तिचं काहीतरी असणार.......!!

काय ग आई, कसली एकेक स्थळं पाठवतायत आपले नातेवाईक??

अगं त्यांनी तुझी काळजी आहे म्हणून ग!!

हो पण म्हणून कोणतीही स्थळं सुचवायची का? मुलगा जरा तरी मला शोभेसा नको का?? 

त्यांच्या मुलींना अशी स्थळं आणली असती तर चाललं असतं का त्यांना??

सगळ्यांना घाई झालीये तुझ्या लग्नाची, सारखे सारखे आम्हाला विचारत असतात, कधी होणार तिचं लग्न?

आता त्यांना घाई झाली म्हणून मी कोणाशीपण लग्न करायचं का? माझ्या संपूर्ण जीवनाचा प्रश्न आहे ना हा??

हो, पण वय सुद्धा वाढतंय ना, दोन वर्षांपासून आपण स्थळं शोधतोय. अजून कसा तुला कोणी मिळेना?? एवढे नखरे पण नसावेत ग!!

आई, नखरे कसले त्यात? तुम्ही म्हणाल त्या सगळ्यांना भेटले. पण नाही आवडलं कोणी मला, नाही जमेल असं वाटलं.
अगदी सर्वच काही जुळावं अशी अपेक्षा नाही माझी, पण किमान मला मनातून वाटलं तरी पाहिजे, की येssस असा जोडीदार मला हवा!! काहीतरी कनेक्ट नको का व्हायला??

एवढ्या मोठ्या गोष्टीचा विचार असा झटकन कसा करून टाकायचा, आणि ते सुद्धा लोकं मागे लागलीयेत म्हणून??
मला नाही जमणार, मी माझा वेळ घेणार!!

करा काय करायचंय ते, तुम्ही आजकालची मुलं काही
ऐकता कोणाचं??

असं कसं बोलते तू आई?? सर्व ऐकलं, उत्तम अभ्यास केला, उच्च शिक्षण घेतलं, चांगली नोकरी मिळवली. एवढी वर्ष फक्त या सगळ्यातच डोकं घातलं. शिक्षण चालू असताना प्रेमाचा विचार सुद्धा नाही केला. हॉस्टेलला होते मी, काही अवघड नव्हतं माझ्यासाठी, कोण बघायला होतं, काय करते?
तरी स्वतःचं ध्येय ठरवून त्याचा पाठपुरावा केला. सहज नाही मिळालं मला काही!!
मग मी जे काही कमावलयं, ते असंच कोणाचाही हात पकडून वाया घालवू का??

आता माझ्या एवढे मागे लागलाय, पण उद्या तुम्हीच रडत बसाल, माझ्याबरोबर काही वाईट झालं तर!!

कर बाई तुला काय करायचंय ते, आम्ही काही आता मध्ये नाही पडणार!!

शर्वरी आणि तिच्या आईमध्ये साधारण दर पंधरा दिवसांनी होणारा हा सवांद!!

शर्वरी एक उच्चशिक्षित, उत्तम नोकरी असणारी आणि दिसायलाही खूपच सुंदर मुलगी !! घरातून प्रेमविवाहाला विरोध होता असंच काही नाही. पण शिक्षण चालू असताना तिने या मार्गाकडे बघितलेच नाही. आणि नंतरही तिला कोणी आवडेल असा भेटला नाही. ती सगळ्यांनाच आवडायची ही गोष्ट वेगळी!!

आणि आता एवढी थांबलेच आहे तर थोडक्यासाठी घाई का करायची, म्हणून तिला सर्व बाजूने विचार करून, मनाची पूर्णपणे खात्री पटल्यावरच लग्नासाठी हो म्हणायचं आहे.
मात्र तिचं हे वागणं कोणाच्या पचनी पडत नाहीये.
एका चांगल्या विवाह मंडळात तिचं नावही नोंदवलं आहे.
सध्यातरी तिच्याकडे स्थळांची नुसती रांग लागलीये. वरून आईकडचे, वडिलांकडचे जवळचे-दुरचे सर्व नातेवाईक काळजीपोटी सुचेल ती स्थळं पाठवून तिला हैराण करतायत.

बिचारे दर चार दिवसाआड तिच्या घरी फोन करून तिच्या आई-बाबांना धीराने घ्यायला सांगतात.
त्यांना म्हणतात, बघा आता सगळ्याच स्थळांना ती नाही म्हणते, म्हणजे तिचं नक्कीच काहीतरी असणार!! लावून द्या की लग्न, हल्ली सगळं चालतं. एवढं काय त्यात??
शर्वरीच्या घरचे म्हणतात, असतं तर आम्हाला काय हरकत होती हो? नाहीये म्हणून तर हे सगळं चाललंय.

पण खरंतर त्या कोणाला पटत नाही की तिचं काहीच नसणार, त्यांच्या म्हणण्यानुसार काही नसतं तर आतापर्यंत लग्न व्हायला पाहिजे होतं!! सगळ्याच स्थळांना कशी नकार देते ही??
उगाच वेळ काढतीये, तिचं नक्कीच काहीतरी असणार!!

या सगळ्यामुळे शर्वरीच्या आईबाबांचं टेन्शन मात्र वाढत चाललंय. पण त्यांना तिच्यावर जबरदस्ती करणंही योग्य वाटत नाहीये.

खरंतर शर्वरीची मत वेगळी आहेत. ती आजूबाजूचे अनेक अनुभव घेऊन पक्की झालीयेत. तिच्या खूप मित्र मैत्रिणींना अधीरतेने लग्नाचा निर्णय घेऊन पस्तावताना तिने पाहिलंय. त्यामुळे वेळ लागला तरी चालेल, पण मी माझ्या मनाला पुर्णपणे पटेल तेव्हाच लग्नासाठी हो बोलणार, असा तिचा ठाम निश्चय आहे.

तिचं म्हणणं, ज्याच्याबरोबर संपूर्ण आयुष्य काढायचं त्याला असं हातघाईवर येऊन कसं निवडायचं??
भले कोणाला वाटू दे; तिचं काहीतरी असणार, पण मी मात्र माझं लग्न पूर्ण विचारांतीच करणार !!


©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास लाईक, कमेंट नक्की करा आणि शेअर करताना नावासकटच करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel