मराठी कथा
सामाजिक
स्त्रीवादी
देविका, सुहासच्या मित्राच्या बायकोची बहीण.
त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर .....
सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९
देविका, सुहासच्या मित्राच्या बायकोची बहीण.
सुहासचं लग्नाचं वय झालेलं असल्याने घरी मुली बघणं चालेलंच.
सुहासची नोकरी तशी जेमतेम पगाराचीच होती.
शिक्षणही पूर्ण केले नव्हते त्याने नेटाने. मुली मिळणं तसं अवघडच होतं.
तशातच हा एकदा त्या मित्राच्या घरी गेला असता, देविका तिथेच आलेली होती.
बघताक्षणी आवडली वगैरे असं काही झालं नाही. पण तिच्याही लग्नाचं बघतायत असं समजलं आणि तिच्या घरचीही गरीब परिस्थिती मागे आणखी दोन बहिणी लग्नाच्या म्हणून सुहासच्या मित्राने हे स्थळ चालेल का विचारलं.
आणि मग तीही त्याच्या मनात शिरली.
खरंतर सुहासच्या नोकरीचा धड पत्ता नव्हता, कमाई जेमतेमच होती.
पण मुलीकडच्यांनी जास्त विचार न करता घरची माणसे बघून मुलगी उजवून टाकली.
इकडे दोघांचा संसार सुरू झाला. सुहासच्या घरी त्याचा भाऊ, वहिनी, मुले आणि आई-वडील, सारा गोतावळा होता.
देविका सालस, देवभोळी आणि स्वयंपाकातही निपुण होती.
सगळ्यांना तिच्या हातचं जेवण फार आवडे.
सुहासचही तिच्यावर खूप प्रेम बसलं होतं.
सुहासला नोकरी करण्यापेक्षा कुठला तरी उद्योग करावा असं सारखं वाटे. गावाला राहून आपलं काही भलं होणार नाही, मुंबईसारख्या शहरातच आपण गेलं पाहिजे, म्हणून त्याने खटपटी सुरू केल्या.
बायकोला घरची माणसं सोडून जाणं बरोबर वाटत नव्हतं, पण सुहासलाही साथ देणं गरजेचं आहे, म्हणून तीही त्याच्याबरोबर मुंबईला जाण्यास निघाली.
बायकोला घरची माणसं सोडून जाणं बरोबर वाटत नव्हतं, पण सुहासलाही साथ देणं गरजेचं आहे, म्हणून तीही त्याच्याबरोबर मुंबईला जाण्यास निघाली.
इकडून तिकडून पैशाची जुळवाजुळव करून त्यांनी मुंबईला एका खोलीत संसार थाटला.
याने छोटासा धंदाही सुरू केला. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असल्याने त्यांचे ते असेल त्या परिस्थितीत सुखात होते.
पण हळूहळू धंद्यात जम बसण्याऐवजी धंदा सुहासच्या अव्यवहारीपणामुळे बुडायला लागला.
पैसे सतत कमीच पडायला लागले. सगळ्या नातेवाईकांकडून, मित्रांकडून मदत येऊनही गणितं सुटली नाहीतच.
अशातच सुहासला व्यसनांनी वेढलं. खोटं बोलून, सहानभूती मिळवून तो काम न करता पैसे मिळवू लागला.
हळूहळू सगळ्यांनी त्याला पैसे देणं बंद केलं, आणि मित्रमंडळ आणि नातेवाईकांकडे तो खोटारडा म्हणून प्रसिद्ध झाला.
कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवेनासं झालं.
ती मात्र त्याला धरून होती. त्याचं सर्व सहन करत होती. तिला वाटायचं काही का असेना त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर, तो नक्की सुधारेल.
ती त्याला खूप समजवायची, बाहेर पडायला सांगायची, पण तो तेव्हढ्यापुरतं हो हो करायचा, आणि बाहेर पडला की पुन्हा त्याच गर्तेत जायचा.
खरंतर आता ते दोघेच नव्हते, मुलगाही झाला होता त्यांना.
आणि आईप्रमाणे मुलाचाही बापावर खूप जीव होता.
पान हलायचं नाही, त्याचं बापशिवाय!
पण सुहास घरी असेल तर त्यांचा आणि बाहेर पडला की व्यसनांचा!!
आता तो काहीही करत नव्हता. देविकाच चार पाच घरी स्वैंपाक करायचं काम करून कसं बस घर चालवायला लागली.
एकेकाळी हिने बाहेर काम करु नये, असं त्याला वाटायचं. आणि हिला ही ते फार सुखावून जायचं, का तर त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर, म्हणूनच त्याला असं वाटतं.
त्या प्रेमाखातर हिने खूप सहन केलं, पण त्याच प्रेमाखातर त्याने मात्र त्याचं व्यसन सोडलं नाही.
त्याच प्रेमाखातर त्याला तिच्यासाठी मिळेल तो कामधंदा करून, कष्ट करून हिला खाऊन पिऊन सुखात ठेवता आलं नाही.
आपलं घर सावरता आलं नाही. त्याने तिच्या प्रेमाखातर स्वतःला काडीचही बदललं नाही.
तो इतका खोल गर्तेत गेला,की त्यातून त्याला बाहेर पडताच आलं नाही. आणि देविकालाही खूप सारे प्रयत्न करूनही त्याला बाहेर काढता आलं नाही.
आता देविकाने मुलाच्या आशेवर जीव टिकवून ठेवला, त्याच्यासाठी मिळेल ते काम करून तिने घर चालवलं.
पण मुलानेही आपला आयडॉल असणाऱ्या वडिलांचं वर्तन लहानपणापासून पाहिलं होतं. मानसिक ताणाने म्हणा किंवा दुसऱ्या कशाने पण त्याचही लक्ष शिक्षणातून उडालं.
तो शाळेच्या नावावर इकडे तिकडे फिरू लागला.
तिची होती नव्हती ती आशा सुद्धा तिला संपताना दिसू लागली.
तिला पुन्हा भूतकाळाची पुनरावृत्तीच होतीये जणू असं वाटू लागलं.
एक दिवस मात्र तिने त्याला पकडून चांगलंच खडसावलं, अजूनही वेळ गेलेली नाही. आता जर नीट वागला नाहीस, तर तुझी रवानगी बाल सुधारगृहात करून टाकेन. आताच सावर नाहीतर, यापायी आपले हाल झाले तसे, तुझेही पुढे जन्मभर हालच होतील एवढं लक्षात ठेव.
मुलाच्या डोळ्यासमोरच सर्व घडलं होत, त्याने आईला नीट वागण्याचं वचन दिलं.
आई मी भरकटलो, वाईटाकडेच आकर्षित झालो, पण आता मी असं वागणार नाही, मी नक्की सुधारेन, तुझ्यासाठी सुधारेन आई, कारण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर!!
आणि खरंच आता मात्र या प्रेमाने तिला अजिबात धोका दिला नाही.
आणि खरंच आता मात्र या प्रेमाने तिला अजिबात धोका दिला नाही.
मुलाने आपलं शिक्षण चांगल्या रीतीने पूर्ण केलं आणि मोठ्या कंपनीत नोकरीलाही लागला.
कधीनव्हे ते आईच्या नशिबी प्रेमामुळेच सोन्याचे दिवस आले.
ही कथा अगदी खरी आहे.
अजूनही प्रेमाच्या नावाखाली अनेक स्त्रिया भरडल्या जातात. ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्यासाठी सर्वस्व हरवून बसतात. स्वतःला विसरतात. पण ज्याच्यावर एवढं जिवापाड प्रेम करतात, तो मात्र बरेचदा त्याच प्रेमाखातर स्वतःला बदलायला अजिबात तयार नसतो.
त्यानेही तिच्यासाठी काही वाईट गोष्टी सोडायला काय हरकत आहे, त्याचंही खूप प्रेम असतं ना तिच्यावर!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
लेख आवडल्यास लाईक, कमेंट आणि फॉलो नक्की करा, पण शेअर करताना मात्र नावसाकटच करा😊
Previous article
Next article