नातं का जपायचं निव्वळ फॉर्मलीटी म्हणून......!!



नम्रताच्या सासूबाई खूप दिवसांपासून आजारी होत्या. सत्तरीचंच वय होतं, पण एकात एक काहीतरी वाढून मधेच परिस्थिती नाजूक व्हायची.
नम्रता आपल्या सासूबाईचं सर्वकाही प्रेमाने करत होती. अगोदर ऑफिसला जायची पण सासूबाई आजारी असल्यापासून सारख्या दांड्या व्हायला लागल्या, म्हणून तुर्तास तिने ब्रेक घेतला होता. नाहीतर मग तिची फारच धावपळ होत होती.
शिवाय इकडून तिकडून नातेवाईक पण सारखे बघायला यायचे, तिच्या सासूबाईंना.
सासूबाईंनी उमेदीच्या वेळी बऱ्याचजणांचं केलं असल्याने, सहाजिकच त्या साऱ्यांना त्यांच्याबद्दल आपुलकी होती.
जसं जमेल तसं एकेक बघायला येऊन जात होते.

असेच एके दिवशी तिच्या नणंदेचे सासू-सासरे देखील सासूबाईंना भेटायला आले. नणंद तशी दर शनिवारी येऊन एक दिवस राहून जायची. तिचे सासू-सासरे मात्र आज जाऊ उद्या जाऊ म्हणत, शेवटी एक दिवस अगदी वेळ काढून आले.

सगळं बोलणं चालणं झाल्यावर निघताना मात्र नम्रताला नणंदेचे सासरे म्हणाले, किती दिवस यायचं चाललेलं, पण जमतच नव्हतं.
शेवटी काल म्हटलं, किती दिवस राहिलेत काय माहिती, जाऊन भेटून आलेलं बरं.

ते असे बोलले, आणि नम्रताच्या छातीत एकदम धस्स् झालं. त्या किती दिवस राहणार हा विचार न करता ती अगदी मनापासून सासूबाईंची सेवा करत होती. देवाकडे ह्यांना लवकर बरं कर म्हणून रोज मागणं मागत होती. तिला त्यांना असं बेडवर नुसतं पडून राहिलेलं बघताना फार त्रास होत होता.
दोघींनी बरीच वर्षं एकत्र काढलेली, आंबट गोड नातं मुरून मुरून काहीसं खास बनलेलं. तिला असं आपलं कोणी सोडून जाणार असं नुसतं ऐकूनही भीतीने धडधडायला लागलं. डोळे भरून आले, ती आणखीनच हळवी झाली.

हे असं कसे बोलू शकतात. आपण एखाद्याला भेटायला जातो ते त्याचं हित चिंतूनच ना, त्याच्याबद्दल काळजी वाटते म्हणून, किंवा त्याला मानसिक आधार द्यायला ना? आम्ही आहोत तुमच्याबरोबर. तुम्ही लवकर बरे व्हा. मनापासून बोललेल्या शब्दांचा धीर पण खूप काही सांगून जातो.
माझ्यासमोर बोलले हेच माझ्या नणंदेसमोर बोलले असते तर? 
काय वाटलं असतं तिला? मनातूनच उतरले असते तिच्या.

यांना शुभकामना घेऊन यायचं नव्हतं तर नुसती फॉर्मलीटी म्हणून कशाला यायचं?
आपल्या सुनेची आई आहे, नाही गेलं तर बरं दिसणार नाही, फक्त म्हणूनच आलेले हे. 
नम्रताला त्यांच्या अशा वागण्याचं खूप वाईट वाटलं, रागही आला होता, तरीही तिने मोठे आणि मानाचे म्हणून काहीही उलट न बोलता त्यांना निरोप दिला.

तिच्या सासूबाईंची तब्बेत बरी नव्हती, पण जातील की राहतील एवढीही वाईट अवस्था नव्हती झाली अजून.
त्यातूनही त्या उभारी धरून उठून बसण्याचे चान्सेस होते.
मिरॅकल्स कधीही होऊ शकतात, यावर नम्रताचा विश्वास होता.

जाऊ दे, असल्या लोकांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही म्हणून ती तिच्या कामाला लागली. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. फोन सासूबाईंच्या मैत्रिणीचा होता. खूप इच्छा असूनही भेटायला जमत नव्हतं, म्हणून त्या दिलगिरी व्यक्त करत होत्या. नम्रता म्हणाली, अहो तुम्ही येऊन गेला होतात ना मागच्याच महिन्यात? एवढ्या लांबून सारखं कसं जमेल? तुमचंही वय झाली ना आता?
हो पण मला भेटावसं वाटतंय, आणि माझी सून नुकतीच शेगावला जाऊन आली, माहेर ना तिचं!! मग येताना तिथला अंगाराही आणलाय तिने. तोही दयायचाय. पुढच्या आठवड्यात आम्ही सगळे येऊन जाऊच. मला चैनच पडत नाहीये. माझ्या हाताने तिला अंगारा लावेन तेव्हा कुठे बरं वाटेल मला. माझी सून तसं सांगून आलीये महाराजांना, लवकर बऱ्या होऊ दे, पुढच्या वेळी त्यांनाच बरोबर आणू. 

नम्रताला खूप हायसं वाटलं. निराशेचं मळभ क्षणात कोणीतरी जादूने पुसून टाकल्यासारखं वाटलं. तिने नक्की या, मी वाट पाहते म्हणून फोन ठेऊन दिला. तिला वाटलं किती पॉझिटिव्हीटी आहे यांच्यात. मी तर माझ्या सासूबाई बऱ्या व्हाव्या म्हणतेय, हे तर त्यांना घेऊन फिरायचीही मनोकामना ठेवतायत.

अशी माणसं हवीत, दूर असून सुद्धा जवळ असल्यासारखी. 
लांब असून सुद्धा हित चिंतणारी!! 

नाहीतर नुसतं फॉर्मलीटी सांभाळण्यात काय अर्थ आहे, देखल्या देवा दंडवत नुसता!!

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel