतात, एकटे असतात म्हणून. अन् समोरचे मात्र त्यांचेच जवळचे नातेवाईक असून देखील त्यांना कायम उपरं म्हणूनच बघतात. 
बघितलंय का तुम्ही कोणी असं???  
©स्नेहल अखिला अन्वित
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel