मराठी कथा
विनोदी
कूक्कू कू कूक्कूsssss🐓
शनिवार, १८ मे, २०१९
"कोंबडा" नामक ऐटबाज पक्ष्याच्या नावाने मला कधी बोटं मोडायची वेळ येईल असं चुकूनसुद्धा वाटलं नव्हतं!!!
कधी तो माझ्या आणि मी त्याच्या वाटेला जाण्याचा विचार तर दूरच!!
पण आजकाल यानेच माझ्या जीवनात नुसती खळबळ माजवून ठेवली आहे.
मेरी निंद, मेरा सुख-चैन.......सब कूछ लूट लिया है इस कंबख्तने🙃
माझी पोरं कमी होती छळायला म्हणून हा हैवान आला त्यात भर घालायला😏
काय सांगू आला तेव्हा कित्ती कौतुक वाटलेलं मला त्याचं.......💕
पोराला तर पकडून पकडून दाखवायचे, बघ किती छान तुरा आहे डोक्यावर..... बघ कसा डौलदार चालतोय.......दोन दिवस दाणे पण घातले होते हौसेने.😊
त्याच्या कौतुकात बिचाऱ्या कोंबडीवर पण अन्यायच झाला माझ्याकडून. जराही भाव नाही दिला मी तिला........सारखं आपलं त्याचंच गुणगाण.
सपत्नीकच आला होता तो, म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या बाजूला घरं आहेत, त्यातल्या कोणी आणला होता.
आणि आरवला की कित्ती छान फिलिंग यायचं मला......नवऱ्याला तर अगदी सारखी सांगायचे शहरात राहून कसं गावासारखं वाटतय नाही या कोंबड्यामुळे??😃
पण अगदी थोड्याच दिवसात त्याने आपले नको ते गुण उधळून माझ्या कौतुकाच्या शब्दांना काळिमा फासला. 😡
जे आरवणं मला गावची फिलिंग देऊन जायचं, त्याच आरवण्याने माझ्या सुख शांतीवर कब्जा केलाय आता. 😩
जोsss मेला सकाळी केकाटायला सुरुवात करतो, तो दिवसभर काही थांबता थांबत नाही.😕
कूक्कू कू कूक्कूssssssss
कूक्कू कू कूक्कूssssssss🐓
डिट्टो हेच बोलतो तो.......पाठ झालय मला अगदी.
त्यातून कहर म्हणजे हे सगळं माझ्या खिडकीशी येऊन.......आम्ही तळ मजल्याला राहतो याचा पश्चाताप व्हायला लागलाय आता मला.
ज्यांचा आहे त्यांच्याकडे जाऊन ओरडायचय तेवढं ओरडावं की याने, मला काही प्रॉब्लेम नाही.
माझ्या खिडकीच्या इथे येऊनच सारखं काय ते आपलं कूक्कू कू कूक्कूssssssss🐓
बरं त्याच्या या ओरडण्याला काही काळ वेळ नाही.
एका पर्टिक्युलर टाईमाला ओरडत असता तर ठिक होतं. सकाळी 8 ते 10 पर्यंत तर नॉनस्टॉप असतो गडी.... नेमकी मी स्वैपाकघरात.
कुठलं गाणं म्हणून देत नाही, मनात कुठले तरंग उमटू देत नाही, त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाबद्दल तो सुचूच देत नाही, नुसतं आपलं .............
कूक्कू कू कूक्कूssssssss आणि कूक्कू कू कूक्कूssssssss🐓
श्याss काय दिवस आणलेत याने माझ्यावर !!😵
या कोंबड्याचाच विचार करत राहायचं का आता मी बाकीच्या गोष्टी सोडून???🙄
एकदा रागारागाने त्याच्या मालकिणीला सुद्धा जाऊन गाठलं, म्हटलं कोंबडं सारखंच केकाटतं हो तुमचं???
तुमच्या इकडेच ठेवा की त्याला.....
तर बाई म्हणते कशी, आम्ही त्याला कित्ती सांगतो जाऊ नको उगं हिकडं तिकडं......सगळ्या लोकांच्या नजरा काय सारखा नसतात ......ऐकतच नाही हो!!
घ्या आता.....कोण त्या केकाट्याला नजर लावणारे देव जाणे??
मी म्हणते याची बायको तरी कशी खपवून घेते???
आपण कसं जराss अति केलं नवऱ्याने की लगेच दमात घेतो, हिला नाही का दटावता येत त्याला, जरा खमकेपणा आणून विचारायचं की नाही, का फुकटचा ओरडतोयस नरडं फुटेस्तोवर ??? गप पड की जरा.
एवढी माझ्या खिडकीच्या इथे असते, अन् नवऱ्याला घाबरून राहते म्हणजे काय.....???
मला तर वाटतं हिनेच शेफारून ठेवलंय त्याला गपगार राहून.
अहो, कधीतरी माझी पोरं आपल्या बापड्या मम्मीवर दया दाखवून मोठ्या मनाने मला आडवं पडायची परवानगी देतात, तर हा टोणग्या ते सुद्धा सुख हिरावून घेतो, खिडकी जवळ येऊन जिवाच्या आकांताने याचं सुरू.... कूक्कू कू कूक्कूssssssss🐓
शुक शुक करा, हट हट करा, हाड हाड करा, लोठ्या तिथंच, बायकोला इन्सलटिंग फिल होत असावं बहुतेक, बिचारी लांब जाते जरा......पण याला ढिम्म नसते.
नुसता एक डांबरट लुक देतो, आणि परत करायचं ते करतोच, चक्रम कुठला.😇
नेमकं काय करावं म्हणजे या नाठाळाचं तोंड बंद होईल, असं झालंय मला.🤔
रात्री झोपायला स्वतःच्या मालकिणीकडे जातो हेच माझं नशीब म्हणायचं!!!🙏
बरं नवऱ्याला या दिवट्याबद्दल सांगावं तर तो कुत्सित हसत त्याला पाठिंबा दर्शवतो. काय तर म्हणे भोग आहेत तुझे, सांगत होतो येता जाता पुरुष जातीच्या नावाने खडे फोडत जाऊ नकोस, कोणीतरी येऊन वचपा काढेल, बस आता भोगत.😒
हल्ली मी खिडकीत उभं राहून नजरेत अपार व्याकुळता आणून त्या छळवादयाकडे बघून एकच गाणं गात असते.......
वो मेरी निंद मेरा चैन मुझे लौटा दो......🤦
आणि तो, तो माझ्या दर्दभऱ्या आळवणीला न जुमानता तिथल्या तिथे आणखी चार वेळा मला कूक्कू कू कूक्कूssssssss ऐकवून दाखवतो.
कशाला येऊन बसलाय हा इरसाल नमुना माझ्या राशीला त्याचा तोच जाणे, काय विचारायची पण खोटी; उत्तर ठरलेलंच, कूक्कू कू कूक्कूssssssss🐓
आवरा रे आवरा कोणीतरी याला.........!!!
लय म्हंजे लय हैराण करून सोडलंय, या परेशान आत्म्याने मला.🙆
©स्नेहल अखिला अन्वित
बघावं तेव्हा आमच्या खिडकीच्या खालीच असतं हे पात्र🤷
Previous article
Next article


